अयोध्या दौऱ्याला विरोध कोणाचा? राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

Raj Thackeray on Ayodhya Visit
Raj Thackeray on Ayodhya Visite sakal
Updated on

मुंबई : राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची (Raj Thackeray Ayodhya Visit) घोषणा केली. त्यानंतर देशभरात अनेक घडामोडी घडल्या. त्यांचा दौरा प्रचंड चर्चेत होता. कारण, उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदारांनी त्यांना विरोध केला होता. पण, दौऱ्याला झालेला विरोध हा एक सापळा असून त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता? आणि राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत (Raj Thackeray Pune Sabha) नाव घेतलेले अल्पेश ठाकूर नेमके कोण आहेत? हे समजून घेऊया.

Raj Thackeray on Ayodhya Visit
Raj Thackeray Pune Sabha : राज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध -

राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ५ जूनला अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रचंड टीका झाली. राज यांचा दौरा राजकीय असल्याची टीका सेनेने केली. इतकंच नाहीतर आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा देखील घोषित केला. पण, उत्तर प्रदेशातून झालेल्या विरोधानंतर या घटनेला देशपातळीवर महत्व प्राप्त झालं. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. उत्तर भारतीयांवर अत्याचार करणाऱ्या राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, नाहीतर त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असं खुलं आव्हान बृजभूषण यांनी राज ठाकरेंना दिलं होतं. त्यांनी फक्त उत्तर प्रदेश नव्हेतर, छत्तीसग बिहार पर्यंत या विरोध रॅलीचा प्रचार केला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी तब्येतीच्या कारणास्तव आणि कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल होतील या कारणामुळे दौरा रद्द केला.

राज ठाकरे दौऱ्याबाबत काय म्हणाले? -

अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागेल. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक सापळा होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे. अचानक उत्तर प्रदेशातील एक खासदार उठतो आणि तेथील मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, असं अचानक घडत नाही, तर हे घडवून आणलं जातं. राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी करणारे गेली १५ वर्ष झोपले होते का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? -

भाजपचं सरकार असलेल्या उत्तर प्रदेशातून राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रचंड विरोध झाला. त्यानंतर ही भाजपची खेळी असल्याची टीका अनेकांनी केली होती. पण, रामाच्या जन्मस्थळी जाण्यासाठी कोणीही अडवू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. एकीकडे मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगत असताना दुसरीकडे भाजपकडून राज ठाकरेंच्या सभेला विरोध झाला. इतकंच नाहीतर मुंबईतून देखील एका भाजप कार्यकर्त्यानं विरोध केला होता. आजच्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी गुजरातमधील अल्पेश ठाकूर या नेत्याचं नाव घेतलं. तुम्ही त्यांना माफी मागायला लावणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. इतकंच नाहीतर त्यांना रसद महाराष्ट्रातून पुरविण्यात आली होती, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. त्यामुळे अयोध्या दौऱ्याला झालेल्या विरोधावरून राज ठाकरेंचा रोख भाजपकडे होता का? असा प्रश्न विचारला जातोय.

अल्पेश ठाकूर कोण? -

अल्पेश ठाकूर हे गुजरात भाजपचे नेते आहेत. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी एका उत्तर भारतीय स्थलांतरीत मजुराने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर अल्पेश ठाकूर यांनी गुजरातमधील उत्तर भारतीयांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गुजरात सोडण्यास भाग पाडले होते. पण, २०१९ मध्ये अल्पेश ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते सध्या भाजपचे नेते आहे. या अल्पेश ठाकूर यांना माफी मागायला सांगणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील भाजपला विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.