सोलापूर : कोरोना आणि मागील वर्षीचा दुष्काळ, यातून यंदाचा दिवाळी बाजार तेजीत असल्याची स्थिती आहे. चांगला पाऊस झाला असून शेतकऱ्यांना व शेतीवर अवलंबून असलेल्या घटकांना पैसे येतील, अशी आशा आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर बाजारपेठेत दागिने (सोने-चांदी), दुचाकी- चारचाकी वाहने, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह किराणा दुकानांमध्ये फराळाच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.
सोलापूर शहरातील नवीपेठ, मंगळवार बाजार, टिळक चौक, विजापूर वेस, सराफ बाजार, चाटी गल्ली अशा विविध भागातील दुकानांमध्ये मागील आठ-दहा दिवसांपासून ग्राहकांची मोठी गर्दी आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे ते रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. साड्यांच्या दुकानांमध्ये महिलांची तर लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी पालकांची गर्दी दिसत आहे. किराणा दुकानांमध्ये देखील चार-चार दिवसांचे वेटिंग आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही सोलापूर शहरातील दुकानांमध्ये विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. प्रत्येक दुकानामध्ये आलेल्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण
कोरोनानंतर पहिल्यांदाच यंदाच्या दिवाळीत ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदाची उलाढाल तिपटीने वाढली आहे. दिवाळीनिमित्त काही दिवसांच्या सुट्या असल्याने नवी पेठेतील छोट्या- मोठ्या एक हजार दुकानांची उलाढाल चांगली असून त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
- अशोक मुळीक, अध्यक्ष, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर
दहा दिवसांत पाच हजारांवर वाहनांची विक्री
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वाहने खरेदीची क्रेझ आजही कायम आहे. सोलापूर शहर व परिसरात चाळीसहून अधिक शोरूम आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी वाहनांच्या खरेदीसाठी मागील दहा दिवसांत ग्राहकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात यंदा दिवाळीच्या निमित्ताने दहा दिवसांत पाच हजारांवर वाहनांची विक्री झाली आहे. त्यात दुचाकी साडेचार हजार तर चारचाकी पाचशे आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------
घर, खुल्या जागा खरेदीतही गुंतवणूक
दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी स्वत:च्या हक्काची घरे खरेदी केली आहेत. याशिवाय अनेकांनी गुंतवणूक म्हणून शहराच्या विविध भागात खुल्या जागा घेऊन ठेवल्या आहेत. घर, फ्लॅटची किंमत २२ ते ४० लाख रुपयांपर्यंत असून खुल्या जागांच्या किमती परिसरनिहाय वेगवेगळ्या (आठ ते २२ लाख रुपये गुंठा) आहेत. रिअल इस्टेटमध्ये देखील यंदाच्या दिवाळीत कोट्यवधींची गुंतवणूक झाल्याची स्थिती आहे. दुसरीकडे, सोने, चांदीचे दर वाढलेले असतानाही दागिने खरेदीसाठी सराफ बाजारात मोठी गर्दी आहे, हे विशेष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.