नवी दिल्ली: महाविकास आघाडीचा राज्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, असे तिन्ही पक्षांचे नेते बोलत असले तरी जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आणखी ८ ते १० दिवस लागतील, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा जागावाटप जाहीर करण्याची पुढची तारीख दिली आहे.
शिवसेना (उध्दव ठाकरे गट) व काँग्रेसने अधिक जागा मागितल्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचे सांगितले जात आहे. गेल्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. शिवसेना (ठाकरे गट) आताही २३ जागांवर निवडणूक लढण्यास तयार आहे. परंतु काँग्रेसनेही जागांची संख्या वाढविली आहे. या दोन्ही पक्षांच्या वाढीव आकांक्षांमुळे पेच फसलेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशातील विविध राज्यांमध्ये घटक पक्षांशी जागावाटपाचा काय फॉर्म्युला राहिला पाहिजे, यासाठी आज काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीच्या सदस्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, भूपेश बघेल, खासदार मुकुल वासनिक, माजी मंत्री सलमान खुर्शीद व मोहन प्रकाश यांचा समावेश आहे. या समितीने राज्यांकडून मिळालेल्या अहवालावरून काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा केली.
यात प्रामुख्याने उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, बिहार व महाराष्ट्रातील जागांचा समावेश आहे. यात बिहारमध्ये काँग्रेस आठ जागांवर निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. इतर राज्यांबाबत मात्र निर्णय होऊ शकला नाही. राष्ट्रीय आघाडी समितीने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेस अध्यक्ष अंतिम निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समितीचे गठन करण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी आज काँग्रेसच्या जाहीरनामा समितीची बैठक पार पडली. या समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आहेत. गेल्या जाहीरनाम्यात न्याय योजना काँग्रेसने मांडली होती. परंतु या योजनेवरून मतदारांनी काँग्रेसला मते दिली नाही. आता नव्या जाहीरनाम्यात लोकप्रिय घोषणा कोणत्या राहणार आहे, याकडे सार्यांचे लक्ष आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, खासदार शशी थरूर, गौरव गोगोई, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी व माजी सनदी अधिकारी के. राजू उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.