मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत तब्बल १०३ दिवसांनी आर्थर रोड तुरुंगातून ९ नोव्हेंबरच्या रात्री बाहेर आले. त्यानंतर सर्वात आधी त्यांनी निशाणा साधला तो शिवसेनेच्या फुटीर गटावर तो म्हणजे एकनाथ शिंदे गटावर... खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली, बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया असल्याची टीका संजय राऊतांनी केली. यावेळी त्यांनी अटकेची कारवाई करुन आतापर्यंतची सर्वात मोठी चूक केल्याची भाषा केली. शिवाय आपण जसे १०३ दिवस तुरुंगात राहिलो, तसेच १०३ आमदार निवडून आणू असा पवित्राही बोलून दाखवला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरच ९ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा संजय राऊत घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना उद्देशून हे भाषण करत होते. हेच भाषण त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लाईव्हही करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेचा किंग इज बॅक, राऊत इज नॉट आऊट अशा घोषणा राऊतांच्या समर्थनात दिल्या जात होत्या. (Sanjay Raut news in Marathi)
पण रात्र सरली, १० नोव्हेंबरची सकाळ उजाडली. आणि तशीच १२ तासात संजय राऊतांच्या तोंडून निघणारी आक्रमकतेची भाषाही बदललेली दिसली. राऊतांची भाषा नरमाईची असल्याचं दिसून आलं. कारण सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी चक्क फडणवीसांचं कौतुक केलं. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री फडणवीसच चालवत आहेत आणि बाकीचे हुंडारताहेत असं म्हणत शिंदेंवर नाव न घेता निशाणा साधला. याशिवाय राजकारणातली कटुता संपली पाहिजे या फडणवीसांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. आणि २ दिवसात आपण फडणवीसांना भेटणार असल्याचंही सांगितलं. शिवाय, देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाहांना भेटूनही आपण जे तुरुंगात भोगलंय त्याबद्दल सांगणार असल्याचंही राऊतांनी सांगितलं. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊतांनी आपली तलवार म्यान केली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
राष्ट्रवादी आणि मनसे नेत्यांनी यावरुनच राऊतांवर निशाणा साधला. पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट केलं आणि त्यात म्हटलंय- ED कडे असं कोणतं खास चॉकलेट आहे ? ज्याची चव चाखल्यानंतर माणूस गोड गोड बोलू लागतो.
तर तिकडे मनसे नेत्यांनीही राऊतांच्या या बदलत्या भाषाशैलीवरुन त्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. मनसे नेते अमेय खोपकर, गजानन काळेंनी खोचक शैलीत राऊतांवर निशाणा साधलाय.
अमेय खोपकरांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांची आज माध्यमांसमोरची पहिली प्रतिक्रिया ज्यात ते फडणवीसांचं कौतुक करताहेत तो व्हिडीओ टाकलाय आणि त्याला कॅप्शन दिलं ते म्हणजे- वाघ आला वाघ आला करत होते ना मग ही मांजर कुणाची सुटलीये !!
तर मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय-
कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता... सूर बदले बदले हैं जनाब के... राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील... लवंडे जोमात, मातोश्री कोमात... अशा शब्दात गजानन काळेंनी राऊतांना डिवचलं.
तर भारत जोडो यात्रेनिमित्त सध्या महाराष्ट्रात असलेल्या काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही राऊतांच्या भूमिकेवर सूचक वक्तव्य केलंय.
संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली त्याची किंमत चुकवली. मला वाटतं यापुढेही संजय राऊत केंद्र सरकारच्या कारवायांविरोधात बोलत राहतील अशी अपेक्षाही जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे राऊतांच्या नरमाईच्या भाषेवरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देताहेत. तिकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यातच शिंदे-फडणवीस गटातही एकमेकांवर अंतर्गत कुरघोड्याही सुरुच आहेत. अशातच राऊतांनी आज फडणवीसांचं केलेलं कौतुक आणि मोदी-शाहांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही. तरी, राऊतांच्या तुरुंगाबाहेर येण्यानं राज्याच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी बदलणार हे तर येत्या काळातच ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.