पुणे : प्रसिद्ध बालसाहित्यिका व कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांना बाल साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. साहित्य अकादमीतर्फे बावीस भाषांमधील बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, त्यातील मराठी भाषेतील पुरस्काराचा सन्मान डॉ. बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकाला मिळाला आहे.
‘गेली तीस वर्षे मी मुलांमध्ये काम करते आहे. बाल साहित्याचा दर्जा दुय्यम आहे, अशा टीकेकडे दुर्लक्ष करत मी हे काम करत आले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या कामाची दखल घेतल्या गेली, याचे समाधान आहे. मुलांनी दैनंदिनी लिहावी, या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे अनेक मुलांनी दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात केली आहे. या पुरस्कारामुळे हे पुस्तक अधिक मुलांपर्यंत पोहोचून ते देखील दैनंदिनी लिहण्यास सुरूवात करतील, अशी आशा आहे’, अशी भावना डॉ. बर्वे यांनी व्यक्त केली.
डॉ. बर्वे या आयुर्वेद शास्त्राच्या पदवीधर असून गेली अनेक वर्षे बाल साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे ‘मृगतृष्णा’, ‘दिवसाच्या वाटेवरुन’, ‘अंतरीच्या गर्भी’ हे कवितासंग्रह आणि ‘गंमत झाली भारी’, ‘उजेडाचा गाव’, ‘रानफुले’, ‘झाड आजोबा’, ‘खारूताई आणि सावलीबाई’, ‘मिनूचे मनोगत’, ‘भोपळ्याचे बी’, ‘नलदमयंती आणि इतर कथा’ आदी बालसाहित्य प्रकाशित आहे. त्यांना राज्य सरकारचा कवीवर्य भा. रा. तांबे आणि साने गुरुजी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ह. पाटील पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत योजनेंतर्गत उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
बालसाहित्यातील प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन २०१५ साली २६ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बर्वे यांची सन्मानाने निवड करण्यात आली होती. सध्या त्या अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.