CM Eknath Shinde : त्यांना मोदी द्वेषाने पछाडले

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

मुंबई - राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिंदे म्हणाले, ‘विरोधी पक्षांनी ठरल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातला आहे. विरोधी पक्षांना मोदी द्वेषाने पछाडले आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानासंबधी खोटे नरेटिव्ह पसरवून त्यांना थोडेफार यश आले आहे. त्यामुळे ते उद्या छाती फुगवून सभागृहात येतील मात्र हे क्षणिक आहे. आम्ही पुढील निवडणुकीला कामाच्या जोरावर सामोरे जाणार आहोत.’

या अधिवेशनाबाबत बोलताना विरोधी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ‘खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होणार असल्याची टीका केली होती. त्यांच्या टीकेलाही शिंदे यांनी प्रत्युत्तर देत निरोप देताना तरी सभागृहात यावे लागेल की नाही, की ‘फेसबुक लाइव्ह’वरच निरोप देणार, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना हाणला.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर घातलेल्या बहिष्कारानंतर मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वश्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे पुढे म्हणाले की, गेली दोन वर्षे विरोधी पक्ष सरकार पडणार, सरकार पडणार असे बोलत आहेत मात्र अजूनही सरकारचा मुख्यमंत्री म्हणून मीच काम करत आहे.

आता आमच्याकडे अजित पवारही आले आहेत त्यामुळे भक्कमपणे आम्ही सरकार चालवत आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काळातही आम्हालाच यश मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा विरोधकांना कोणताही हक्क नाही. आम्हीच शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटीची भरपाई दिली.१२१ सिंचन प्रकल्प चालू करून १५ हजार हेक्टर ओलिताखाली जमीन आणली आहे.

त्याचबरोबरच मुंबई मेट्रो, समृध्दी महामार्ग हे प्रकल्पही आम्हीच पूर्ण केले आहेत. त्यामुळे हे सरकार रस्त्यावर उतरून काम करणार आहे. शासन आपल्या दारी येऊन काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाला धक्का न लागू देता आरक्षण देणे ही आमची जबाबदारी आहे, असेही शिंदे म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे हे सांगायला शिंदे विसरले नाहीत.

विरोधी पक्ष मोदी द्वेषाने पछाडले, संविधान बदलणार असा नरेटिव्ह सेट केला, आरक्षण जाणार असे सांगितले. गावागावांत जाऊन खोटे नरेटिव्ह पसरविले तसेच पण एवढं करून सुद्धा त्यांना केवळ जागा मिळाल्या. म्हणजे तुम्हाला २४० पर्यंत पोहचायला आणखी २५ वर्षे लागतील. परंतु शेवटी काय झाले, नरेंद्र मोदी तर पंतप्रधान झालेच. ‘गिरे तोभी टांग उपर’ या म्हणीप्रमाणे तुमची गत झाली आहे, असाही टोलाही शिंदे यांनी हाणला.

फडणवीस म्हणाले की, खोटे बोला पण रेटून बोला विरोधी पक्षांची मानसिकता झाली आहे. विरोधी पक्षांनी दिलेल्या पत्रामध्ये विदर्भाचे प्रकल्प मार्गी लावले नाहीत, असा आरोप केला आहे. मात्र हा साफ खोटा आरोप आहे. आम्हीच विदर्भातील ८७ प्रकल्प सुरू केले. बंद केलेले वैधानिक विकास मंडळ आम्ही सुरु केले. त्याचबरोबर सगळ्यात पेपरफुटी ठाकरे यांच्या काळात झाल्या. पेपरफुटीवर आम्हीच सर्वात जास्त उपाययोजना केल्या.

गुंतवणुकीमध्येही गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आमच्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर उद्योगधंदे गेले हा आरोपही विरोधी पक्षांचा खोटा आहे. शंभर कोटींची गृहमंत्र्यांची वसुली प्रकरण हे त्यांच्याच काळातील आहे. कोरोना काळातील बॉडी बॅग ,खिचडी घोटाळा हे सगळे गैरप्रकार उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विरोधकांवर टीका करताना चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, बरीच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधक चहापानाला येत नाहीत. आजदेखील त्यांनी एक पत्र दिले आहे. त्यात मनुस्मृतीच्या श्लोकाने सुरुवात केली आहे. असे काही करण्याची गरज नव्हती.

जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करुन जातीत तेढ निर्माण करण्याचं राजकारण विरोधक करत आहेत. आमचा या मनुस्मृतीला विरोध आहे. आज शाहू महाराजांची १५० वी जयंती आहे. मनुस्मृतीसारख्या मुद्द्याला या महाराष्ट्रात स्थान नाही. २८ जूनला अर्थसंकल्प सादर होईल, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.