नवी दिल्ली : अर्थसंकल्पात यंदा रेल्वेसाठीची तरतूद १ लाख ३७ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविल्याने महाराष्ट्राच्या वाटेलाही भरीव तरतूद केली जाईल, अशी आशा आहे. मनमाड-औरंगाबाद व औरंगाबाद-परभणी या रेल्वेमार्गांच्या दुपरीकरणासारखे प्रकल्प रेल्वेच्या वतीने सुरूच राहणार आहेत. याशिवाय नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या दोन महिन्यांत तयार होणे अपेक्षित आहे, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. (Maharashtra Marathi News)
यंदाचा रेल्वे अर्थसंकल्पही मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट असल्याने यात महाराष्ट्राला काय मिळाले, याची माहिती होण्यासाठी प्रत्येक योजनेची माहिती असलेले ‘पिंक बुक'' येण्याची प्रतीक्षा करावी लागेल, असे दानवे म्हणाले. रेल्वेने १००० कोटी रुपयांपर्यंतचे जे प्रकल्प अंमलबजावणीच्या यादीत घेतले आहेत, त्यातील वरील तीनही प्रकल्प सुरूच राहणार आहेत. मनमाड-औरंगाबाद दुपदरीकरणाच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी साडेतीन कोटी मंजूरही केल्याचे ते म्हणाले.
याशिवाय जागतिक दर्जाची रेल्वेस्थानक बनविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेत राज्यातील सीएसटी मुंबई, दादर, नागपूर यासारख्या अनेक रेल्वेस्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याचा समावेश यात असल्याचे दानवे म्हणाले. वाराणसी-दिल्ली बुलेट ट्रेनचा डीपीआर तयार झाला असून नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचाही अहवाल लवकरच तयार होईल. समृद्धी महामार्गाला जोडूनच हा बुलेट ट्रेन मार्ग तयार होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबईत काही राजकीय कारणांनी रखडल्याचे दानवे यांनी सांगितले. मात्र यामुळे मुंबईतील उद्योग अहमदाबादला जातील हा प्रचार निरर्थक असल्याचे सांगून ते म्हणाले, की मुंबई-अहमदाबाद हा विमान मार्ग व रस्ताही आहे. म्हणून काय मुंबईतील उद्योग तिकडे गेले काय ? जेथे उद्योगांना पोषक वातावरण असते तिकडे उद्योग वळतात व ज्या राज्यांत तसे वातावरण मिळत नाही, तिकडे उद्योग पाठ फिरवतात हे साधे गणित असल्याचे दानवे यांनी सूचकपणे सांगितले.
झोपडपट्ट्या हलविणार नाही
मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र व देशातील अनेक राज्यांत रेल्वेच्या जमिनींवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे झालेली आहेत. ती दूर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार रेल्वे बोर्डाने मुंबईतील रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्ट्या ७ दिवसांत उठविण्याच्या नोटीसा दिल्या, मात्र तसे होणार नाही, असा दिलासा दानवे यांनी दिला. ते म्हणाले, की याबाबत अनेक खासदार-आमदारांनी चर्चा केली आहे. आपण मुंबईत सर्व संबंधितांची बैठक घेणार आहे. यात या समस्येवर तोडगा निघेल, असा विश्वास आहे. त्यामुळे ७ दिवसांत झोपडपट्ट्या हलवाव्या लागणार ही भीती निराधार आहे, असेही दानवे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.