Sant Dnyaneshwar Maharaj : बंधुभेटीच्या सोहळ्याने गहिवरले वारकरी

संत ज्ञानेश्‍वर महाराज-संत सोपानदेव महाराज पालखीची भेट
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi SohalaSakal
Updated on

भंडी शेगाव - आई-वडिलांचा विरह, समाजाने नाकारल्यानंतर भाऊबहिणीची झालेली फरपट, कोवळ्या वयात घ्यावी लागलेली समाधी, हे प्रसंग आज लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर तरळले, ते संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव बंधू भेटीने. सध्या वैभवी लवाजम्यात निघत असलेले दोन्ही संतांचे पालखी सोहळे आणि चारही भावंडाची साडेसातशे वर्षांपूर्वी झालेली ताटातूट या प्रसंगाच्या आठवणींनी वारकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

वेळापूरमधील मुक्काम उरकून पालखी सोहळा भंडीशेगावकडे मार्गस्थ झाला. सकाळी ढगाळ वातावरणामुळे वाटचाल सुलभ झाली. ठाकूरबुवाच्या समाधीमंदिराजवळ पालखी सोहळा साडेआठ वाजता पोचला. येथील रिंगणात दिंड्या गोलाकार भजन करीत होत्या. त्यातून वाट काढत माउलींची पालखी मध्यभागी पोचली.

यावेळी सोहळाप्रमुख अॅड विकास ढगे, उर्जितसिंह शितोळे सरकार, राजाभाऊ आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार उपस्थित होते. रिंगणात आकर्षक रांगोळी काढली. अश्व रिंगणात आले. भोपळे दिंडीच्या मानकऱ्यांनी रिंगणाला तीन प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर अश्वांनी तीन फेऱ्या मारून नेत्रदीपक दौड केली.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
Ashadhi Ekadashi 2023 Date: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, तिथी आणि महत्व

भाविकांची अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडाली. रिंगणानंतरच उडीचा खेळ चांगलाच रंगला होता. त्यानंतर सोहळा चालू लागला. पालखी सोहळा नंदाच्या ओढ्याजवळ आला. येथे स्थानिकांनी तसेच वारकऱ्यांनी पालखीवर पाण्याचे तुषार उडविले. अनेक वारक-यांनी भिजण्याचा आनंद घेतला.नंदाचा ओढा ओलांडल्यानंतर तोंडले ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. उखळीच्या तोफांनी पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी केले. नंतर सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी थांबला.

जेवणानंतर दुपारी दोन वाजता सोहळा मार्गस्थ झाला. दरम्यान, दोन वाजता दसूर फाटा येथे पाऊस पडला. येथे रस्त्याच्या दुतर्फा संतांच्या पालख्यांच्या आगमनाची तसेच दर्शनासाठी वाट पाहणारे भाविक बसून होते. माऊलींचा रथ पाच वाजता बंधूभेटीसाठी पोचला. मागोमाग सोपानदेवांचा रथही आला. दोन्ही रथ शेजारी-शेजारी उभे करण्यात आले.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
Ashadhi Ekadashi 2023: पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नको, वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा - मुख्यमंत्री

माउलींच्या वतीने प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे, योगेश देसाई, प्रशांत सुरू, राजाभाऊ आरफळकर यांनी तर संत सोपानदेव महाराज पालखीचे सोहळाप्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी एकमेकांनी मानाचा नारळ-प्रसाद एकमेकांना दिला. भावांच्या पादुकांच्या भेटीने वारकरी, उपस्थीत भाविकांना गहिवरून आले.

बंधूभेटीचा सोहळा उरकून सर्व संतांच्या पालखीने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. पाठोपाठ माउलींच्या सोहळा मार्गस्थ होत भंडीशेगाव येथे मुक्कामी पोचला दरम्यान, बंधूभेटीच्या सोहळ्यापूर्वी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा याच मार्गाने पिराच्या कुरोलीत मुक्कामी गेला.

वारी वाटचाल विशेष

  • सकल संतांचे पालखी सोहळे एकाच मार्गावर

  • ढगाळ वातावरणामुळे आल्हाददायक वाटचाल

  • उडीचा खेळ सुरू असताना बाळासाहेब चोपदार यांना चक्कर आली.

  • रिंगणात राजकीय व्यक्तीचा सत्कार केल्याने उडीचा खेळ मधेच थांबविला

  • दुसरे उभे आणि शेवटचे गोल रिंगण उद्या (ता. २७) वाखरीत होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.