Sharad Pawar Lok Maze Sangati : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. या नव्या आवृतीमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहे. कधी न समोर आलेल्या गोष्टी त्यांनी समोर आणल्या आहेत. कोरोना काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना कशाप्रकारे महाविकास आघाडीने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, याविषयी शरद पवार यांनी या पुस्तकात सांगितले.
कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीचे श्रेय पवारांनी एका खास नेत्याला दिले.आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Sharad Pawar Lok Maze Sangati Autobiography how mahavikas aghadi handle covid 19 situation )
शरद पवार सांगतात, "मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंच्या शर्ट-पैंट असा मुंबईकर मध्यमवर्गीयाच्या पोषाखात सहजपणानं वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाच होतं. कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद सहज आणि आपुलकीचा असल्यानं मध्यमवर्गाला ते फारच भावलं. त्यांना सहकार्य केलं पाहिजे, असं या वर्गाला वाटत होतं.
मात्र उद्भवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे. 'महाविकास आघाडी'चं जनकत्व माझ्याकडे होतं, त्यामुळे पालकाच्या भूमिकेतूनच मी याकडे पाहत होतो."
पवार पुढे सांगतात, "रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव यांच्या प्रकृतीचं वर्तमान समजत असे. मग मी स्वतःच त्यांची विचारपूस करण्यासाठी 'मातोश्री'वर वडिलकीच्या नात्यानं गेलो होतो. आमच्यापर्यंत आलेले काही विषय उद्धवशी संपर्क करून मी कानांवर घालायचो, काय करायला हवं, याबाबतही सूचना करायचो. त्या सूचनांवर कार्यवाही होत असे, असाही माझा अनुभव आहे.
राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडीची बातमी हवी. त्याचं यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावले उचलायला हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं.
राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगानं हालचाली कराव्या लागतात परंतू महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण शारीरिक अस्वास्थ्य हेच असावं."
पवार पुढे सांगतात, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व मंत्री मुरब्बी असल्यामुळे त्यांना दांडगा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे, अशाही काळात सकार कृतिशील राहिलं. अजित मंत्रालयात कायम उपलब्ध असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला निर्णयप्रक्रियेमध्ये काळजी करण्याची आवश्यकता भासली नाही.
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात वास्तविक महाराष्ट्र हॉटस्पॉट असूनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या वेळी केलेली कामगिरी फारच स्पृहणीय होती. राजेश सर्व निर्णयांवर चौफेर लक्ष ठेवून होता. उद्धवही प्रशासनाच्या संपर्कात होते, परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे.
राजेश आणि राष्ट्रवादीचे सारे मंत्री प्रत्यक्ष मैदानात सक्रिय होते. आपल्या विचारांच्या हातात राज्य असताना संकटग्रस्त स्थितीत समाजाला दिलासा देण्याची नैतिक जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून माझ्यासह सर्व सहकारी काम करत होते."
लोक माझा सांगाती च्या नव्या आवृतीमध्ये अशाप्रकारे शरद पवार यांनी कोरोनाच्या कठीण काळात त्यावेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळताना कौतुकास्पद कामगिरी राजेश टोपे यांनी केली असल्याचे ते या पुस्तकात सांगतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.