गुवाहाटी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने केलेल्या आमदारांच्या निलंबनाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. तर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. याच पार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ट्वीट केली आहे. त्यांनी राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा व्हिडीओ शेअर कला आहे
एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले ते खालील प्रमाणे आहे, असे म्हणत शंभुराजे देसाई यांचा दोन व्हिडीओ त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केले आहेत.
राज्यमंत्री असूनदेखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही, असे देखील म्हटले आहे. दरम्यान त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आमदार गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी त्यांची खदखद व्यक्त केली आहे.
देसाई म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये पाच खाती राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे दिली पण, राज्यमंत्र्यांना किती अधिकार होते हे सुध्दा तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. सामान्य शिवसैनिकांना वाटायचं राज्यमंत्र्यांकडं गेलं की काम झालं पाहिजे पण राज्यमंत्री हे केवळ आमदार, लोकप्रतिनीधी, शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची आलेली कामं याच्यावर शिफारस करून कॅबिनेट मंत्र्यांकडे देणं एवढच काम राज्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळात होतं. ,
विधानसभेच्या काळात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणे आणि विधानसभेतचं आणि विधानपरिषदेचं काम हाताळणं एवढंच नामधारी राज्यमंत्री म्हणून आम्ही काम करत होते, असे देसाई म्हणाले आहेत.
आमदार देसाई पुढे म्हणाले की, अनेक वेळा मी आणि सर्व राज्यमंत्र्यांनी भेटून मुख्यमंत्र्यांना विनंती केली की राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवून द्या पण अडीच वर्षात राज्यमंत्र्यांना कुठलेही अधिकार मिळाले नाहीत. राज्य उत्पादन शुल्क, पनन सारख्या विभागातील राज्यमंत्र्याच्या अधिकाराचे अडिच वर्षात वाटप देखील झालं नाही, राज्यमंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहीलेत ही आमची खदखद आहे असे देसाई म्हणाले.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गावात त्यांच्या स्मारकासाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी तेथील कार्यक्रमात केली होती. अर्थ व वित्त राज्य मंत्री नात्याने याची मी विधानपरिषदेत घोषणा केली. यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थ राज्यमंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री - अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले नाहीत, असे देसाई म्हणाले.
आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करा. आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी विनंती आहे असे अवाहन देखील शंभूराजे देसाई यांनी शिवसैनिकांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.