मुंबई : राज्यसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पहिल्यांदाच अग्निपरीक्षेला सामोरे जात असून चारही उमेदवार निवडून आणण्याएवढया आमदारसंख्येची बेगमी सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केल्याचे चित्र आहे. मतदानाला केवळ काही तास उरले असताना छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून चारही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येण्याचे गणित जुळले आहे. मात्र ‘मविआ’च्या छावणीत मुक्कामाला आलेल्या अपक्षांनी किंवा पक्षादेश झुगारून सत्ताधारी आघाडीतील मते फुटली तरच भाजपचा दुसरा उमेदवार निवडून येऊ शकेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
विशेष न्यायालयाने आज अटकेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांना मतदानाची परवानगी नाकारली. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. तीन मते कमी होऊन उद्याच्या निवडणुकीत आता २८५ आमदार मतदान करतील. भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची तर शिवसेनेच्या महेंद्र साळवी यांची प्रकृती ठीक नाही. मात्र हे तिघेही मतदानास हजर रहाणार आहेत असे समजते. सिंगल प्रिफरेन्शियल वोटींग या प्रणालीनुसार एकेका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ४०.७ चा कोटा लागेल.
मतांचे गणित
महाविकास आघाडीच्या मतांची बेरीज केल्यास शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५१ तर काँग्रेस ४४ अशी १५० मते आहेत. उमेदवाराला पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ४१ ऐवजी ४२ मते दिली गेली तरी शिवसेनेकडे १३ ,राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९ आणि काँग्रेसकडे दोन मते अतिरिक्त राहतात. त्यात छोट्या पक्षाच्या आठ जणांनी मविआला पाठिंबा दिला आहे तर आठ अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. सत्ताधाऱ्यांची अतिरिक्त २४ आणि बाहेरची ही १६ मते मिळाली तर संजय पवार हे चौथे उमेदवार ४० मते घेतील. एमआयएमने राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना दोन्ही मते द्यावीत असे प्रयत्न सुरु आहेत.
मलिक, देशमुख यांना परवानगी नाकारली
राज्यसभेसाठी उद्या (ता. १०) होणाऱ्या निवडणुकीला मतदान करण्याची मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी विशेष न्यायालयाने आज फेटाळली. या निकालाला देशमुख आणि मलिक यांनी उच्च न्यायालयात आज तातडीने आव्हान दिले. त्यामुळे दोघांना अजूनही मतदानाच्या आशा कायम असल्या, तरी न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला झटका बसला आहे.
राज्यसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन मंजूर करण्याची मागणी करणारा अर्ज नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी केला होता. विशेष न्या. राहुल रोकडे यांनी हा अर्ज आज (ता. ९) नामंजूर केला. कारागृहात असलेल्या कैद्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही, हा ईडीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.
तातडीने सुनावणी आवश्यक
दरम्यान, देशमुख आणि मलिक यांची मते महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात देशमुख आणि मलिक यांच्या वतीने उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयात न्या. प्रकाश नाईक यांच्यापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने उद्या यावर सुनावणी ठेवली आहे. उद्याच मतदान असल्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक आहे.
युक्तिवाद काय झाला?
राज्यसभा निवडणूक ही सर्वसाधारण निवडणूक नसते, तर केवळ विधानसभा सदस्य यामध्ये सहभागी होऊ शकतात. गुन्हा दाखल झाला असला तरी मतदान करण्याचा हक्क आमदार म्हणून कायम आहे, त्यामुळे मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी दोघांच्या वतीने करण्यात आली होती; मात्र कारागृहात असलेल्या आरोपींना मतदान करता येऊ शकत नाही. त्यामुळे मलिक आणि देशमुख यांना मतदानाचा अधिकार नाही, असा युक्तिवाद ईडीने केला होता. यानंतर विशेष न्यायालयाने दोघांचेही अर्ज नामंजूर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.