राज्यसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय, शिवसेनेचे संजय पवार पराभूत. महाडिक यांना ४१ मत तर पवार यांना ३३ मत.
राज्यसभेसाठी पहिल्या पसंतीची मतं घेऊन प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत. आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांना 43 मतं संजय राऊत 41 पियुष गोयल 48 मतं अनिल बोंडे 48 मतं प्रतापगडी 44
आव्हाड, ठाकूर, राणांची मतं वैध ठरवण्यात आली आहेत. भाजपने केलेले आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. यासोबतच मविआने राणा यांच्यावर आरोप केले होते. ते देखील मविआने फेटाळले आहेत. त्यामुळे २८५ पैकी २८४ मतांची मतमोजणी सुरू होणार आहे. शिवसेनेचे सुहास कांदे यांचं मत बाद झाल्याने शिवसेनेला फटका बसला आहे.
अद्याप राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निर्णय़ आलेला नाही. सर्व राजकीय नेते सध्या विधानभवनात दाखल होत आहेत. या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.
दोन्ही पक्षांकडून आक्षेप घेतल्यानंतर निर्णयाच्या आता निवडणूक आयोगाची बैठक नुकतीच संपली आहे लवकरच यासंबंधीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर लगेच राज्यसभेची मत मोजणी सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
भाजपने घेतलेल्या आक्षेपांवर मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये ऑनलाईन बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होतेय याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
राज्यसभेच्या मतदानावर भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्हींकडून एकमेकांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. दरम्यान केवळ पराभवाच्या भीतीने भाजपने मतदानावर आक्षेप घेतला आहे अशी टीका कॉंग्रेसचे नेत अस्लम शेख यांनी केली आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका दुसर्यांना दाखवली असा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे
राज्यसभेच्या निवडणूकीची मतमोजणी लांबली आहे, मतदानावर एकमेकांकडून आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी लांबली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरकतींवर निर्णय आला नसल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे. निवडणूक आयोगाला यासंबंधी ईमेल पाठवण्यात आला आहे, त्याचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे.
सहा जागांसाठीचे मतदान झाले असून, आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लवकरच निकालाची घोषणा होऊ शकते.
अगदी काही वेळात मतमोजणीला सुरूवात होणार असून खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा निर्णय लागणार आहे, दरम्यान विधानभवनात नेते गोळा होण्यास सुरूवात झाली आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पूर्ण झाले असून २८५ आमदारांनी मतदान केले आहे. दरम्यान यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होणार सुरू होणार आहे.
राज्यसभेच्या निवडणूकीत यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपचे आळवणी यांच्याकडून आक्षप घेण्यात आला आहे, यानंतर जितेंद्र आव्हाड यांना भाजप बावचळले आहे असे म्हणाले आहेत, आम्हाला मतदान कसं करायचं आम्हाला माहिती आहे असे त्यांनी सांगितले. भाजप वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आमचे चारही उमेदवार निवडूण येतील असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सतत आव्हान देणारे अमरावतीचे आमदार रवी राणा विधानभवनात दाखल झाले. त्यांनी १०१ वेळा हनुमान चालिसा पठण केलं. यासोबतच मुख्यमंत्र्यांनीही हनुमान चालिसा वाचावी, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीकडून एकूण ४८ आमदारांचे मतदान झालं. अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांचे मतदान राहिलं आहे. काँग्रेसचे ४२ मतदान झाले असून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचे मतदान अजून बाकी आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत २७८ आमदारांनी मतदान केलं आहे.
विधानभवनात शिवसेना - काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या मतदानानंतर आकडेमोडीला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीची ९ मतं शिवसेना नेते संजय पवार यांच्या पारड्यात पडली असून २ मतं काँग्रेसने दिलेली आहेत.
जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटलांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर यशोमती ठाकूरांनीही नाना पटोलेंच्या हाती मतपत्रिका दिल्याने भाजपाने आक्षेप घेतला आहे. मात्र निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावत आपलं मत वैध असल्याचं सांगितलं आहेत. या दोन्ही नेत्यांची मतं ग्राह्य धरली जाणार आहेत. दरम्यान, आजपर्यंत २३८ आमदारांनी मतदान केलं आहे.
चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले आहेत. जगताप सध्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. तरीही ते रुग्णवाहिकेतून दाखल झाले आहेत. त्यांना पीपीई कीट घालून विधानभवनात आणण्यात आलं आहे. तर त्यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते दाखल झाले होते. त्यांनी टाळ्या वाजवत जगताप यांचं स्वागतही केलं.
आत्तापर्यंत १८७ आमदारांनी मतदान केलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात दाखल झाले आहेत. तर काँग्रेसच्या ४४ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे.
मलिकांना मतदानाची परवानगी नाहीच!
मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर हायकोर्टही ठाम आहे. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळवी अशी मागणी करत ते पुन्हा याचिका दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादीने पहिल्या पसंतीची १० मते शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना दिली आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीने बदललेल्या रणनीतीचाच हा भाग असल्याच्या चर्चाही सध्या होऊ लागल्या आहेत. तर राष्ट्रवादीने वाढवलेल्या मतांच्या कोट्यामुळे शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.
