राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणतात, शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे. असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही हा इतिहास आहे. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम लढवय्ये कधीही निपजणार नाहीत.म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणांची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. हे विचार शाहू महाराजांनी फक्त बोलून नाही तर प्रत्यक्षात उतरवून दाखवले आणि करवीर संस्थानात शैक्षणिक क्रांतीची तेजोमय पहाट झाली. (Shahu Maharaj has made a very significant contribution in education read history)
छत्रपती शाहू महाराजांनी दिनांक २६ जुलै १९०२ रोजी जगातील पहिला आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात ते म्हणतात, की या तारखेपासून राज्यात सर्व वर्गाच्या लोकांना शिक्षण देण्याच्या उदात्त हेतूसाठी त्यांना योग्य मोबदला मिळाल्यास शिक्षणाचे महत्त्व पटेल. म्हणून वरील तारखेपासून राज्यात रिकाम्या झालेल्या जागांपैकी पन्नास टक्के जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी भराव्यात.
हा जाहीरनामा म्हणजे मागासलेल्या सर्व जातींच्या लोकांसाठी नवीन सूर्योदय होता. एवढा धाडसी निर्णय महाराजांनी अशा वेळी घेतला. या जाहीरनाम्याचा परिणाम शिक्षणाच्या चळवळीवर सकारात्मक व्हावा, अशी अपेक्षा महाराजांची होती ती पूर्ण होताना दिसू लागली.
ज्या वेळी तळागाळातील लोकांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले व तत्कालीन समाजसुधारकांनी शाळा काढल्या, शिक्षणाची दारे उघडून दिली. तोच कित्ता शाहू महाराजांनी पुढे चालवला. त्यात भर म्हणजे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहायचे कुठे हा प्रश्न सतावत असे. ही बाब महाराजांच्या लक्षात आली, त्या वेळी त्यांनी १८९६ साली सर्व विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढले.
यावेळी सर्वत्रच जातीयतेचा भयंकर पुळका जातीयवादी लोकांना होता. परिणामी या वसतिगृहातून उच्चवर्णीय वगळता बाकीचे विद्यार्थी कमी व्हायला लागले. म्हणून महाराजांनी तत्कालीन जातीय व्यवस्थेचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होऊ नये आणि शिक्षणात खंड पडू नये म्हणून १९०१ साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले. त्यानंतर मात्र त्यांनी मराठा बोर्डिंगचे यश पाहता विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातवार वसतिगृहे काढली.
आपल्या संस्थानाच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या शहरात गोरगरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू केली. परिणामी ग्रामीण वा इतर भागांतून येणाऱ्या सर्वसामान्य आणि गरीब मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हायला मदत झाली. त्या वेळी महाराजांवर अनेक आरोप झाले, की महाराजांनी जातीयता वाढविली, कारण वेगवेगळ्या जातीची वसतिगृहे काढली. महाराज हे समाजात फूट पडत आहेत. परंतु त्या काळातील समाजव्यवस्थाच अशी होती, की नाकापेक्षा मोती जड होत होता.
महाराजांनी हा निर्णय घेतला नसता, तर पुढील बराच काळ सर्वसामान्य, गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडणे सोडाच, किलकिले होणेदेखील कठीण झालेले असते. म्हणून त्याही परिस्थितीत सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी महाराजांनी हा पर्याय निवडला. विशेष म्हणजे काळाच्या ओघात त्यांचा हा पर्याय कमालीचा यशस्वी ठरला. कारण याच सर्व वसतिगृहांतून अनेक नामवंत तयार झाले.
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामधील अस्पृश्यांचा आणि मागासलेल्या जातींचा उद्धार शिक्षणाच्या माध्यमातून करण्याचे ठरवले होते. त्या काळच्या समाजव्यवस्थेचा विचार करता स्पृश्य आणि अस्पृश्य हे एकत्र शिकणे खूप कठीण काम होते. म्हणून त्यांनी अस्पृश्यांसाठी वेगळ्या शाळा काढल्या होत्या. सुरुवातीला पाच शाळांवरून सुरू झालेला प्रवास २७ शाळांपर्यंत जाऊन पोहोचला.
मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना शिक्षणाचा अधिकार मिळावा. यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केले. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे २४ नोव्हेंबर १९११पासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण करण्यात आले. हे करत असताना फक्त जाहीरनामा काढून महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी असाही आदेश काढला, की जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार माहीत त्यांना एक रुपया दंड करण्यात येईल. त्यामुळे शिक्षणाबद्दलची अनास्था कमी व्हायला मदत झाली.
लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजायला सुरुवात झाली. ‘गाव तेथे शाळा’ महाराजांनी आपल्या संस्थानात सुरू केल्या. महाराजांनी त्या काळात जवळजवळ १००च्या आसपास शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली. सोबतच ज्या मुलीना महिलांना शिकायची ईच्छा असेल त्यांनाही शिक्षणासाठी दारे उघडे करुन शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.
शिक्षणाशिवाय आमचा तरणोपाय नाही, हा सिद्धांत त्यांनी मनोमन स्वीकारून त्या पद्धतीने कार्य करायला सुरुवात केली होती.
छत्रपती शाहू महाराजांनी या सगळ्या गोष्टीत स्वतः लक्ष घातल्याने अनेक समस्या त्यांच्या लक्षात आल्या. उदाहरण सांगायचे झाल्यास, ग्रामीण भागातील शेतकरी हे मुलांना कामात मदत म्हणून शाळेत पाठवायला चालढकल करायचे. मात्र महाराजांनी त्यातही मार्ग काढला. सकाळी किंवा संध्याकाळी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावेच लागायचे.
त्यासोबत सुरुवातीला सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या शाळा महाराजांनी बंद करून सर्वांना एकत्र शिक्षण देत समानता साधण्याचा प्रयत्न केला. १९१७-१८ साली एकूण शाळा २७ आणि विद्यार्थिसंख्या १२९६ होती. त्यांच्या सक्तीच्या आणि मोफत शिक्षण देण्याच्या प्रयत्नांमुळे पुढील पाच वर्षांत शाळांची संख्या ४२०, तर विद्यार्थिसंख्या २२ हजारांच्या वर झाली.
या योजनेवर सुरुवातीला होणारा एक लाख रुपयांचा खर्च पुढे वाढत जाऊन तीन लाखावर गेला. या शिक्षणाच्या प्रवाहात महाराजांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विचार करून विविध स्वरूपाच्या शाळा आपल्या संस्थानात सुरू केल्या. सोबतच शाळेत ग्रंथालये देखील सुरु केले.तेथे वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन दिलीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.