वारी आणि रिंगण हे समीकरणच आहे. वारीच्या वाटेवर दोन ठिकाणी उभी आणि चार ठिकाणी गोल रिंगणे होतात. वारीच्या वाटेने, संतांच्या संगतीने भक्त एकमेकांमध्ये भावभक्तीचा खेळ खेळतात, पूजा करतात, तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित होतो. रिंगण ही त्यातील एक पूजाच. वारकरी आणि संत एकत्रित त्याचा आनंद घेतात. उभे रिंगण चांदोबाच्या लिंबाजवळ आणि वाखरी येथे होते. पूर्वी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर व्हायचे. मात्र, जागा अपुरी पडत असल्याने काही वर्षांपासून गोल रिंगण पुरंदवडेच्या माळरानावर घेतले जात आहे.
नातेपुतेहून निघून सोहळा साडेदहाच्या सुमारास मांडवीच्या ओढ्यावर न्याहारीसाठी थांबतो. नंतर पुढे वाटचाल सुरू होते. रिंगणासाठी पुरंदवडेच्या मैदानावर सोहळा थांबतो. चोपदार बंधू गोल रिंगण लावून घेतात. पालखी मधोमध विराजमान होते. भोवती दिंड्यांमधील पताकाधारी आणि तुळशीवाल्या महिला असतात. रिंगणात माउली अश्वावर विराजमान असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हाच सर्वांचा भाव असतो. रिंगणात एक फेरी मारून स्वाराचा अश्व रिंगणाची पाहणी करतो. त्यानंतर भोपळे दिंडीचा मानकरी पताका घेऊन रिंगणात तीन फेऱ्या पूर्ण करतो. स्वाराच्या अश्वासह धावायला सुरुवात करतो. माउलींच्या अश्वाला रिंगणात मोकळे सोडले जाते. स्वाराच्या अश्वाचा पाठलाग करीत माऊलींचा अश्व रिंगणात काही फेऱ्या पूर्ण करतो, तेव्हा लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. माऊली आमच्यात खेळली, अशीच भावना असते. त्यामुळे आनंदाला पारावार उरत नाही. ‘ज्ञानोबा-तुकाराम...’ जयघोषात गजर टिपेला पोचतो, तेव्हा परमानंदी टाळी लागल्याशिवाय राहत नाही. काही वर्षांपूर्वी याच वाटचालीत मृदंग शिरोमणी, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पांडुरंग महाराज वैद्य निवर्तले. तेव्हा सोहळ्यातील वारकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मृदंग अबोल झाले होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रिंगणाचा सुखसोहळा नाही. भजनाचे सुख देवांनाही मिळत नाही. सारे जण घरीच आठवणींना उजाळा देत, स्वप्न पाहात जगत आहेत. पण, या आठवणी सांगून किंवा लिहून, वाचून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. प्रत्यक्ष सुखाला यंदा वारकरी मुकले, हे वास्तव आहे. घरी कधीही न नाचणारे आजोबा जेव्हा ‘ज्ञानोबा- तुकारामा’च्या गजरात देहभान विसरून नाचतात, तेव्हा ते फक्त परमानंद अनुभवत असतात. वारकऱ्यांनी घरात माउलींची मूर्ती किंवा ज्ञानेश्वरी ठेऊन मनोभावे प्रदक्षिणा घालावी. म्हणजे, वाटचालीतील रिंगमात माउलींच्या पुजेचा आनंद तरी निश्चितच मिळेल.
वारीची अखंड सुरू असणारी परंपरा कोरोनामुळे खंडित झाली. आज पालखी येथे मुक्कामी असते. पण एखाददुसरा वारकरी जाताना बघितला की त्या चैतन्यवारीची आठवण होते. दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी यंदा ग्रामस्थांना मिळाली नाही. माउलींचा सोहळा न आल्याने मनाला चटका लागून राहिला आहे.
- योगेश गुजरे, मुख्याध्यापक श्रीनाथ विद्यालय, माळशिरस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.