सोमय्यांनी पोलिसावर गाडी घातली का? याचीही चौकशी झाली पाहिजे
भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे घटना नेमकी काय घडली आहे यावर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. एका बाजूला राणा दाम्पत्याच्या 'मातोश्री'वरील आंदोलनामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष वाढला असताना आता सोमय्या यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. या हल्ल्याची चौकशी करुन हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी भाजपाकडून जोर लगावला जात आहे.
भाजपा नेते सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता कॉंग्रसेच्या सचिन सावंत यांनी या वादात उडी घेतली आहे. ट्विट करत त्यांनी किरीट सोमय्यांनी पोलिसावर गाडी घातली का? याचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात सावंत यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, किरीट सोमय्यांच्या आरोपांची पोलिसांनी चौकशी करावी. पण अगोदर त्यांनी पोलिसावर गाडी घातली का? याचीही चौकशी झाली पाहिजे. टीव्हीवर दिसतंय की एका पोलिस कर्मचाऱ्याने अखेरच्या क्षणी उडी मारली नसती तर तो सोमय्यांच्या वाहनाखाली चिरडला गेला असता. लखीमपूर खिरी झाले असते, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलिस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलिस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकले. या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले असल्याने आता भाजपाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.