छत्रपती संभाजीनगर - मुले सामान्यतः दुसरीपर्यंत वाचायला शिकतात; परंतु नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (नॅस) २०२१ च्या अहवालानुसार राज्यातील तिसरीच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना वाचता येत नसल्याचे दिसून आले आहे. पाचवीच्या ४१ टक्के मुलांना ग्रेडस्तरावर योग्य मजकूर वाचता आला नाही. त्यामुळे वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उर्दू वाचन कार्यक्रमाद्वारे प्राथमिक शाळांतील मुलांमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘युनिसेफ’सोबत काम केले जात आहे.
या उपक्रमामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, युनिसेफ व रीड इंडिया यांच्या संयुक्त भागीदारीत ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने (मुंबई) मान्यता दिली आहे.
वयोगटानुसार पुस्तके देणार
या उपक्रमाअंतर्गत २०२६ पर्यंत राज्यातील तिसरीपर्यंतचे प्रत्येक मूल वाचन करू शकेल तर आठवीतील प्रत्येक मुल ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’ असे सुनिश्चित करणारी वाचनाची लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी समग्र शिक्षाअंतर्गत सर्व शासकीय शाळांत विद्यार्थ्यांना वयोगटानुसार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चळवळीची उद्दिष्टे
मुलांना वाचनाचे महत्त्व सांगणे, तिसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलांमध्ये वाचन कौशल्य निर्माण करणे
मुलांना वाचनाची संधी उपलब्ध करून देणे, लोकसहभागातून उपक्रमाला प्रसिद्धी देणे
वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील साहित्य उपलब्ध करून देणे, वाचकवर्ग तयार करणे
वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवणे
कथा, कविता, कादंबरी, नाटकाद्वारे मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे
मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवणे
उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी
साप्ताहिक दोन वाचन तासिका
गोष्टींचा शनिवार
आनंदाचा तास (शाळा सुरब होण्यापूर्वी कथा पुस्तकांचे वाचन)
डिजिटल संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन देणे
रीड इंडिया सेलिब्रेशन उपक्रम
ग्रंथोत्सव, पुस्तकांचे प्रदर्शन
पुस्तकांची उपलब्धता
अनेक इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटमुळे पुस्तकांपासून विद्यार्थी दूर चालले आहेत. ही बाब ओळखून पुन्हा एकदा मुलांना पुस्तकांकडे वळविणे गरजेचे झाले आहे. वाचनातून व्यक्तिमत्त्व घडते; कारण लेखकाचे प्रदीर्घकाळाचे अनुभव काही क्षणांत आपल्यापर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून पोचतात आणि आपल्या जीवनाचा भाग होतात. त्यामुळे हा वाचन संस्कार शाळेपासून सुरू झाला तर जीवनातील आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे पेलण्याची शक्ती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण होईल.
- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासन, ‘युनिसेफ’ व ‘रीड इंडिया’तर्फे वाचन चळवळ उपक्रम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरु करण्यात आला होता. आत तो राज्यभरात राबविला जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे.
- सुनीता राठोड, संचालक, विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.