सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष, सामाजिक जाणिवांनी समृद्ध व्यक्तिमत्त्व प्रतापराव गोविंदराव पवार १५ ऑक्टोबरला वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रतापराव पवार सुमारे सहा दशके महाराष्ट्रातील कित्येक सामाजिक संस्थांचे सक्रिय कार्यकर्ते, भक्कम पाठिराखे आणि सक्षम मार्गदर्शक राहिले आहेत. या संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला. प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावना विशेष पुरवणीद्वारे मांडत आहोत.
खऱ्या अर्थाने मोठा माणूस!
सन २००२ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विनंतीवरून मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र या ट्रस्टचा सचिव झालो. त्यानंतर प्रतापराव पवार यांच्याशी माझा संपर्क आला.
वर्षातून एकदा सकाळ कार्यालयात आम्ही एजीएमसाठी जायचो. "अरे बापरे! मोठा माणूस आहे,' असे सुरुवातीला त्यांच्याबद्दल मनात होते. पण त्यांच्या वागणुकीमुळे नंतर कधी त्याचे दडपण जाणवले नाही. मीटिंग संपताना त्यांच्या सेक्रेटरीने दिलेला देणगीचा चेक घेऊन आम्ही परतायचो. अंनिसमधील वादाच्या वेळी ट्रस्टचे खजिनदार लिमये व मी त्यांच्या घरी गेलो. सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. त्यांना जे योग्य वाटले, त्या बाजूने ते खंबीरपणे उभे राहिले. ट्रस्टवर ‘सनातन’च्या केसेस आहेत. या सगळ्यांतून मार्ग काढताना प्रतापराव पवार शांतपणे सोबत असतात.
- दीपक गिरमे, सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्ट
सुस्पष्ट विचार, कृतीतून शिकवण
बालकल्याण संस्थेच्या ४२ वर्षांच्या प्रवासात संस्थेच्या स्थापनेपासून संस्थापक- संचालक म्हणून प्रतापराव पवार सरांचा सहभाग आहे. यमुताई किर्लोस्कर यांनी या संस्थेचा सर्व भार सरांच्या खांद्यावर सोपवला. संस्थेची निर्मिती ही अपंग- दिव्यांग मुलांसाठीची, त्यामुळे जबाबदारी जोखमीची.
१९९३ मध्ये मी संस्थेच्या कार्यास जोडले गेले नृत्य- नाट्यशिक्षिका म्हणून. पुढे २०१६ मध्ये माझी व्यवस्थापिका म्हणून निवड झाली. पहिल्याच मुलाखतीत सरांनी सांगितले, "संस्थेचा केंद्रबिंदू अपंग मूल आहे. आधी त्याचा विचार डोक्यात आला पाहिजे. देणगी मागताना अजिबात लाजायचं नाही, कारण देणगी संस्थेसाठी, या मुलांच्या प्रगतीसाठी मागणार आहेस."
सुरुवातीला संस्थेत जुन्या पद्धतीचा फोन होता. एक दिवस सर अचानक संस्थेमध्ये आले होते. कामकाजाच्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्यांनी खिशातून छोटी डायरी काढली. फोन नंबर बघितला आणि टेबलवर असलेला फोन फिरवला. बोलणे होऊन सरांनी रिसिव्हर खाली ठेवला आणि दुसऱ्या क्षणी खिशातून एक रुपयाचे नाणं काढलं आणि टेबलवर ठेवलं, "हे फोनचे पैसे"
सगळ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव...... पैसे कसे घ्यायचे आणि नाही तरी कसं म्हणायचं? सर म्हणाले, "हा फोन संस्थेचा आहे, तुझ्या किंवा माझ्या घरचा नाही."
एका छोट्या वाक्यात केवढा तरी गर्भित अर्थ लपलेला होता. माणसांना कामाप्रती प्रेरित ठेवण्याची सरांची पद्धत. विचारांची सुस्पष्टता त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते.
- अपर्णा पानसे, व्यवस्थापिका, बालकल्याण, पुणे
महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील
पदवीधर झाल्यावर पुढे काय करायचे, या संभ्रमात असताना निर्मलाताई पुरंदरे यांच्याशी परिचय झाला. विद्यार्थी साहाय्यक समितीचे संस्थापक (कै.) डॉ. अच्युतराव आपटे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. इनव्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट, फ्रान्स मित्र मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती या संस्थांमध्ये कामाचा अनुभव घेता आला.
