Marathi Sahitya Sammelan 2023 : आज मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात होत आहे. यंदा ९६ वे साहित्य संमेलन असून ते वर्ध्यात भरवले गेले आहे. साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच या संमेलनाची ओढ लागलेली असते. त्यानिमित्ताने लेखक, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते एकत्र येतात आणि व्याख्याने, परिसंवाद, कवीसंमेलन यांनी ते साहित्य संमेलन तीन दिवस विविध अंगांनी फुलत जाते.
आजवर अनेक मान्यवरांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले आहे. पण, पहिले मराठी साहित्य संमेलन कोणी सुरू केले आणि ते कुठे भरवण्यात आले होते याबद्दल तूम्हाला माहिती आहे का? आज याच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ.
साहित्य संमेलनामागील विचार
1८६५ मध्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने रानडे यांनी १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले.
वाचकांचा, साहित्यिकांचा आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा म्हणजे मराठी साहित्य संमेलन होय. असे वर्णन अनेक पुस्तकात करण्यात आले आहे. हे संमेलन भरवण्याचा विचार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या मनात आला. त्यांच्याचमुळे तो विचार सत्यातही उतरला.
त्याकाळात मराठी भाषेची अवस्था तेव्हाही चांगली नव्हतीच. मराठी भाषेला पुन्हा नव्याने बहर यावा, ग्रंथकारांना उत्तेजन मिळावे, वाचक-ग्रंथकार यांचा मिलाफ व्हावा; निदान ग्रंथकारांची एकमेकांत नीट ओळख तरी व्हावी असा विचार रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केला.
त्यांच्या पुढाकारानेच 1878 साली आधी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. पण, केवळ दोघांच्या पुढाकाराने हि चळवळ उभी राहणे अशक्यच होती. त्यामुळे दोघांनी ‘ज्ञानप्रकाशा’त जाहीर पत्रक प्रसिद्ध केले. त्यांनी थेट वाचकांसमोर मंडळाची कल्पना मांडली. या कल्पनेला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लेखकांनी आणि वाचकांनी त्यांचे कौतूकच केले.
कुठे पार पडले संमेलन
अखेर तो दिवस उजाडला. जेव्हा मराठी वाचवाची अनोखी चळवळ उभी राहिली. ७ फेब्रुवारी १८७८ रोजी पहिले ग्रंथकार संमेलन घ्यायचे ठरले. आणी त्यासाठी पुण्यातील हिराबाग हे ठिकाण निवडलेे. हिराबाग हा आता अत्यंत वर्दळीचा चौक आहे.
हिराबाग या शब्दावरून बागेशी संबंध असावा, अशी कल्पना येऊ शकते. पण या ठिकाणी पूर्वी बाग, तळे आणि रंजन महाल होता असे सांगितले, तर ते अनेकांना खरे वाटणार नाही. पेशवेकालीन निसर्गरम्य परिसर म्हणून हिराबागेची नोंद आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सध्या चौकाचे रूप पालटले असले, तरी आजही हिराबाग परिसर बहुतेक पुणेकरांच्या परिचयाचा आहे.
हिराबागेचा थोडक्यात इतिहास
हिराबागेचे संदर्भ पेशवेकाळापर्यंत आहेत. नानासाहेब ऊर्फ बाळाजी बाजीराव पेशवे यांनी १७५५मध्ये पर्वती तळ्याकाठी बागेसाठी जागा निवडून तेथे घर बांधले. तेथेच एक तळे बांधले. त्यामुळे बाग फुलली. इंग्रजांनी या घराचा उल्लेख 'प्लेजर हाउस' असा केला. दुसऱ्या बाजीरावांच्या काळात हिरा नावाची नायकीण होती. तिच्या नावावरून बाग वसवल्याचे म्हटले जाते.
मात्र ही बाग नानासाहेबांनी वसवल्याचा संदर्भ उन्मेष प्रकाशन प्रकाशित आणि डॉ. अविनाश सोवनी लिखित 'हरवलेले पुणे' या पुस्तकात आहे. पुढे रंजन महालासमोरचे तळे आटले आणि बाग उजाड झाली. तेथे सणस मैदान उभे राहिले. समोरची सारसबाग प्रसिद्ध झाली. हिराबाग ही शब्दरूपाने आज जिवंत आहे.
११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.
पहिले संमेलन उत्साहात पार पडले. त्यामूळे दुसरे संमेलन त्यानंतर सात वर्षानी १८८५ पुण्यातच कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तिसरे संमेलन भरण्यासाठी त्यानंतर वीस वर्षाचा कालावधी लागला १९०५ मध्ये हे संमेलन पुण्याबाहेर, सातार्यास भरले.
तर चौंथे संमेलन १९०६ मध्ये पुण्यामध्ये भरले. यासाठी टिळक- केळकर –खाडिळकर ह्यांसारख्या मंडळींचा होता. याच संमेलनामध्ये २७ मे रोजी ‘महाराष्ट्र साहित्य -परिषदेची’ स्थापना करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.