मुंबईः मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या आणि 15 हजार कोटी रुपये खर्च करुनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या मार्गाचं काम गतीने पूर्ण करावं, यासाठी मनसेने आज जागर यात्रा काढली होती.
राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात झाली. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतून ही पदयात्रा गेली. समारोप कोलाडमध्ये झाला. कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे यांनी भाषण केलं.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारला जाग यावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी पदयात्रा केलीत. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचं तसंच धोरण आहे, पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून बोलायचं असतं.
''ज्या-ज्या महाराष्ट्र सैनिकांनी आणि कोकणी बांधवांनी पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला, त्यांचे मी आभार मानतो. अमित आणि पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी परिश्रम घेतले आहेत. कोकणी बांधवांना आणि भगिनींना मागील अनेक वर्षांपासून खड्डे सहन करावे लागत आहेत. याचा राग कसा येत नाही?''
राज पुढे म्हणाले की, त्याच त्याच लोकांना तुम्ही मतदान करता आणि तेच तेच लोक तुमच्या आयुष्याचा खेळ करतात. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो माणसाचं आयुष्य भरुन काढता येत नाही. जे लोकं खड्ड्यांमुळे गेली त्यांचं काय? मागच्या पंधरा वर्षांमध्ये अडीच हजार माणसं या खड्ड्यांमुळे मृत पावली आहेत, हे धक्कादायक आहे.
सातत्यानं कंत्राटं काढायची, बिलं उचलायची आणि खड्डे तसेच ठेवायचे, हे वर्षानुवर्षे सुरुच आहे. मुंबई-पुणे रस्त्याचं स्वप्न बाळासाहेबांनी बघितलं ते पूर्ण झालं. महाराष्ट्र हा पुढारलेलाच होता. या हायवेमुळे देशाला कळलं की असा रस्ता होऊ शकतो. नितीन गडकरींनी या रस्त्यासाठी परिश्रम घेतले.
''त्याच महाराष्ट्रातला मुंबई-गोवा रस्ता असा झाला आहे. हे असं का झालं? रस्ता का होत नाहीये? उत्तर सोपं आहे तुम्हाला राग येत नाही. मेल्या मनाचे झालेलो आहोत आम्ही. त्यामुळे ही अवस्था झाली आहे. भावनेच्या आधारावर आपण मतदान करतो, त्यामुळे असे हाल आहेत.''
राज ठाकरे शेवटी म्हणाले की, हा रस्ता असा ठेवण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ज्यावेळी रस्ता होईल तेव्हा शंभर पट भावाने व्यापाऱ्यांना जमिनी विक्री होतील, तुम्हाला काहीही मिळणार नाही. रस्ता चांगला झाल्यानंतर आजूबाजूच्या जमिनींचे भाव काय होतात? हे समजून घ्या. जमिनी विकू नका, तशाच ठेवा पुढे तुम्हाला फायदा होईल. जमिनी बळकावणारांचं काय करायचं? हे आम्ही बघू. असा इशारा त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.