विजयसिंह मोहिते पाटलांच्या सारखा तगडा उमेदवार आहे म्हटंल्यावर माढ्याची लढत एकतर्फीच होईल असं राजकीय पंडितांना वाटत होतं, मात्र.....
सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेतून माघार घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला असून त्यांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील, असा विश्वासही सदाभाऊंनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेमुळ चर्चेत आलेल्या सदाभांऊसंदर्भात आता सोलापुरातून एक वेगळी बातमी समोर येत आहे. (Sadabhau khot latest political News)
2014 सालच्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये राहिलेले 66 हजार 450 रुपयांचे बिल सदाभाऊ खोत यांनी दिले नसल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील मांजरीतील हॉटेल मालकाने केला आहे. अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊंचा ताफा अडवला आणि पैशाची मागणी केली आहे. माझे पैसे टाका अशा भाषेत शिनगारे यांनी सदाभाऊंकडे उधारी मागितली. अनेकवेळा फोन करूनही तुम्ही पैसे दिलेले नाही असा आरोपही हॉटेल मालक शिनगारे यांनी केला आहे. या घटनेमुळे आता राजकीय वर्तुळात एका वेगळ्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावरही व्हायरल झाला आहे.
काय आहे हा नेमका वाद?
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघात सदाभाऊ खोत हे भाजपचे उमेदवार होते. निवडणूक प्रचारावेळी सदाभाऊ खोत यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना शिनगारे यांच्या हॉटेलमध्ये नेले होते. त्यावेळी जेवणाचे बील 66, 450 इतके झाले होते. मात्र, या वेळी त्यांनी पैसे नंतर देतो असे सांगून सदाभाऊ याचे चिरंजीव बाहेर पडले आणि या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला. रखडलेले बिल मात्र उधारीवर तसेच राहिले. यावर शिनगारे यांनी उधारीच्या थकीत बिलासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, बघू, देऊ, असे म्हणत चालढकल केली गेली. त्यामुळे आता वैतागलेल्या हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांनाच गाठून त्यांचा ताफा अडवला.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता 'माढा'
या घटनेमुळे पुन्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा माढा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ असा एकत्रित माढा लोकसभा मतदार संघ तयार करण्यात आला. मात्र विजयी उमेदवारापेक्षा हा मतदार संघ पराभुत उमेदवाराला लकी असल्याचा इतिहास सांगतो. २०१४ च्या माढाच्या एका निवडणुकीपासून रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात फेमस झाले होते.
राजू शेट्टींचा उजवा हात म्हणून सदाभाऊंची ओळख होती
2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती. भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडली. विजयसिंह मोहिते पाटलांच्या सारखा तगडा उमेदवार आहे म्हटंल्यावर माढ्याची लढत एकतर्फीच होईल असं राजकीय पंडितांना वाटत होतं. पण स्वाभिमानाने तिथून आपले तेजतर्रार नेते सदाभाऊ खोत यांना उभं केलं. त्याकाळात सदाभाऊ खोत हे शेतकरी आंदोलनातील एक सर्वसामान्य कार्यकर्ते होते. राजू शेट्टी यांचा उजवा हात म्हणून त्यांना ओळखलं जायचं.
..अन् माढ्याची ही लढत चुरशीने झाली
सातारा, सोलापूर जिल्ह्यात बसलेल्या माढा या मतदारसंघाशी त्यांचा थेट संपर्क नव्हता, मात्र तरीही त्यांनी गावोगावी जाऊन आपला प्रचार सुरु केला. त्यांची रांगडी भाषणं, त्याकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेविषयी असलेला जनतेमधला विश्वास, मोदी लाट याचा सदाभाऊ खोत यांना फायदा झाला. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढवली. या सगळ्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही माढ्याची ही लढत अत्यंत चुरशीने खेळण्यात आली.
राज्याच्या राजकारणात सदाभाऊंचं नाव फेमस
सदाभाऊ खोत यांनी विजूसिंह मोहिते पाटलांना त्यांच्या घरच्या मैदानात घाम फोडला. सदाभाऊंना ४६४, ६४५ तर विजयसिंह मोहिते पाटील यांना ४८९,९८९ मते मिळाली. त्यांचे बंधू प्रकाशसिंह मोहिते पाटील यांनी जवळपास २५ हजार मते खेचून घेतली. सदाभाऊंना अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागला. शरद पवार जिथून निवडून आले होते, त्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच मोहिते पाटलांना तुल्यबळ लढत देणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सदाभाऊ खोत यांची देशभर चर्चा झाली. तिथून सदाभाऊ खोत हे नाव राज्याच्या राजकारणात फेमस झालं.
पुढे देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये सदाभाऊ खोत याना विधानपरिषदेवर घेतलं आणि कृषीराज्यमंत्रीही केलं. आज सदाभाऊ खोत स्वाभिमानी संघटनेपासून दूर झाले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. यावेळी त्यांची विधानपरिषदेची संधी हुकली असली तरी त्यांचं राजकीय महत्व अजूनही कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.