Nana Patole : राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नाना पटोले

Nana Patole : राहुल गांधींवर हल्ला झाला तर जबरदस्त प्रतिकार होईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. भाजपवर गांधी विचारधारेवर वारंवार हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
Nana Patole, Rahul Gandhi
Nana Patole, Rahul Gandhi sakal
Updated on

आज देशात एक विचित्र प्रकार पाहायला मिळतोय. लोकशाहीच्या नावाखाली भाजपने सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे. विशेषत: जे नेते गांधींच्या विचारांचे समर्थक आहेत, त्यांना सतत लक्ष्य केले जाते. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागला, तर याचा जबरदस्त प्रतिकार होईल. राहुल गांधी हे केवळ काँग्रेसचे नेते नाहीत ते देशाच्या प्रत्येक सामान्य नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात, अशा भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, भाजपला 'गांधी' नावाची ॲलर्जी आहे. हे नाव त्यांना खुपते कारण हे नाव त्यांना सतत सत्याचा, सत्याग्रहाचा आणि जनतेच्या न्यायाचा आदर्श दाखवते. भाजपच्या नेत्यांना गांधींच्या विचारांचा धाक आहे आणि म्हणूनच ते नेहमी राहुल गांधींची बदनामी करण्याचे प्रयत्न करतात.

 राहुल गांधी हे एक साधे, प्रामाणिक आणि लोकशाहीचा आदर करणारे नेते आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात कधीही चुकीचे काम केले नाही. त्यांनी नेहमी जनतेसाठी लढा दिला. मात्र भाजपच्या नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वावर शंका घेतली आहे. हे फक्त राजकीय संघर्षासाठी नाही, तर त्यांच्या गांधी विचारांमुळे आहे, हे सर्वांना आता समजले आहे, असेही पटोले म्हणाले.

 काही दिवसांपूर्वी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तरविंदर सिंग मारवाह नावाच्या एका व्यक्तीने जाहीरपणे धमकी दिली की, "राहुल गांधींचा अंत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारखा होईल." हा अत्यंत धक्कादायक आणि भयानक प्रकार आहे. ही धमकी फक्त एका व्यक्तीकडून दिलेली नाही, तर हा भाजपच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या दडपशाही राजकारणाचा भाग आहे. अशा धमक्यांचा अर्थ स्पष्ट आहे: जो कोणी भाजपला विरोध करेल, त्याला संपवण्यात येईल, हेच यातून दाखवून द्यायचे आहे, असा आरोप पटोले यांनी भाजपवर केला.

हेच आपल्या देशाचे लोकशाहीचे स्वरूप आहे का? राहुल गांधींनी एकमेव पाप केले आहे ते म्हणजे जनतेच्या बाजूने उभे राहणे, गरिबांच्या आवाजाला समर्थन देणे आणि सत्यासाठी लढणे. त्यांची बदनामी करून, धमक्या देऊन आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून भाजप आपला खरा चेहरा समोर आणत आहे.

आज राहुल गांधींना जी धमकी मिळाली आहे, ती आपल्याला इंदिरा गांधी यांची आठवण करून देते. इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्या काळातसुद्धा त्यांनाही विरोध होत होता, त्यांच्या धोरणांवर टीका होत होती. मात्र त्यांनी कधीही देशाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न थांबवले नाहीत. आज राहुल गांधींनाही त्या प्रकारचा विरोध होतो आहे, आणि त्यांनाही धमक्या दिल्या जात आहेत, कारण त्यांचा आवाज सत्ताधारी लोकांना खुपतो आहे.

राहुल गांधींना काहीही झाले तर त्याला जबाबदार भाजप सरकार आणि त्यांचे समर्थक असतील. आम्ही अशा प्रकारच्या धमक्यांना कधीही झुकणार नाही. राहुल गांधींची लढाई फक्त काँग्रेससाठी नाही, ती देशाच्या भविष्यासाठी आहे. त्यांना संपवण्याची धमकी देणारे लोक देशाच्या लोकशाहीवर हल्ला करत आहेत.

आता आपल्याला ही धमकी फक्त राहुल गांधींसाठी नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी आहे, हे ओळखले पाहिजे. देशात आज असहिष्णुता वाढत चालली आहे, लोकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत, आणि कोणत्याही प्रकारे विरोध करणाऱ्यांना दबवले जात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी, गांधी विचारांचे पुनरुत्थान करण्यासाठी आणि भाजपच्या दडपशाहीला आव्हान देण्याची हीच वेळ आहे.

 आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की, आम्ही अशा धमक्यांना कधीही भीक घालणार नाही. राहुल गांधी हे देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर गांधी विचारांचे पालन करणारे लोक आहेत, आणि आम्ही या शिवद्रोही आणि गांधीद्रोही सरकारला कधीही माफ करणार नाही.

 आपल्याला एकत्र येऊन राहुल गांधींवर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करावा लागेल. हे सरकार जनतेच्या विरोधात आहे आणि जोपर्यंत राहुल गांधींसारखे नेते आहेत, तोपर्यंत त्यांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही.

 तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आम्ही सत्यासाठी लढत राहू, लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी कधीही मागे हटणार नाही. राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला, तर याद ठेवा, आम्ही त्याचा जबरदस्त प्रतिकार करू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.