लोकसभा निवडणुकीपूर्वी निकाल शक्य! खासदारांच्या जातीची कागदपत्रे अक्कलकोट तहसीलदारांनी पाठविली परराज्यातील फॉरेन्सिक लॅबला
सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राची खात्री आता त्यांच्या वडिलांच्या १९१५ मधील जन्म-मृत्यू नोंदवहीवरून केली जाणार आहे. त्यासाठी अक्कलकोट तहसीलदारांनी गौडगाव (ता. अक्कलकोट) ग्रामपंचायतीकडील ती नोंदवही पडताळणीसाठी महाराष्ट्राबाहेरील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. समितीच्या तत्कालीन अध्यक्षांच्या निकालानुसार खासदारांकडील जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पण, आपल्याला म्हणणे मांडायला व कागदपत्रे सादर करायला पुरेसा वेळ दिला जात नसल्याबद्दल खासदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यांत फेर चौकशी करून निकाल देणे अपेक्षित होते. तत्पूर्वी, समितीचे नूतन अध्यक्ष बी. जी. पवार यांनी दक्षता पथक नेमले, सुनावणीला सुरवात केली. त्यावेळी जात प्रमाणपत्राची पडताळणी करताना गौडगाव ग्रामपंचायतीकडील डॉ. महास्वामींच्या वडिलांच्या जन्म-मृत्यू नोंदवहीची न्यायवैद्यक प्रयोगशाळेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी खासदारांच्या वकिलांनी केली.
तक्रारदारांनी आक्षेप घेतला, पण नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार समितीने खासदारांच्या वकिलांची मागणी मान्य केली. अक्कलकोट तहसीलदारांना त्यासंबंधीचे आदेश दिले. अक्कलकोट तहसीलदारांनी परराज्यातील शासकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे संबंधित कागदपत्रे पाठविली आहेत. आता त्या नोंदवहीतील शाई १०८ वर्षांपूर्वीचीच की कालांतराने त्यावर जात नोंदली आहे, याची पडताळणी होणार आहे. त्यासंबंधीचा अहवाल कधीपर्यंत येईल यासंदर्भात सांगता येत नाही. त्यामुळे समितीने या प्रकरणात उच्च न्यायालयाकडे तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतिम निकाल शक्य
लोकसभेची निवडणूक एप्रिलमध्ये होवू शकते. तत्पूर्वी, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात जात पडताळणी समितीने उच्च न्यायालयात मागितलेली तीन महिन्यांची मुदत संपुष्टात येईल. भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण, याचे उत्तर कदाचित या निकालात दडलेले असू शकते, अशी चर्चा आहे. जात पडताळणी समितीकडे प्राप्त होणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडील जात प्रमाणपत्र वैध ठरल्यास त्यांना पुन्हा एकदा लोकसभेसाठी संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.