कोल्हापूरः शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. बहुसंख्य आमदारांना घेऊन अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. त्यानंतर शरद पवार पक्षसंघटना वाढवण्यासाठी थेट रस्त्यावर उतरलेले दिसले. आतापर्यंत पवारांनी येवला, बीडमध्ये सभा घेतल्या आणि त्या गाजवल्याही.
उद्याही पवारांची कोल्हापुरात सभा होणार आहे. एकेकाळी कोल्हापूर हा शरद पवारांचा गड मानला जायचा. सदाशिवराव मंडलिक आणि निवेदिता माने असे राष्ट्रवादीचे दोन खासदार जिल्ह्यातून निवडून यायचे. पण, राज्यातील बदललेली सत्ता समीकरणं पाहता शरद पवारांना कोल्हापूरचा गड जिंकायचा असल्यास मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी उद्या होत असलेल्या कोल्हापुरातील सभेचा पवारांना फायदा होणार का? हे जाणून घेऊयात...
१. मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील संघर्ष
कोल्हापूर म्हटलं तर इथे मुन्ना महाडिक, बंटी पाटलांचं राजकारण चांगलंच तापलेलं दिसतं. या दोन घराण्यांमधला वाद जुना आहे. गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा असो वा ग्रामीण पातळीवरचं राजकारण... इथे कायम मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटलांचा संघर्ष दिसून येतो. त्यातच राज्यसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव करुन धनंजय महाडिक विजयी झालेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांना मुन्ना महाडिकांनी आसमंत दाखवल्याची चर्चा आहे. तर तिकडे काँग्रेसचे सतेज पाटील हे कोल्हापूरच्या राजकारणात एकटे पडलेले दिसतात. कारण त्यांना साथ देणारे हसन मुश्रीफ आता अजित पवार गटात गेलेत.
२. हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे
राज्यातील नुकत्याच झालेल्या सत्तांतराच्या खेळीत कोल्हापूरच्या वादग्रस्त हसन मुश्रीफांचंही नाव आहे. कारण ते अजितदादांसोबत आहे आणि हाच गट सध्या सत्तेत आहे. त्यामुळे मुश्रीफांविरोधात असणाऱ्या समरजित घाटगेंची चांगलीच गोची झालीए. कारण समरजित घाटगेंचं अन् मुश्रीफांचं राजकीय वैर जुनं आहे. त्यातच घाटगेंनाही कागलमधून आमदार व्हायचंय. अन् तिथे त्यांच्यासमोर आव्हान असतं ते हसन मुश्रीफांचं... पण आताची राजकीय स्थिती पाहिल्यास मुश्रीफही सत्तेत आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या घाटगेंची समजून काढण्यासाठी फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली होती.
३. शाहू महाराज छत्रपतींविरुद्ध संभाजीराजे छत्रपती
एकीकडे शाहू महाराज छत्रपती उद्याच्या कोल्हापूरच्या सभेचे प्रमुख पाहुणे आहेत. पवारांच्या कोल्हापुरातील सभेला शाहू महाराज हजर राहणार आहेत. त्यामुळे पवारांनी आपली खेळी केल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे संभाजीराजे छत्रपतींच्या राजकीय भूमिकेवर शाहू महाराजांनी नाराजी बोलून दाखवली. मागे भाजपाच्या तिकिटावर राज्यसभेवर गेलेल्या संभाजीराजेंना यंदा डावलण्यात आलं आणि धनंजय महाडिकांना भाजपनं तिसरी उमेदवारी दिली. असं असलं तरी, शाहू महाराज छत्रपती सध्या राजकारणात सक्रीय नाहीत आणि राजघराणं असल्यामुळे त्यांच्यावर कोल्हापुरातील नेते टीकाटिप्पणीही करत नाहीत.
४. शिंदे गट, अजित पवार गटामुळे बदलेली सत्तासमीकरणं
आता एकूणच सांगायचं झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातून खासदार संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, समरजीतसिंह घाटगे, चंद्रकांत पाटील, संभाजीराजे छत्रपती, शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, शेतकरी नेते राजू शेट्टी ही नावं कायम राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. त्यात बदललेल्या सत्तासमीकरणामुळे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजपा एकत्र आलेत. त्यामुळे कोल्हापुरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक सध्या महाविकासआघाडीकडे आहेत. अशातच हातकणंगलेच्या जागेवरुनही पवार खेळी करु शकतात, अशी शक्यता आहे. कारण धैर्यशील मानेंनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय आणि त्यांच्याविरोधात असतात ते म्हणजे शेतकरी नेते राजू शेट्टी. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार राजू शेट्टींनाही पाठिंबा देऊ शकतात.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शरद पवारांना या तीन पक्षांविरोधात लढण्यासाठी असे चेहरे आणावे लागणारेत ज्याला जनताही नाकारणार नाही. मुन्ना महाडिक-बंटी पाटील, मंडलिक, घाटगेंच्या उपर जाऊन जर इतिहासाचे दाखले देत आणि राजगादीचा आधार घेत राजकारण करायचं ठरवल्यास शाहू महाराज छत्रपतींच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला उद्या भावनिक साद घातली जाऊ शकते. पण, याचा शरद पवारांना फायदा होणार का? यासाठी आपल्याला निवडणुकांची वाट पाहावी लागेल हे नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.