मुंबई - लोकांच्या सुख-दुःखांची नोंद कायम ‘सकाळ’ वृत्तपत्रात घेण्यात आली आहे. सामान्यांना अस्वस्थ करणाऱ्या विषयांवर ‘मुक्तचिंतन’ आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध ‘बंड’ किंवा ‘दुरुस्तीचा आग्रह’ ‘सकाळ’मध्ये पूर्वीपासूनच धरला जात असे. आजही तीच परंपरा सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
नानासाहेब परूळेकर यांच्यापासून सुरू झालेला पत्रकारितेचा वसा आजही ‘सकाळ’मध्ये जपला जात आहे. त्याच मुशीत घडलेल्या राहुल गडपाले यांचे वैशिष्ट्य म्हणजे, समाजाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींवर परखड भाष्य... त्यामुळेच त्यांचे ‘अवतरणार्थ’ पुस्तक वेगळे ठरते, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या ‘अवतरण’ पुरवणीमधील ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांच्या लेखमालेवर आधारित ‘अवतरणार्थ’ पुस्तकाचे प्रकाशन आज नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील रंगस्वर सभागृहात झाले. त्यावेळी पवार बोलत होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ नेते किशोर बोरकर, माजी खासदार अनंत गुढे आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या देवळाच्या राजकारणाचा योजनाबद्ध प्रयत्न - पवार
‘देवाविषयी समाजाची आस्था असेल तर त्याबाबत तक्रारीचे कारण नाही; मात्र देवळाच्या राजकारणाच्या विषयावर वेगळे जनमत तयार करणे आणि त्यावर लिहिणे याचा जाणून-बुजून योजनाबद्ध प्रयत्न होत आहे. ज्याचा उल्लेख प्रबोधनकारांनी ‘थोतांड’ असा केला, ज्या चुकीच्या गोष्टींचा उल्लेख प्रबोधनकारांनी केला, त्या मांडण्याचा आणि समाजावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ‘सकाळ प्रकाशन’च्या राहुल गडपाले लिखित ‘अवतरणार्थ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
उजनी धरणामुळे पंढरपुरात जाणारी वारकऱ्यांसाठी धार्मिकदृष्ट्या पवित्र असलेली चंद्रभागा अडवल्याचा किस्सा पवार यांनी या वेळी सांगितला. एकादशीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करून वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेतात. उजनी धरणाचे उद्घाटन करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले, की ‘पांडुरंगा तुझी चंद्रभागा अडवली, त्यामुळे आम्ही या नदीत स्नान करणार नाही आणि तुझ्या दर्शनाला येणार नाही, असे समजू नको.
उलट हे पाणी शेतात नेऊन त्यातून आम्ही ज्वारी पिकवू आणि तो बळीराजा पंढरपूरऐवजी कणसातला दाणा बघून त्याला त्यात तुझे दर्शन होईल. त्यामुळे त्याला पंढरपूरला जायचे काही कारण राहणार नाही’, असा खुद्द यशवंतरावांचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
याचा अर्थ यशवंतराव चव्हाण यांना त्या कणसातच पांडुरंग आणि देव दिसला. अशी देवाची आस्था समाजाला असेल तर त्याबाबत वेगळा विचार करण्याची गरज नाही, असेही पवार यांनी दाखवून दिले; मात्र विषमतेला प्रोत्साहन देण्याचे काम सध्या होत असल्याचे दिसत आहे, असेही पवार म्हणाले.
‘सगळीकडे अंधार, तरी ठिणगी पुरेशी!’
‘सगळीकडे अंधार पसरला आहे, आता आपले काय होणार, अशी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. अंधार जरी असला तरी एक ठिणगी पुरेशी आहे आणि त्या ठिणगीचे काम तुमची पत्रकारिता करीत आहे,’ असे ठाम प्रतिपादन करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांचे अभिनंदन केले.
‘सध्या जे काही चालले आहे, ते वेगळेच आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असे आपण फार गोड वर्णन करतो; परंतु या चौथ्या स्तंभाला आता सत्ताधाऱ्यांच्या वाळवीने पोखरले आहे, त्या स्तंभाला वाळवी लागलेली आहे’, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली. काही काही शब्द नवनवीन येऊ लागले. पूर्वी ‘हिडीस’ शब्द वापरला जायचा, आता त्याची जागा ‘इडी’स या शब्दाने घेतली आहे. असा कारभार कधीही नव्हता. ज्यांच्या चौकशा लावल्या किंवा ज्यांच्यावर आरोप ठेवले, त्या सगळ्यांना ‘क्लीन चिट’ दिली जात आहे.
माझे म्हणणे असे आहे, देशात समान कायदा आहे त्यानुसार सर्वांना समान वागवा, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना आपल्याकडे घेऊन त्याला क्लीन चिट दिली जात आहे. हे सरकार ‘क्लीन चिटर सरकार’ आहे असा आरोप करून उद्धव ठाकरे म्हणाले, की उद्या भूपेश बघेल हा तिकडे गेला तर ‘महादेवी ॲप’चे ‘हर हर महादेव’ होईल.
राहुल गडपाले यांनी जे शिक्षण घेतले, त्यापेक्षा पत्रकारितेचे वेगळे क्षेत्र त्यांनी निवडले. त्याचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरे म्हणाले की, मी ही चित्रकार, फोटोग्राफर, व्यंगचित्रकार होतो; पण मी मुख्यमंत्री कधी होईन असे मला वाटले नव्हते, पण जमेल तेवढे केले आणि महाराष्ट्रातल्या जनतेने मला स्वीकारले, कुटुंबप्रमुख म्हणून मला मान मिळाला. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे ठाकरे या वेळी म्हणाले.
‘टीका करा, पण ओरबाडू नका’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नानासाहेब परूळेकर यांची एक आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘सकाळ’ आणि इतर वर्तमानपत्र यांमध्ये फरक असायचा. इतर वर्तमानपत्रांमध्ये ठसठशीत मथळे छापले जात आणि आपण तसे न करता, बातम्या छापत. त्यावर परूळेकर म्हणाले, की आपण वर्तमानपत्र वाचकांसाठी चालवतो आणि त्यातील प्रत्येक कॉलम-सेंटिमीटरवर वाचकांचा हक्क आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त बातम्या देणे हे आपले कर्तव्य आहे आणि बातम्यांमध्ये ‘बात’ नसावी आणि ‘मी’ही नसावा. तुम्ही जरूर टीका करा; पण टीका करणे आणि ओरबाडणे यात फरक आहे. एखाद्याला ओरबाडून रक्तबंबाळ करणे हे बरे नाही. त्याला समजावून सांगायला हवे, की तू जे करतोस ते बरोबर नाही, चूक समजावून सांगितली पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘फोटो चोरून निर्भीड होता येत नाही’
प्रबोधनकार कसे घडले, या विषयी बोलायचे म्हटले तर भरपूर वेळ लागेल, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, ‘प्रबोधनकार हे प्रवाहाच्या विरोधात गेले, ते निस्वार्थी, निस्पृह, निर्भीड होते; सहजासहजी प्रबोधनकार होता येत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपणास लाभला आहे.
प्रबोधनकारांना जिंकण्याची फिकर नव्हती आणि हरण्याची भीती नव्हती. ते परखड होते, त्यांनी ढोंगावर लाथ मारली, दुसऱ्याचे विचार, फोटो चोरून निर्भीड होता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.