राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची शरद पवार यांची अनपेक्षित घोषणा ही भाजप विरोधात राष्ट्रीय पातळीवर व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रक्रियेला धक्कादायक ठरणारी असल्याने विरोधकांच्या गोटामध्ये चिंता वाढली आहे.
पवार यांचा निर्णय ही राष्ट्रवादीची अंतर्गत बाब असल्याचे काँग्रेसने म्हटले असले तरी, मित्रपक्षात फूट पडल्यास याचा परिणाम महाविकास आघाडीवर आणि विरोधी ऐक्यावरही होईल, अशी भीतीही काँग्रेसमधून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांनी विशेषतः भाजप विरोधातील परंतु काँग्रेसशी सख्य नसलेल्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी विश्वासार्ह चेहरा म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. येत्या वर्षभरात लोकसभा निवडणूक आहे. त्याआधी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही आहेत. असे असताना शरद पवार यांचा निर्णय विरोधकांच्या दृष्टीने धक्कादायक आहे.
शरद पवार यांच्या घोषणेने काँग्रेसलाही धक्का बसला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर उघड भाष्य करण्याचे टाळले आहे. काँग्रेसच्या दैनंदिन वार्तालापामध्ये माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला.
तर सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्याचा दाखला देत यावर बोलण्याचे टाळले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांचा धक्कादायक निर्णय आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्याची प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी टिपणी केली आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ सोबत राहिलेले आणि आता काँग्रेसमध्ये सरचिटणीस असलेले नेते तारिक अन्वर यांनी, ‘शरद पवार हे परिपक्व आणि ज्येष्ठ राजकारणी असल्याने त्यांचा निर्णय भावनात्मक नव्हे तर विचारपूर्वक असावा.
मात्र पवार यांच्या भविष्यातील योजनेबद्दल अंदाज बांधणे मुश्कील आहे,’ असे निरीक्षण सकाळशी बोलताना नोंदविले. सार्वजनिक जीवनातून बाहेर पडणार असल्याचे पवार यांनी म्हटलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्रातील त्यांची भूमिका कायम राहील.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाल्यास महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर त्याचा नक्कीच परिणाम होईल, असेही मत तारिक अन्वर यांनी मांडले.
याच धर्तीवर काँग्रेसमधील एका उच्चपदस्थ सूत्रांनी, पवार यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारेकाही आलबेल नसल्याकडे अंगुलीनिर्देश करणारा आहे, अशी सूचक टिपणी केली.
धक्कातंत्राचा वापर?
दरम्यान, २०२४ ची निवडणूक निर्णायक असून विरोधी पक्षांना भाजपचा धोका जाणवतो आहे. एकीकडे विरोधकांच्या एकत्रीकरणाची सुरू असलेली प्रक्रिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य फुटीची होणारी चर्चा या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करून आपले राजकारण कायम आहे, असा संकेत दिल्याचा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.