‘वनस्थळी’त दरवर्षी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेण्यात येते. एका शिबिराच्या समारोपाला प्रतापराव पवार आले होते. त्यावर्षी त्यांनी वयाची साठी पूर्ण केली होती. या निमित्ताने शिबिरातील महिलांनी त्यांना काही गोष्टींची ग्वाही दिली. जी अशी, स्त्री म्हणून न्यूनगंड न बाळगता बौद्धिक, वैचारिक, शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊ, मुलामुलींना शिक्षणाची समान संधी देऊ, मला जे येते ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, ऋण काढून सण साजरा करणार नाही, घर, परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेऊ, पाणी, वीज, अन्न यांचा वापर आवश्यक तितकाच करू, स्वतःच्या जबाबदाऱ्यांकडे डोळसपणे पाहू. या वेगळ्या भेटीचे साहेबांना कौतुक वाटले होते.
आईच्या स्मरणार्थ दरवर्षी त्यांची ’वनस्थळी’ला आर्थिक मदत असते.
प्रतापराव पवारांना वनस्थळी परिवाराकडून खूप आरोग्यदायी शुभेच्छा..!
- भारती भिडे, कार्यवाह, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र व फ्रान्स मित्र मंडळ
मूल्यांचा सन्मान
मा. प्रतापराव पवार सर त्यांच्या उद्योग– व्यवसायाबरोबरच विद्यार्थी साहाय्यक समिती, बालकल्याण संस्था, सकाळ रिलीफ फंड, सकाळ इंडिया फाउंडेशन, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वरुपवर्धिनी, अंधशाळा, अँग्रीकल्चरल ट्रस्ट बारामती अशा अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात अगदी तरुण वयापासून सक्रिय आहेत. जवळपास ४०– ५० वर्षे या सर्व संस्थांशी एकरुप होऊन त्यांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि कालसुसंगत सुधारणेसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. याविषयी कृतज्ञता म्हणून सर्व संस्थांच्या वतीने त्यांचा सामाजिक कृतज्ञता सोहळा आयोजिला आहे.
असे सोहळे किंवा सन्मान ही खरे तर सरांना न आव़डणारी गोष्ट. या कार्यक्रमासाठीही त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी नकारच दिला होता. उलट ‘या सर्व संस्थांच्या संस्थापकांनी ज्या ध्येयाने, निष्ठेने काम केले, त्यांनी कुठे सत्कार स्वीकारले,’ अशी विचारणा करून, ‘ज्यावेळी त्यांनी माझ्याकडे कामाची जबाबादारी दिली त्यावेळी त्यांचा त्याग बघून मी निमूटपणे त्यात सहभागी झालो. त्या सर्वांपुढे माझे काम खूप छोटे आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. हे समजून घेतले तरी प्रतापराव सरांनी आयुष्यभर जी मूल्ये जपली, संस्थांमध्ये एक संस्कृती निर्माण केली, ती समाजापुढे येणे गरजेचे आहे, असा आम्ही हट्ट धरून त्यांना या कार्यक्रमासाठी तयार केले. त्यामुळे हा केवळ व्यक्तीचा नाही, तर मूल्यांचा सन्मान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
प्रतापराव केवळ व्यक्ती नाहीत तर संस्था आहेत, असे आम्ही सर्व मानतो. एका आयुष्यात किती जबाबदाऱ्या आणि त्याही समर्थपणे पार पाडता येतात, हे त्यांच्याकडे पाहून लक्षात येते. वेळेबाबतचा काटेकोरपणा, गुणग्राहकता, संवेदनशीलता, निर्णयातील स्पष्टता, नाविन्याचा ध्यास, आपण जे पाहिले, अनुभवले ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याची मनीषा, अशी त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांच्या परीसस्पर्शाने आजवर हजारो व्यक्तींना, विद्यार्थ्यांना नक्की फायदा झाला असेल.
तरुण पिढी उद्योजकतेकडे वळली पाहिजे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनातून समितीत सुरू झालेले उपक्रम, एखाद्या विद्यार्थ्याने नवे काही केले की, ते समजून घेऊन त्याला कशी मदत करता येईल, यासाठीचे त्यांचे प्रयत्न, कोण कुठे भेटले आणि समितीशी संबंधित विषय वाटला की त्याला जोडण्यासाठीचे प्रयत्न, दरवर्षी संस्थेसाठी आर्थिक योगदान देतानाच यावर्षी संस्थेच्या भविष्याचा विचार करून दिलेली मोठी मदत या साऱ्यांतून त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. आपण समाजाचे देणे लागतो ही त्यांची जाणीव सतत जागृत असते. सरांकडून अजून अशीच अनेक समाजोपयोगी कामे व्हावीत आणि त्यासाठी त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभावे, ही प्रार्थना.
- चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य विकास अधिकारी, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे
गुंतूनी गुंत्यात सार्या...
स्व-रूपवर्धिनीच्या कामाला उपयुक्त एखादा विषय, एखादी कल्पना सुचली तर किंवा एखादी व्यक्ती वर्धिनीला जोडून देण्यासाठी प्रतापरावांचा आतापर्यंत अनेकदा फोन आला आहे. २० जुलैला सकाळी प्रतापरावांचा फोन आला. मला वाटलं, अशाच कुठल्यातरी कारणासाठी असेल. प्रतापराव म्हणाले, "शिरीष, किशाभाऊंनी ज्या तळमळीने शेवटच्या श्वासापर्यंत वर्धिनीचे काम केले, स्वतःचे म्हणून जे जे होते तेही वर्धिनीला म्हणजे समाजाला देऊन टाकले, त्यांची स्मृती दीर्घकाळ राहावी, यासाठी मी त्यांच्या नावाने एक मोठा निधी वर्धिनीला देणार आहे. कायमनिधी स्वरुपाची ही देणगी असेल. त्यातून मिळणाऱ्या व्याजाचा विनियोग वर्धिनीने त्यांची स्वप्नं साकारण्यासाठी करावा, अशी माझी इच्छा आहे. मी पन्नास लक्ष रुपयांचा धनादेश देणार आहे." हे ऐकल्यावर कसं व्यक्त व्हावं, हेच मला समजेना. क्षणभरात सावरलो आणि म्हणालो, "प्रतापराव, येत्या २९ तारखेला किशाभाऊंचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने आपल्या हस्ते ही देणगी स्वीकारताना वर्धिनीमधील सगळ्यांना आनंद वाटेल."
२८ जुलैला ‘सकाळ’ कार्यालयात एका अनौपचारिक कार्यक्रमात या देणगीचा धनादेश त्यांनी प्रदान केला. देणगीची रक्कम मोठीच होती; पण त्यापेक्षा मोठी गोष्ट मला जाणवली ती म्हणजे देणगी देण्यामागचा प्रतापरावांचा भाव. स्व. अच्युतराव आपटे, स्व. किशाभाऊ पटवर्धन, डॉक्टर माचवे अशा समाजासाठी स्वतःला पूर्ण वाहून घेतलेल्या व्यक्तींविषयी त्यांच्या मनात सदैव असलेला कृतज्ञतेचा भाव.
वर्धिनीला त्यांनी देणगी दिली, तशीच अन्यही सामाजिक संस्थांनाही दिली. या देणग्या देताना त्यामागे ऋणविमोचनाचाच भाव जाणवत होता. नावाची, प्रसिद्धीची, मानसन्मानाची अपेक्षा त्यांनी केली नाही, उलट अच्युतराव, किशाभाऊ यांच्या त्यागपूर्ण जीवनापुढे मी करतोय ही गोष्ट खूप छोटी आहे, असा विनम्र भाव त्यांनी व्यक्त केला.
प्रतापराव अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी काम करणाऱ्या, समाजाच्या भल्यासाठी चाललेल्या या कामांमध्ये ते एखाद्या उत्प्रेरकासारखे (कॅटालिस्ट एजंट) असतात. आवश्यक तेव्हा मदतीला धावून येतात; पण कुठल्याही संस्थेत कुठल्याही पदावर ते अडकले आहेत, असा अनुभव नाही. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं; पण कुठे अडकायचं नाही, हे त्यांना सहज जमलं आहे. 'गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा' या एका गीतातील ओळी त्यांना लागू पडतात.
- शिरीष पटवर्धन, उपाध्यक्ष, 'स्व'-रूपवर्धिनी
कार्यकर्तृत्वाचा भरलेला रांजण
अभियांत्रिकीचे पदवीधर आणि दृष्टिकोनात सामाजिक बांधिलकीचा वसा असलेले प्रतापराव पवार सर म्हणजे कार्यकर्तृत्वाचा भरलेला रांजण ! रांजणातील पाणी जसं समोरच्याला संजीवनच देतं, तसं अनेक संस्थांना संजीवन देण्याचं, सुवर्णझळाळी प्राप्त करून देण्याचं कसब पवार सरांमध्ये आहे. संस्था सांभाळणं, वाढवणं आणि त्याला नावलौकिक मिळवून देणं, यासाठी विशेष गुणांचा कस लागतो, जो पवार सरांमध्ये आहे. शिस्तबद्धता, नि:स्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने पवार सरांची नाममुद्रा उमटली.
