नागपूर : महाविकास आघाडीच्या समान कार्यक्रमात सावरकर हा विषय नव्हता. सावरकर यांच्याविषयी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे विचार वेगवेगळे आहे. काँग्रेसने कधी विचारांशी तडजोड केली नसल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर मुद्द्यावर आघाडी फुटण्याची शक्यता फेटाळून लावली.
स्वा. सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने रोखठोक भूमिका घेतली आहे. या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सावरकर यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे सांगून राहुल गांधी यांना इशारा दिला.
त्यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचणे सुरू केले आहे. सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या आघाडीतून बाहेर पडा, हिंमत दाखवा असे आव्हान केले जात आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही घटना वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत.
सध्या लोकशाही आणि घटना वाचविणे ही मोठी लढाई आहे. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. नवीन काहीच नाही. या मुद्याचा वापर करून भाजप महविकास आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहे. यात त्यांना यश येणार नाही.
सत्ता गेल्यावर सावरकर आदर्श ः विखे
अमरावती - ‘‘हिंदुत्वासोबत फारकत घेत काँग्रेससोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांना सावरकर आदर्श वाटत नव्हते. आता त्यांना सत्ता जाताच आदर्श वाटायला लागले. हा त्यांचा दुटप्पीपणा असून त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे व मग सावरकरांबद्दल प्रेम व्यक्त करावे,’’ असे आव्हान महसूल मंत्री व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले विखे पाटील यांनी आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासोबत फारकत घेत पाठीत खंजीर खुपसत काँग्रेससोबत घरोबा केला. त्यावेळी सावरकर यांच्यावर टीका होत असताना ते गप्प का होते?
आता सत्ता गेल्यानंतर भाजपवर टीका करीत फिरत आहेत. त्यांनी आधी शरयू नदीमध्ये डुबकी घेऊन प्रायश्चित्त करावे व नंतर भाजपवर टीका करावी.’’भारत जोडो यात्रेबद्दल विखे म्हणाले, की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होती तेव्हा दुसरीकडे ‘काँग्रेस छोडो’ यात्राही सुरू होती. त्याचे तयांनी आत्मपरीक्षण करावे.
अदानींच्या मुद्द्यापासून भाजपचा पळ
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चोरांना चोर म्हटले आहे. ते माफी मागण्यास तयार नसल्याचे भाजप सावरकर यांचा विषय काढून जनतेची दिशाभूल करीत आहेत. अदानी व त्यांचे गैरव्यवहार या मुद्द्यापासून पळ काढण्यासाठी भाजपचा सर्व खटाटोप सुरू आहे. मात्र या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी काँग्रेस संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यावर ठाम असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
सावरकरांना ‘भारतरत्न’वर मौन
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला सावरकरांबद्दल फार प्रेम असेल तर त्यांना भारतरत्न द्यावे, या वक्तव्याचा समाचार घेताना विखे पाटील यांनी त्यासाठी राज्य सरकार सक्षम असून दानवे यांच्या सल्ल्याची गरज नसल्याचे सांगितले; मात्र भारतरत्न देणार का? या मुद्द्यावर मौन बाळगले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.