कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर बांधलेल्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन किलो मीटर भराव आहे.
बेळगाव : कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द करावा. कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shettiy) यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Karnataka Basavaraj Bommai) यांचेकडे केली. बेळगाव येथे रविवारी (२६) भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना महापुरात उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत संपूर्ण माहिती दिली. (Almatti Dam)
सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. सन २००५, २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलली असल्याचे निदर्शनास आले आहे.
कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर बांधलेल्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन किलो मीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नदीच्या पात्रापासून दोन किलोमीटर पाणी पसरते. अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात. परिणामी नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲागस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगाव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन-दोन कमानींचे बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल.
सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून हिप्परगी धरणापर्यंत मोठे ६ पूल, हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील ५ पूल व दुधगंगा-वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत आहेत. चिक्कोडी तालुक्यातील अंकली-मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकणगले, चिक्कोडी व निपाणी तालुक्यातील पूरस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची न वाढवता कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापुर नियंत्रणासाठी अभ्यास गट नेमून त्याबाबत उपाययोजना करत असून कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केला असल्याची माहिती दिली. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजनासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले जाईल. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार अण्णासाहेब ज्वोले, माजी आमदार संजय पाटील , माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेन्नावर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर व बेळगाव जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.