राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. फक्त 48 वर्षांचं आयुष्य मिळालेल्या शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षण, स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदे, जातीभेदावर प्रहार, दुष्काळ निवारण, पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि शेती-उद्योग क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले होते.
"दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना"
या काव्यपंक्ति अक्षरश: जगलेला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. मात्र, 19 व्या शतकात होऊन गेलेला हा राजा आजही का आठवणीत राहिला आहे? त्यांची आजही का आठवण काढली जाते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे समकालीन असलेल्या अनेकांना तसेच त्यांच्या नंतरही अनेक मोठ्या व्यक्तींना भुरळ पाडली आहे. त्यांची आठवण का काढली जाते? याचं उत्तर आपल्याला त्यांनी राजर्षी शाहू महाराजांविषयी काढलेल्या गौरवोद्गारातून मिळतं.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे म्हणतात की, महाराष्ट्राच्या राजाच्या गळ्यात कवड्यांची माळ असे म्हणतात. मला ती माळ फार सूचक वाटते. लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते. त्याने स्वत:चे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवावी लागते. उपभोगशून्य स्वामी ह्यासारखी सत्ताधीशाला दुसरी बिरुदावली नाही. शाहू महाराजांना ती लाभलेली होती.
सत्यशोधक समाजाच्या तत्वाप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता नष्ट केली. त्यांनी स्वराज्याच्या खरा पायाच घातला आहे. याची मात्र पूर्ण जाणीव आहे. प्रत्येकाने हा कित्ता पुढे ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा, असं महात्मा गांधी यांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल म्हटलंय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, त्यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल का याबद्दल शंका आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, शाहू महाराज हे एक असे पुरुषश्रेष्ठ होते की अनेकांना अनेक रंगात दिसत ने खरोखरच नानारंगी महापुरुष होते. क्षेत्र राजकिय असो की सामाजिक, धार्मिक अथवा कुठलेही त्यात महाराजांचे प्राविण्य तुफानी महाराजनेप्रमाणे प्रतिस्पध्यांची दाणादाण उडवल्याशिवाय राहायचे नाही. एक पट्टीचा मुत्सद्दी राजकारणी, खंबीर समाजसुधारक, धर्मक्रांतिकारक, निधड्या छातीचा शिकारी आणि सर्वात महत्त्वाचे दिनदुनियेच्या भवितव्यावर प्रकाश टाकणारे सर्चलाईट म्हणजे शाहू छत्रपती होत.
विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात की, शाहू राजा नुसता मराठा नव्हता, नुसता ब्राम्हणेतरही नव्हता, तो नवयुगातील सर्वागपूर्ण राष्ट्रपुरुष होता, तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता.
विचारवंत, लेखक नरहर कुरुंदकर म्हणतात की, राजर्षी शाहू महाराजांनी केलेली सामाजिक सेवा प्रसिध्द आहे. पण या सामाजिक सर्वच्याबरोबर तेवढीच महत्वाची कलांची सेवा आहे, नाट्य, सिनेमा, संगीत, चित्र या सर्वांचे महाराज आश्रयदाते होते. महाराष्ट्रात विसाव्या शतकात जो कलाव्यवहार बहरला त्याच्या पाठीशी महाराजांचे पुण्य फार मोठे आहे. शेती व औद्योगिकरणाबाबत शाहूंची धडपड मोठी होती. त्यांच्या डोळ्यासमोर एक सर्वांगीण विकास होता.
