Mumbai News : शिंदेंना गटनेतेपदावरून काढण्याचा ठराव बनावट

सुनावणीदरम्यान सुनील प्रभू यांना पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
resolution to remove cm Shinde from post of group leader is fake attempt to catch Sunil Prabhu
resolution to remove cm Shinde from post of group leader is fake attempt to catch Sunil Prabhuesakal
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुरु असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचा व्हीप बनावट असल्याच्या आरोपानंतर, आज झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदावरून काढून आमदार अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचा ठराव आणि त्यावरील अनुमोदनाच्या सह्या बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला.

त्याचबरोबर या बनावटगिरीला पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू हेच जबाबदार असल्याचाही आरोप शिंदे गटाने केला. मात्र, आतापर्यंत संयम बाळगून असलेल्या प्रभू यांनी आक्रमक भूमिका घेत, ‘तुम्ही मला गुन्हेगार बनवत आहात,’ असा आक्षेप घेतला. त्यामुळे सुनावणीत दोन्ही गटाचे वकील एकमेकांना चांगलेच भिडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २१ जून, २०२२ ला ‘वर्षा’वर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक बोलाविण्यात आली होती.

या बैठकीत एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबाबतच्या ठरावावर मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड यांनी सह्या केल्या.

मात्र, त्यांनी या ठरावावर अनुमोदक म्हणून सह्या केल्याच नाहीत, असा पवित्रा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेतला. ‘‘त्यांच्या या सह्या बोगस आहेत. या बनावटगिरीला तुम्ही जबाबदार आहात,’’

असा थेट आरोप शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर केल्यानंतर आमदार प्रभू यांचा संयम सुटला. ‘‘मला या कठड्यात आणून गुन्हेगार बनवले जात आहे.’’ असा पलटवार प्रभू यांनी केला.

‘‘रवींद्र वायकर यांनी ठराव मांडला. त्यानंतर या ठरावावर सर्वांनी सह्या केल्या. तसेच या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांच्या सह्यांचे रजिस्टर मी याआधीच अध्यक्षांना सादर केले आहे.

हवे असल्यास ते पुन्हा सादर करू शकतो किंवा तुम्ही पाहू शकता. त्यात राठोड, भुसे आणि सामंत यांच्या सह्या आहेत. ठरावावर सह्या केल्या त्यावेळी मी समोर होतो. मी घटनेची शपथ घेऊन खोटे कसे काय बोलू शकतो,’’ असा सवाल प्रभू यांनी केला.

‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीत उद्धव ठाकरे यांना दिलेल्या समर्थनाचाही ठराव करण्यात आला होता. आज झालेल्या युक्तिवादात या ठरावाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक

  • नोव्हेंबर २८, २९ आणि ३०

  • डिसेंबर १, २, ५, ६ आणि ७

  • डिसेंबर ११ ते १५ सलग सुनावणी

  • डिसेंबर १८ ते २२ सलग सुनावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.