मतदान सुरू असतानाच संजय राऊतांचं ट्वीट; रोख कुणाकडे?
आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं...! बाझ की उडान में कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!" या ट्वीटसोबतच त्यांनी आपल्या डोळ्यांचा फोटोही शेअर केला आहे. हा फोटो आणि त्यावरच्या या ओळींमुळे संजय राऊतांच्या या ट्वीटचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा होत आहेत.
दीड तासात आत्तापर्यंत १४३ आमदारांनी मतदान केलं आहे. तर आत्तापर्यंत काँग्रेसच्या २० हून अधिक आमदारांनी तर भाजपाच्या ६० हून अधिक आमदारांनी मतदान केलं आहे.
राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही मतांचा कोटा बदलला!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४२ मतांचा कोटा शरद पवारांनी रात्रीत बदलून ४४ चा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतून नाराजी व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही मतांचा कोटा बदलला असून तो ४४ केला आहे.
कोरोनातून बरे झाल्यावर फडणवीस मतदानासाठी दाखल!
देवेंद्र फडणवीस विधानभवनात मतदानासाठी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना दुसऱ्यांचा कोरोनाची लागण झाली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच त्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते आज विधानभवनात दाखल झाले होते.
"चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाची भेट मिळेल!"
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात की, भाजपाकडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत .शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे सर्व उमेदवार निवडून येतील. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल.
"राज्याची शोभा होईल अशी निवडणूक"; मनसे नेत्याचं ट्वीट
मनसे नेते गजानन काळे यांनी राज्यसभा निवडणुकीवरुन शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये काळे म्हणतात की, "राज्याची शोभा" होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे.
काँग्रेस कडून मतदान अधिकारी म्हणून बाळासाहेब थोरात भूमिका बजावणार आहे. काँग्रेस चार आमदारांचा एक गट करणार आहे आणि तसे गटाने मतदान करणार आहे. मतमोजणीला काँग्रेसकडून सतेज पाटील आणि सुनील केदार बसणार आहेत.
हातात हात, विजयाचा विश्वास
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात धरुन विधानभवनात प्रवेश केला, त्यामुळे या क्षणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोणीतरी एक संजय जाणार - अनिल बोंडे
कोणतातरी एक संजय जाणार. नरोवा कुंजरोवा हे जसं अश्वत्थामाच्या बाबतीत महाभारतात झालं होतं, ते आताही होणार आहे. कोणीतरी संजय जाणार. कोणता संजय ते संध्याकाळी पाचपर्यंत कळेल, असा विश्वास भाजपाचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीला दोन मतांचं नुकसान निश्चित
राष्ट्रवादीला या निवडणुकीत दोन मतांचं नुकसान सहन करावं लागणार आहे. ही दोन मतं आहेत, सध्या कारागृहात असलेल्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची. न्यायालयाने या दोघांना अद्यापही मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यांनी पुन्हा एकदा याविषयी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र त्यावर अजून अंतिम निर्णय आलेला नाही. जर या याचिकेचा निकाल आजच्या दिवसात लागला, तर कदाचित हे दोघे मतदान करू शकतील. पण सध्यातरी ही दोन मतं राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार नाहीत, असंच चित्र आहे.
भाजपाची उलटी गिनती आजपासून सुरू - नाना पटोले
मतदानासाठी विधानभवनाकडे निघालेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाच्या कटुतेच्या राजकारणाचे परिणाम आज त्यांना पाहायला मिळतील. मविआचे चारही उमेदवार निवडून येतील, असं नाना पटोले म्हणाले. एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, मतदान कोणी कोणाला करावा हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बाभळीची झाडं लावली तर त्याला काटेच लागणार. भाजपाची उलटी गिनती आजपासून सुरू.
रात्री उशिरा एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जारी केला आहे. रात्री उशिरा इम्तियाज जलिल यांची मविआच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी काही अटीही घातल्या असून शिवसेनेसोबतचे आपले वैचारिक मतभेद कायम राहतील, असंही जलील म्हणाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री सर्व भाजपा नेत्यांची हॉटेलमध्ये बैठक पार पडली. चंद्रकांत पाटलांनी ट्वीट करत या बैठकीबद्दल माहिती दिली आहे. तर निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील आता सकाळी सकाळीच विधानभवनाकडे निघाले आहेत. आज त्यांचा वाढदिवसही आहे. त्यामुळे आज विजय निश्चित असल्याची भावना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.
राज्यसभा निवडणुकीची धामधूम सध्या राज्यात सुरू आहे. आज राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यासाठी भाजपाकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पीयूष गोयल हे रिंगणात आहेत. शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत, काँग्रेसक़डून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार आहेत. भाजपने त्यांच्या गोटातून चौथा उमेदवार दिल्याने यंदा चुरस वाढली आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला दिवसेंदिवस रंग चढत आहेत.
(Rajyasabha Election 2022)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.