Sakal Survey 2024 : शिंदेंचे गारुड

कट्टर शिवसैनिक, उत्तम संघटक म्हणून सर्वांना परिचित असलेले एकनाथ शिंदे कधी शिवसेनेतून बाहेर पडतील, असे काही वर्षांपूर्वी कुणी सांगितले असते तर त्यावर कुणाचा विश्वास बसला नसता.
Sakal Survey 2024
Sakal Survey 2024sakal
Updated on

कट्टर शिवसैनिक, उत्तम संघटक म्हणून सर्वांना परिचित असलेले एकनाथ शिंदे कधी शिवसेनेतून बाहेर पडतील, असे काही वर्षांपूर्वी कुणी सांगितले असते तर त्यावर कुणाचा विश्वास बसला नसता. शिवसेनेला बंडाची पार्श्वभूमी आहे. आजवर अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली आणि दुसऱ्या पक्षांसोबत नवी मांडणी केली; मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच आपल्या ताब्यात घेतली. पक्ष हा कुणा एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची मालमत्ता नाही, तर पक्षावर खरा हक्क असतो तो कार्यकर्त्यांचा, अशी नवीनच मांडणी करत त्यांनी शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकले. शिवसेनेच्या बंडानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या साथीने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात सरकार येईल आणि शिंदेंना चांगली खाती मिळतील. फार फार तर त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी सर्वसाधारण धारणा होती; पण प्रत्यक्षात जे झाले त्याने सर्वांनाच धक्का बसला. आधी मुख्यमंत्रिपद उपभोगलेल्या देवेंद्र फडणवीसांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लागणे, हे त्यापेक्षाही धक्कादायक होते. शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली, असे तेव्हा राजकीय धुरीणांना वाटले आणि तेथेच त्यांनी शिंदेंना ओळखण्यात चूक केली.

आता शिंदे मुख्यमंत्री झाले तो दिवस आठवा आणि आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहा. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला विकसित केले ते अचंबित करणारे आहे. अत्यंत कमी बोलणारा हा नेता आज सभागृहात उत्तम बॅटिंग करतो, हास्याचे फवारे उडवतो आणि विरोधकांना चिमटेही काढतो. बाहेर निवडणुकीच्या मैदानात त्यांनी दाखवलेला परफॉर्मन्स त्यांची महाराष्ट्रावरील पकड अधिक घट्ट करतोय, हे एव्हाना आता सर्वांच्या लक्षात आले असेलच. त्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या गणितात शिंदे हे अधिक जागांचे प्रबळ दावेदार असतील. एवढेच नाही, तर त्यांच्याच नेतृत्वात महायुती आगामी निवडणुकांना सामोरी जाईल, हे आता स्पष्टच झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवून आणणाऱ्या शिंदेंना लाईटली घेणे विरोधकांना महागात पडू शकते. त्यांची महाराष्ट्रातील लोकप्रियता आता झपाट्याने वाढायला लागली आहे. त्यांच्या कार्यशैलीला समाजमाध्यमांवर मिळणारा प्रतिसाद पाहता पुढच्या टर्मलाही ते मुख्यमंत्रिदाचे प्रबळ दावेदार असतील, यात शंका नाही.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत असतानाही शिंदे असेच धडाडीने काम करायचे. त्यामुळे कुठलाही मोठा मोर्चा असो की जाहीर सभा, महापालिकेची निवडणूक असो किंवा विधानसभा, लोकसभा- त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी असायची. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही मुख्यमंत्र्यांकडे असते ते नगरविकास खाते शिंदेंना देण्यात आले, त्यावरूनच त्यांची त्यांच्या पक्षातील पकड ही किती मजबूत होती, हे लक्षात येते. त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याचेही उद्धव ठाकरे यांनी मान्य केले होते; मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारावे लागले. दरम्यान काही प्रकरणांमध्ये त्यांना मिळालेली वागणूक त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांच्यातला बंडखोर शिवसैनिक जागा झाला. त्यातूनच महाराष्ट्राला अचानकपणे एक नवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मिळाला. जे राजकीय नाट्य झाले त्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गद्दार म्हणून हिणवायला सुरुवात केली. घटनाबाह्य सरकार आणि गद्दारीचा ठपका पाठीवर असूनही आज शिंदे एक मातब्बर नेते म्हणून नावलौकिक मिळवताना दिसतात.

शिंदे मात्र महायुतीतील सर्वात उत्तम परफॉर्मन्स देणारे नेते ठरले. कमी जागा लढवूनही महायुतीतील त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम होता. गद्दार म्हणून विरोधक हिणवत असताना आणि भक्कम विरोधी नॅरेटिव्ह उभे केले जात असतानाही त्यांचा लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्स मात्र काहीतरी निराळेच संकेत देणारा आहे. विरोधकांकडून कितीही कडवा शब्दाघात झाला, तरी त्यांनी बोलताना स्वतःचा तोल ढळू दिला नाही, हे विशेष. त्याच्या सोबतीला असणारे मात्र त्याला अपवाद आहेत. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी मात्र नेहमीच आपल्या बोलभांडपणामुळे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणले. राहुल शेवाळेंसारख्यांच्या खासगी प्रकरणांनी अनेकदा शिंदेंना कोड्यात टाकले; मात्र इतक्या कठीण परिस्थितीतही त्यांच्या शिवसेनेला लोकांची पसंती आहे, हे आता त्यांना सांगता येणार आहे.

मदतीस तत्पर

कोरोना काळात पीपीई किट घालून रुग्णालयांमध्ये गस्त घालताना शिंदेंना लोकांनी पाहिले आहे. ईर्शाळवाडीसारख्या अत्यंत भीषण दुर्घटनेत मुसळधार पावसात थेट बचावकार्यात ते उतरले. डोंगर पालथे घालून घटनास्थळापर्यंत पोहोचले तेव्हापासून लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमालीचा बदलला. एक संवेदनशील आणि मदतीस तत्पर असलेला मुख्यमंत्री म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात.

महाराष्ट्रातील लोकांच्या मनात निर्णय घेण्यास तत्पर असलेला मुख्यमंत्री म्हणून लोकांनी एकनाथ शिंदेंना पसंती दिलेली आपल्याला या सर्वेक्षणातून दिसून येईल. मराठा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकारही लोकांच्या स्मरणात आहे. घेतलेले निर्णय अमलात आणण्यातही ते कार्यक्षम आहेत, असे महाराष्ट्रातील लोकांना वाटते. शिवाय त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचायला फार मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे त्यांना लोकांनी चांगली पसंती दिल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

महायुतीचा चेहरा

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक लाभ काँग्रेसला झाला. महायुतीमध्ये मात्र शिंदेंची शिवसेना सर्वाधिक यशस्वी ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही शिंदेंना स्वतःची जागेवरील मांड अधिक घट्ट करता आली. त्यांनी अत्यंत कुशलतेने लोकांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मुख्यमंत्रिपदाकरिता लोकपसंतीचे आणखी एक नाव पुढे आले आहे, असाच याचा अर्थ घेता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.