कऱ्हाड : पुसेसावळी येथे (Pusesawali Riots) रात्री झालेल्या धुमश्चक्रीमुळे शहरातील वातावरण सकाळच्या टप्प्यात तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, मध्यरात्रीच पोलिस ठाण्यात अल्पसंख्याक समाजाची बैठक घेऊन पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. दरम्यान, सकाळी येथील प्रार्थनास्थळामध्ये अल्पसंख्याक बांधव (Minority Community) मोठ्या संख्येने जमले होते.
अल्पसंख्याक बांधवांच्या वतीने सर्वांनाच शांततेचे आवाहन करण्यात आल्यानंतर दुपारी बारानंतर सर्व तणाव निवळून जनजीवन पूर्वपदावर आले. दरम्यान, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्ल्याच्या घटनेतील जखमींवर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुसेसावळी येथील घटनेनंतर कऱ्हाडसह (Karad) परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. ज्याच्याकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली, त्या संबंधितांचे फेक अकाऊंट तयार करून त्यावरून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली असून, त्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी येथील अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात आली.
त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी समाजबांधवांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. त्यानुसार उपस्थित अल्पसंख्याक बांधव तेथून घरी परतले. दरम्यान, काल सकाळी पुन्हा येथील प्रार्थनास्थळामध्ये अल्पसंख्याक बांधव मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठ परिसरात थोडा तणाव होता.
समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणातील मुख्य संबंधित संशयितांना अटक करावी, अशी मागणी करण्याचे निवेदन देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर निवेदन देण्यासाठी काहीजण साताऱ्याला रवाना झाल्यावर तेथील उपस्थित अल्पसंख्याक बांधवांनी समाजाला शांततेचे आवाहन केले. दुपारी बारानंतर तणाव निवळला.
पुसेसावळीतील घटनेत जखमी झालेल्यांवर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काल रात्रीपासूनच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तासगाव येथील पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तालुका पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
कऱ्हाडहून पुसेसावळीकडे जाणारी वाहतूक कऱ्हाड तालुका पोलिसांना थांबवली आहे. सकाळपासूनच करवडी फाटा येथे कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने नाकाबंदी केली आहे. पुसेसावळीकडे जाणारी वाहने ही अत्यावश्यक कारण वगळता त्या मार्गावर सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.
पुसेगावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार कऱ्हाड शहरासह तालुक्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठी दक्षता घेतली आहे. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. काहींच्या हालचालीवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोलिस काल रात्रीपासून बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यांच्याबरोबरच सांगली आणि कोल्हापूरचाही फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
शहरात विविध अफवांचे पीक सकाळच्या टप्प्यात आले होते. त्यातच इंटरनेट सेवाही बंद असल्याने त्याची शहानिशा करता येत नव्हती. त्यामुळे दुपारपर्यंत या अफवा सुरूच होत्या.
पुसेसावळीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहरात सकाळच्या तणावाचे वातावरण होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून शहरातील शाळांना सुटी देण्यात आली.
पुसेसावळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी हे कालपासून येथे तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत पोलिस उपअधीक्षक बी. आर. पाटील व अन्य अधिकाऱ्यांनी पुसेसावळी येथील घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ते कऱ्हाड येथे थांबून आहेत. त्यांनी कऱ्हाड शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना, बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी सूचना दिल्या.
प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे ज्यांचे इंटरनेटवरच कामकाज चालते, त्यांची कामे ठप्प होऊन मोठी गैरसोय झाली. त्याचबरोबर नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी तहसीलदार, प्रांत कार्यालयाकडून आवश्यक असलेले दाखले देणेही नेट बंद असल्यामुळे बंद झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.