पुणे - 'मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले तेव्हा, त्यांना भेटणारा पहिला मी होतो. तेव्हापासून आत्तापर्यंत आमची एकदाही भेट नाही. माझे व जरांगे यांचे कॉल रेकॉर्ड जरूर तपासा, जज नेमा नाहीतर, एसआयटी चौकशी करा, मी एक फोन जरी त्यांना केला असेल, तर वाट्टेल ते मान्य करेल,' असे थेट आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी दिले.
एवढ्यावरच न थांबता, 'मी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्र पाहत आलो आहे, मात्र जबाबदार पदावरील व्यक्ती इतके पोरकट बोलतात, असे मी कधी पाहिले नाही' असा टोला ही पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांची मंगळवारी निसर्ग मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. यावेळी पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीसंबंधीची माहिती देत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
'जरांगे यांच्याशी झालेल्या भेटीवेळी, दोन समाजामध्ये अंतर पडू नये, असे त्यांना सांगितले होते. त्यानंतर राज्य सरकार जरांगे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, हा प्रश्न सोडविण्यासाठी राजेश टोपे यांची मदत घेत होते. त्यांच्यावरच आता प्रहार करण्याची राज्य सरकारची भूमिका असेल, तर मग राज्य सरकारसमवेत सुसंवाद कोण करेल?' असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणासंबंधी बोलताना पवार म्हणाले, 'मराठा समाजाला यापूर्वी आरक्षण देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकले नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. या आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात काय होतेय ते बघू. तिथे आरक्षण टिकले, तर आनंदच आहे.'
पवार म्हणाले, 'देशाला पर्याय हवा आहे, त्यामुळे चांगला पर्याय देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने आम्ही सक्षम पर्याय देणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आहेत. त्यांची पुण्यात सभा होती, लवकरच त्यांच्याशी चर्चा होईल. केजरीवाल यांना भाजपकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष केजरीवाल यांच्यासमवेत आहोत.
महाविकास आघाडीतील विविध पक्षांशी जागा वाटपाबाबत आमचे बोलणे सध्या सुरु आहे. मात्र जागा वाटपाचा प्रश्न एक-दोन दिवसात सुटणारा नाही, त्यासाठी आणखी काही दिवस लागतील.' सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, 'लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, नवीन उमेदवार लढत असतील, तर आनंदच आहे', तर अजित पवार यांच्या पत्राबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले.
...दमदाटी केली, दबाव टाकला तर कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणार!
बारामती तालुक्यातील बूथ पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये अनेकांनी असे सांगितले की, काही लोकांकडून त्यांना दमदाटीचे, नोकरीवरून कमी करण्याचे फोन येत आहेत. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर कोणी धमकावत असेल, तर आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असा सज्जड दम पवार यांनी यावेळी भरला.
14 निवडणुकांमध्ये अडकलो नाही, आता काय अडकणार?
भाजपकडून शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीमध्येच अडकून ठेवण्याचा प्लॅन केला जात आहे, याबाबत पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, 'मी आत्तापर्यंत 14 निवडणूका लढलो आहे. त्यामध्ये सात लोकसभा निवडणूका होत्या. बारामतीमधील या निवडणुकांमध्ये मी कधी अडकलो नाही, आताच्या निवडणुकांमध्ये काय अडकणार?' असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.