अकोला: राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा विद्यार्थ्यांना एकात्मिक पद्धतीने तीन भागांत पुस्तके वाटप होणार आहेत.
सर्व विषयांचा एकत्र समावेश असलेले एक पुस्तक तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी असेल. पाठ्यपुस्तकांतच वह्यांची पानेही दिलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या सुद्धा वेगळ्याने नेण्याची आवश्यकता राहणार नाही.
दरम्यान एकात्मिक पुस्तकांचे १०० टक्के संच जिल्ह्यात दाखल झाले असून सर्व पंचायत समिती स्तरावरुन २२ जूनपर्यंत एकात्मिक संचाचे वाटप शाळांना करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून समग्र शिक्षा अभियानातंर्गत दरवर्षी वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येतात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवी कोरी पुस्तके पडणार आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी २६ जून रोजी पुस्तके मिळणार आहेत.
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे शिक्षण विभागाने उन्हाळ्यातच पुस्तकांची मागणी नोंदविली होती. यंदा वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी पुस्तके राहणार नसून विद्यार्थ्यांना पहिल्या तीन महिन्यांसाठी एकात्मिक पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.
त्यानुसार जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमधील १ लाख ५८ हजार ८२१ विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पुस्तकांचा संच प्राप्त झाला आहे.
वह्यांपासूनही मिळणार सुटका
एकात्मिक पुस्तकात पाठ संपल्यानंतर पुस्तकाची काही पाने कोरी सोडण्यात आली आहेत. या पुस्तकान गृहपाठ करण्याची व्यवस्था सुद्धा आहे. त्यावरच प्रश्नोत्तरेही लिहिता येतील. त्यामुळे मिलांना शाळेत वह्या नेण्याची गरज राहणार नाही.
वर्षासाठी एकूण तीन भाग
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा एकात्मिक पुस्तकाची संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच एकात्मिक संचात सर्व विषयांची पुस्तके मिळतील. वर्षासाठी एकूण तीन भागात सदर संचाचा उपयोग विद्यार्थ्यांना करता येईल.
अशी आहे विद्यार्थी संख्या
तालुका विद्यार्थी
अकोला ४७२१७
अकोट २५७९२
बाळापूर २०३२९
बार्शीटाकळी १६८८१
पातूर १५६५३
मूर्तिजापूर १४६९०
तेल्हारा १८२५९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.