Sanjay Raut Press Conference : संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन भाजप, केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर आपल्या खास शैलित विरोधकांवर हल्लाबोल केला. याच पत्रकार परिषदेतील सात महत्वाचे मुद्दे नेमके काय हे जाणून घेऊ.
१) ...यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन
महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहेत. त्याविरोधात कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आपण शिवसेनेच्या वास्तूतुन फुंकतोय. बाळासाहेबांनी मंत्र दिला होता तो आयुष्यभरासाठी आहे. तु काही पाप केलं नसेल, गुन्हा केले नसेल तर तुमचं मन साफ आहे कुणाच्या बापाला घाबरू नका असं बाळासाहेब सांगायचे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा याच पद्धतीने पक्षाला पुढे घेऊन जातायेत. आम्हाला संदेश द्यायचाय की महाराष्ट्र भीत्र्यांची औलाद नाही, मराठी माणूस बेईमान नाही आणि तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असल्याचं राऊत म्हणाले.
२) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर
आमच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करतायत ते देशावरचं संकट आहे. असंच संकट पश्चिम बंगालवरही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरुय. खोटे आरोप, बदनामी सुरु आहे. एक तर तुम्ही गुडघे टेका किंवा सरकार आम्ही घालवू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातायत असं राऊत म्हणाले.
३) सोमय्यांवर निशाणा
मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेतो, राऊतांच्या घरी ईडीचे लोक पोहोचणार आहेत सांगितलं जातं, तुमच्या तपास यंत्रणांचा असा गैरवापर करून असा त्रास देता आणि तुम्हाला वाटतं की झुकू, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवलं नाही, तुम्ही काहीही करा सरकार पडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट आणि नील सोमय्या यांना ताबडतोब अटक करा. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे, सगळे पेपर्स मी ईडीकडे तीन वेळा पाठवले. गेल्या तीन महिन्यात किमान तीन वेळा ईडी कार्यालयात पाठवले अस राऊत म्हणाले.
४) ही लोकं कोण?
ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या...मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू...तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल. चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सुरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसं याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना देणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन...जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण? असा राऊत यांनी केला.
५) कुटुंबावर निशाणा का?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिल्या. अमित शहा, मोदींना विनंती आहे...हीच आहे का तुमची लोकशाही? तुम्ही मोठी भाषणं देता, अशा पद्धतीने धमक्या देताय, मुलांना टार्गेट करताय. अरे मला बोला... मी अमित शहांना फोन केला होताष त्यांना म्हटलं की, जे चाललंय ते योग्य नाही, माझ्याशी शत्रूत्व असेल तर मला पकडा, पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना का त्रास देताय. तुमच्या संस्था आमच्या मुलांना का छळतायत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तुमच्याही मुलीचं मागच्या काळात लग्न झालं. तिथे ९ कोटींचा गालीचा होता.
६) पत्रकारांची पिकनिक काढू...
त्यांनी जे आरोप केले आहेत, की आमचे १९ बंगले आहेत. आपण ४ गाड्या करून त्या १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, पत्रकारांची पिकनिक काढू जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन , दिसले नाहीत तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी, चला दाखवू त्यांना लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा हा प्रयत्न असल्याचं राऊत म्हणाले.
७) पिक्चर अभी बाकी है...
कहाणी अभी पुरी नही हूई, हा ट्रेलर, येत्या काळात काही व्हिडिओ, डॉक्युमेंट समोर आणेन. दिल्लीला जा किंवा ज्यो बायडेन यांच्याकडे जा, माझं आयुष्य संघर्षात गेलं, बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे आमच्या पाठिशी असल्याचं राऊत म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.