चरित्रकार धनंजय कीर म्हणतात की, शाहूंनी आपल्या दिव्य चक्षूंनी स्वातंत्र्य, समता, बंधुता य बुध्दीप्रामाण्य यावर आधारीत जशी नवीन प्रकारची समाजरचना भारतात स्थापन केली जाईल असे दृश्य पाहिले, कामगारांना अधिकारप्राप्ती झाली पाहिजे, अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले पाहिजे. सामान्य मनुष्याचा ऐहिक दर्जा बाढविला पाहिजे हे त्यांचे तत्वज्ञान भारताच्या राज्यघटनेत सामाजिक आर्थिक लोकशाही स्थापण्याच्या ध्येयात समाविष्ट झालेले आहे ते घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांशी निगडीत झालेले आहे. शाहू हा खरोखरीच एक अनन्यसाधारण आत्मशक्तीचा पुरुष होता
डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात की, एक अत्यंत निर्मळ, निष्कपट असा माणुसकीचा झरा छत्रपती शाहूंच्या रुपाने महाराष्ट्रात प्रवाहित झाला, पारलौकिक ईश्वर आम्हाला कधी भेटलेला नाही. पण लोकांमध्ये प्रत्यक्ष सिध्द झालेला लोकांच्या सुखदुःखांना स्वतःची सुखदुःखे समजणारा, चिखलात रुतलेल्यांना बाहेर येण्यासाठी मदत देणारा तथाकथित ईश्वराकडून अपेक्षित असलेली सर्व कामे करणारा आमचा लोकसिध्द शाहू राजा हाच आमचा ईश्वर यात मात्र शंका नाही.
इतिहासकार य. दि. फडके म्हणतात की, गेल्या शतकात महात्मा फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरुन झाड लावले. त्याला खतपाणी घालून वाढवले ते शाहू छत्रपतींनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेथे. डॉ. आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन घुमारे फुटले. शाहू छत्रपतींच्या महान ऐतिहासिक कार्याची नोंद अर्वाचीन काळातील महाराष्ट्राचा, एवढेच नव्हे तर भारत इतिहास लिहिणाऱ्याना लागेल हे नि:संशय!
प्रसिद्ध मराठी लेखक कुसुमाग्रज म्हणतात की, मराठी मातीशी एकरूप झालेले, तिच्या व्यथा, वेदनांची अपेक्षांची आणि गुणगौरवाची जाण असलेले ने लोकनेते होते. जातीयतेला आणि जातीय वर्चस्वाला त्यांचा प्रखर विरोध होता पण कोणत्याही समाजाचा द्वेष करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. पायउतार होऊन लोकांत वावरणारे शा महाराज हे एकच संस्थानिक होते.
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणतात की, इतिहासात समाजक्रांतीचा झेंडा राजाच्या खांद्यावर क्वचितच दिसून येतो. समाजसुधारक राजे अनेक होऊन गेले, परंतु समाजक्रांतिकारक राते शोधूनही सापडणे कठीण. असा दुर्मिळ राजे होण्याइतके कार्य शाहू महाराजांकडून घडले म्हणून त्यांचे नाव आजही सर्वांच्या स्मरणात राहिले आहे व पुढेही राहिल
शाहू अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात की, हिंदुस्थानातील अन्य शेकडो संस्थानिक आपल्या राजविलासात रममाण होऊन आपल्या राजवैभवाचा सुखेनैव उपभोग घेत असता हा मराठी राजा गळ्यात कवड्याची माळ घालून गरीबांच्या कल्याणासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत राहिला. विशेष म्हणजे या कसरतीची त्यांच्या कोणी सक्ती केलेली नव्हती तर आपणहून स्वीकारलेले ते 'व्रत' होते. शाहू महाराज हे स्वयंभू महापुरुष होते.
ज्येष्ठ शेकाप नेते डॉ. एन. डी. पाटील म्हणतात की, कामगारांनी आपल्याकडे युनियन्स काढल्या पाहिजेत असे सांगणारा दुसरा एकही संस्थानिक शोधून सापडणार नाही. युरोपमध्ये रशियासारख्या देशात कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली त्याचे राज्य स्थापन झाल्याचा दाखला देऊन हा लोकनेता येथील कामगारवर्गाला त्यांच्या सुप्त शक्तीची आणि ऐतिहासिक कर्तव्याची जाणीव धीरगंभीरपणे करून देत होता आणि ते ही अशा काळात जेव्हा साम्यवादी चळवळीने या देशात मूळदेखील घरलेले नव्हते.
- विनायक होगाडे | vinayakshogade@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.