छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत संताप व्यक्त केली आहे.
छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली त्या छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करु नका अशा शब्दात संयोगिताराजे छत्रपती यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रामनवमीच्या दिवशी संयोगिताराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीता राजे छत्रपती यांनी केली आहे.
पूजेदरम्यान काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी महंतांना खडे बोल सुनावत रामरक्षा म्हटली.
पोस्टमध्ये नेमकं म्हटलंय?
हे श्रीरामा,
स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्यांना सद्बुद्धि दे...
हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे..
आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.
त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली!
मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच... तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.
या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही?अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…अजूनही खूप प्रवास बाकी आहे...अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.