सव्वापाच हजार कोटींचा खर्च करून खरेदी केलेल्या शिवशाही व शिवनेरी बस गाड्यांमुळेच एसटी महामंडळ अडचणीत आल्याची बाब समोर आली आहे.
सोलापूर : सव्वापाच हजार कोटींचा खर्च करून खरेदी केलेल्या शिवशाही (Shivshahi Bus) व शिवनेरी बस (Shivneri Bus) गाड्यांमुळेच एसटी महामंडळ (Maharashtra State Transport Corporation) अडचणीत आल्याची बाब समोर आली आहे. लालपरीच्या तुलनेत या गाड्यांना अॅव्हरेज कमी, लालपरीच्या तुलनेत मोठी किंमत, अपघात सर्वाधिक, देखभाल-दुरुस्तीवरील सर्वाधिक खर्च, या बाबींचा विचार न करता महागड्या बस महामंडळाने खरेदी केल्या. चिंतेची बाब म्हणजे, या गाड्यांच्या उत्पन्नातून बस खरेदीचा खर्चही निघालेला नाही.
राज्यातील 92 टक्के खेडोपाड्यांपर्यंत पोचलेली लालपरी उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यातही प्रवाशांच्या सेवेसाठी अहारोत्र धावत असते. सर्वसामान्यांसाठी लालपरी तर महागडा प्रवास करणाऱ्यांसाठी शिवशाही व शिवनेरी बस गाड्यांची खरेदी झाली. लालपरीने कमावलेल्या उत्पन्नातील बराच हिस्सा शिवनेरी व शिवशाही बसच्या देखभाल- दुरुस्तीवरच खर्च झाला. या महागड्या बसगाड्या महामंडळातील 'पांढरा हत्ती'च असल्याची जाणीव सर्वांना झाली. सोलापूर-पुणे, नाशिक-पुणे, पुणे-मुंबई यासह विविध मार्गांवरील शिवशाही व शिवनेरी बस गाड्यांना उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक करावा लागला. शिवनेरी बस गाड्यांच्या खरेदीसाठी जवळपास 195 कोटी रुपये तर शिवशाही बस खरेदीसाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. शिवशाही बससेवा 2017 मध्ये तर शिवनेरी बससेवा 2008 पासून सुरू झाली. मात्र, अजूनपर्यंत या गाड्यांची किंमतदेखील वसूल झालेली नाही. या महागड्या गाड्यांवर सर्वाधिक खर्च झाल्यानेच महामंडळाचा संचित तोटा वाढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महामंडळ विलिनीकरणासाठी उत्पन्न व संचित तोटा हेच प्रमुख कारण ठरू लागले आहे. दरम्यान, महागड्या बसगाड्यांमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी आता आणखी सातशे लालपरींची खरेदी करण्याची निविदा काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
महामंडळाकडील बसगाड्यांची स्थिती..
लालपरीची किंमत : 17 ते 18 लाख
शिवशाही बसची किंमत : 50 ते 52 लाख
शिवनेरी बसची किंमत : 1.50 कोटी
शिवशाही, शिवनेरीचा ऍव्हरेज : प्रतिलिटर 2.5 कि.मी.
साध्या बस गाड्यांचा ऍव्हरेज : प्रतिलिटर 7 कि.मी.
ठळक बाबी...
2008 पासून सुरू झाली शिवनेरी; महामंडळाकडे आहेत 128 शिवनेरी बसगाड्या
शिवशाही बससेवा 2017 पासून सुरू; महामंडळाकडे सध्या 987 शिवशाही बस
शिवशाही बससेवा फेल; शिवनेरीला प्रवाशांकडून नाही अपेक्षित प्रतिसाद; शिवशाहीचे सर्वाधिक अपघात
शिवशाही, शिवनेरी बसवरील देखभाल-दुरुस्ती, इंधनाचा सर्वात मोठा खर्च; लालपरीच्या तुलनेत दुप्पट खर्च
लालपरीची मुबलक संख्या असतानाही शिवशाही, शिवनेरी बस गाड्यांची खरेदी; पाचशे गाड्या भाडेतत्त्वावर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.