CM Eknath Shinde : स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी!

माझ्यासाठी शेतकरी बांधव हा नेहमी प्राधान्याचा विषय आहे. मी स्वत: शेतकरी कुटुंबातून आलो आहे. काळ्या आईची सेवा करता करता मी मुख्यमंत्रिपदी विराजमान झालो.
Farmer
Farmersakal
Updated on

‘स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी,’ हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळ्यांवर सहाय्य करत आपला हा अन्नदाता सुखी, सुरक्षित रहावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दोन वर्षांत अनेक अभिनव योजना सुरू केल्या. आज महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोगत...

माझ्यासाठी शेतकरी बांधव हा नेहमी प्राधान्याचा विषय आहे. मी स्वत: शेतकरी कुटुंबातून आलो आहे. काळ्या आईची सेवा करता करता मी मुख्यमंत्रिपदी विराजमान झालो. आजही मी गावी शेतात राबण्यासाठी जातो. विरोधक त्याचेही राजकारण करतात आणि टीका करतात. जेव्हा मी दरे या माझ्या गावी शेतीत काम करतो. तेव्हा मला शेतकऱ्यांच्या दु:खाची तीव्रता कळते.

'स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी' हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. बी-बियाणांसाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादीबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’, ‘एक रुपयात पीक विमा’, ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान,’ अशा योजना सुरु केल्या आहेत.

१५ हजार कोटी रूपयांची मदत

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीला बळीराजा तोंड देतो. या संकटात मात्र आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना जुलै, २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत करण्यात आली.

नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २४ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना दोन हजार २५३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली.

खरीप हंगाम २०२३ करिता ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली आता संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी

नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ‘एक रुपयात पीक विमा योजने’अंतर्गत ५९ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना तीन हजार ५०४ कोटी ६६ लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आजतागायत एकूण ९२ लाख ४३ हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार १९० कोटी रुपये अदा करण्यात आली.

गाव तेथे गोदाम योजना

शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी ‘गाव तेथे गोदाम’ या योजनेत पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचे बांधकाम तसेच गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे. कापूस व सोयाबीनचा राज्य शेती उत्पनामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे किंमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यामुळे खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्याचा निर्णयही घोषित केला आहे.

अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरीता प्रतिरोपासाठी १७५ रूपये अनुदान देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक लाख २० हजार एकर क्षेत्रावर लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येईल.

सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत १०८ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून येत्या दोन वर्षात ६१ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पांतून सुमारे तीन लाख ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. येत्या तीन वर्षात सुमारे चार लाख २८ हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

जागतिक हवामान बदलामुळे शेतीत होणारे नुकसान टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत’ शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा भार उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ४४ लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार आहे. याकरिता १४ हजार ७६१ कोटी रुपये अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषीवाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जीकरण करण्याचा १५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी ‘मागेल त्याला सौरउर्जा पंप’ या योजनेअंतर्गत एकूण साडे आठ लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

सततच्या पावसाला आजपर्यंत कोणतीही मदत मिळत नव्हती ती आम्ही सुरु केली आहे. ‘एनडीआरएफ’च्या दरापेक्षा वाढीव मदत केली. हेक्टरी मर्यादाही वाढवून दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत ती वाढवली आहे. राज्याचा कृषी विकास दर कसा वाढेल असे प्रयत्न केले जात आहेत.

बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही

आमचे सरकार बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. बंद पाडलेले जलयुक्त शिवार अभियान आम्ही पुन्हा सुरू केले. मार्च २०२४ अखेर ४९ हजार ६५१ कामे पूर्ण झाली असून ६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी ती दुख:द असते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान होणार नाही, असं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल, यासाठी हा टास्क फोर्स काम करील. त्याचबरोबर कृषि पर्यटनाला चालना देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषि पर्यटन विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याबाबतही हा टास्क फोर्स काम करणार आहे.

महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक

आमच्या सरकारने महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. डिसेंबरमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करताहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास मला वाटतो.

(कै.) वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनला अधिक सक्षम करण्याचाही निर्णय घेतला आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगादा त्यामुळे निर्माण होणारा ताण-तणाव आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी याविषयावर काम करणार्या सर्वच क्षेत्रातील तज्ञ व अभ्यासकांची मदत घेण्यात येणार आहे.

शेतीचा शाश्वत विकास हाच ध्यास घेऊन आम्ही वाटचाल सुरू आहे. माझे सर्व शेतकरी बांधवांनो आवाहन आहे, कितीही नैसर्गिक संकटे आले तरी धीर सोडू नका. खचून जाऊ नका. शासन सदैव तुमच्या पाठीशीच नव्हे, तर तुमच्या सोबत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.