आपल्या कार्याचा गौरव उचितच नाही तर अनन्वयच होता, असे म्हणावे वाटते. सकाळ इंडिया फाउंडेशन, विद्यार्थी साहाय्यक समिती, अंधशाळा इ. सामाजिक संस्थांबरोबर काम करताना त्यांचा सहवास, मार्गदर्शन लाभले, काम करण्याच्या पद्धतीसह अनेक गोष्टी शिकता आल्या, याचा मला सार्थ अभिमान व संतोष आहे .
- प्रा. भाऊसाहेब जाधव, कार्याध्यक्ष, मराठवाडा मित्र मंडळ, पुणे
कार्यकर्त्यांचा अखंड ऊर्जास्त्रोत
मी १९७२ पासून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहात राहात होतो. १९७५- ७६ च्या दरम्यान एका संध्याकाळी समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांच्यासोबत एका उंचपुऱ्या, रुबाबदार व्यक्तीचं दर्शन झालं! उत्सुकतेपोटी चौकशी केल्यावर समजलं ती व्यक्ती म्हणजे प्रतापराव पवार. ही माझी प्रतापराव सरांबरोबरची पहिली एकतर्फी ओळख..!
यथावकाश मी समितीतून बाहेर पडलो. समितीशी संबंध फक्त दरवर्षी छोटी देणगी देण्यासाठी ऑफिसमध्ये जाणं, तिथं असलेल्या कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारणं, माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला जाणं, एवढ्यापुरताच होता.
एकदा कोल्हापूरहून पुण्याकडे येताना साताऱ्याच्या पुढे एका हॉटेलसमोर जेवणासाठी उतरत असताना घाईगडबडीत गाडीत बसणारे सर दिसले. धीर करून जवळ जाऊन समितीचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली.
२०१३ मध्ये मी नोकरीतून बाहेर पडून ओघानेच समितीच्या कामात सहभागी झालो. इथूनच खऱ्या अर्थाने मला सर अनुभवायला मिळाले. समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात वेळेवर हजर असलेले, कार्यक्रमापूर्वी कार्यकर्त्यांसोबत मोकळेपणाने संवाद साधणारे, पाठीवर कौतुकाची थाप देणारे सर... संस्थेचे अध्यक्ष असूनही संस्थेच्या कार्यपद्धतीचा सन्मान अबाधित ठेवून दैनंदिन कामकाजात संबंधितांना संपूर्ण स्वातंत्र्य देत योग्य त्या ठिकाणी सूचना करणारे, प्रसंगी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला सांगून संस्थेच्या हिताचेच निर्णय होतील, याची दक्षता घेणारे सर मला विश्वस्त मंडळाच्या कामकाजात दिसले.
- रत्नाकर मते, विश्वस्त, विद्यार्थी साहाय्यक समिती
अनुभवसिद्ध मार्गदर्शनामुळे प्रगती
पुण्यातील जोशी हॉस्पिटल व रत्ना मेमोरियल हॉस्पिटलच्या जनक संस्थेचे म्हणजे महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनशी श्री. प्रतापराव पवार यांचा गेली अनेक दशके विश्वस्त आणि अध्यक्ष या नात्याने निकटचा संबंध आहे. वैद्यकीय व्यवसायातील सात जणांनी संस्थापक विश्वस्त म्हणून एकत्र येऊन १९७८ मध्ये स्थापिलेल्या ह्या संस्थेला प्रतापरावांच्या औद्योगिक, सामाजिक व व्यवस्थापन क्षेत्रातील दीर्घ अनुभवातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यामुळे योग्य दिशेने वाटचाल करीत प्रगती व वाढ करण्यात संस्थेला यश लाभले.
आजही प्रतापरावांचा आर्थिक नियोजन, कामगार संबंध अशांसारख्या विषयासंबंधीचा अनुभवसिद्ध सल्ला संस्थेला बळ देतो. कधी कोचिंग संस्थेमध्ये मतभेद उद्भवले तर सर्वांना समवेत घेऊन संस्थेच्या हिताचा मार्ग निष्पक्षपणे अनुसरण्याचे कार्य प्रतापराव अध्यक्ष या नात्याने करीत आहेत.
महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनचे नाव आता एमएमएफ हॉस्पिटल असोसिएशन असे असून संस्थेची प्रगती प्रतापरावांच्या अध्यक्ष या नात्याने होणाऱ्या मार्गदर्शनाखाली होत आहे. प्रतापरावांनी नुकतीच संस्थेला एक कोटी रुपयांची देणगी दिली. त्यांचा ८० व्या जन्मदिनी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!!
- डॉ. सुभाष काळे, एमएमएफ हॉस्पिटल असोसिएशन, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.