Shankaracharya Swami Avimukteshwaranand : विश्र्वासघात करणारा हिंदू नसतो;विश्र्वासघात करणारा हिंदू नसतो

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे आणि विश्वासघात करणारा कधीही हिंदू असू शकत नाही,’’ असे वक्तव्य ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज केले.
Shankaracharya Swami Avimukteshwaranand
Shankaracharya Swami Avimukteshwaranandsakal
Updated on

मुंबई : ‘‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे आणि विश्वासघात करणारा कधीही हिंदू असू शकत नाही,’’ असे वक्तव्य ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज केले. त्यांनी आज ‘मातोश्री’ येथे जात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांच्या पादुकांचे पूजनही केले.

या भेटीनंतर ‘मातोश्री’ बाहेर पडताच पत्रकारांनी शंकराचार्यांना गराडा घातला. त्यावेळी बोलताना शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. ‘‘आम्ही सगळे सनातन धर्म पाळणारे लोक आहोत. पाप-पुण्य मानणारे लोक आहोत. सर्वांत मोठा घात गौ-घात सांगितला गेला आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा घात विश्वासघात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी हा विश्वासघात झाला आहे. हिंदू धर्मात विश्वासघात हे पाप आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. विश्वासघात सहन करणारा हिंदू होऊ शकतो,’’ असे ते म्हणाले. ‘आम्हाला राजकारणाशी घेणे-देणे नाही. जे सत्य आहे, ते आम्ही बोलतो. पाप-पुण्याबद्दल राजकारणी थोडेच बोलणार, त्याबद्दल तर धर्माचार्यच बोलणार ना?’ असा प्रतिसवाल अविमुक्तेश्वरानंद यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या विश्वासघातामुळे आमचेही मन दु:खी झाले आहे आणि लोकांच्याही मनात ते दु:ख असल्याचे निवडणुकीत सिद्धच झाले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसत नाहीत तोपर्यंत हे दु:ख हलके होणार नाही.

- स्वामी अविमुक्तेश्र्वरानंद

‘केदारनाथमध्ये सोने गैरव्यवहार’

दिल्लीत ‘प्रतिकेदारनाथ’ची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आणले असता ‘ते शक्य नसल्याचे’ शंकराचार्य म्हणाले. ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंग आहेत, त्याची स्थळे निश्चित आहेत, तसेच केदारनाथचे आहे. त्याचे स्थान कसे बदलणार?, असा प्रश्न त्यांनी केला. ‘‘केदारनाथमध्ये २२८ किलो सोन्याचा गैरव्यवहार झाला आहे. त्याबद्दल कोणीच का बोलत नाही? चौकशी का होत नाही?,’ असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विचारले असता शंकराचार्य म्हणाले,‘‘नरेंद्र मोदी आमच्याकडे आले होते, त्यांना आम्ही आशीर्वाद दिला. जो येईल त्याला आम्ही आशीर्वाद देतो. नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. त्याचे काही चुकले तरी आम्ही बोलतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.