ब्याऐंशीव्या वर्षी बसलेल्या राजकीय धक्क्यातून पुन्हा फिनिक्स भरारी घेण्याचा निर्धार काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावर झळाळत होता.
सातारा : पक्षफुटीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा लोकांच्यात जाण्यासाठी शड्डू ठोकला आहे. आयुष्यातील प्रत्येक घडामोडीत, अडचणीच्या प्रत्येक काळात सातारा जिल्ह्यातील जनतेने त्यांना भक्कम साथ दिली.
त्याच सातारा जिल्ह्यात त्यांचा नियोजित कार्यक्रम या घडामोडीपूर्वीच ठरलेला होता. त्यात वाढ झाली ती कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावरील समाधी दर्शनाची. त्यामुळे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाणांच्या साक्षीने आणि सातारकरांच्या साथीने आज (सोमवारी) गुरुपौर्णिमेदिवशी ब्याऐंशी वर्षाचा हा तरुण आगामी लढाईचा एल्गार करणार आहे.
विरोधी पक्षनेते व शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली. आपल्या आठ सहकाऱ्यांसह काल दुपारी अचानक त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. संपूर्ण राज्याचे वातावरण या घटनेमुळे ढवळून निघाले आहे.
कार्यकर्ते तसेच पाठीराख्यांना काय बोलावे, हेच सुचेना; परंतु शरद पवार मात्र धीरोदात्तपणे कोणताही तणाव न घेता पत्रकार परिषदेला सामोरे गेले. पक्ष व चिन्हाचा काही फरक नसतो. महत्त्व असते लोकांच्या मताला. मी त्यांच्यात जाऊन भूमिका मांडणार आहे. राज्यातील लोक विशेषतः युवकांवर माझा विश्वास आहे, असे म्हणत शरद पवार यांनी एकप्रकारे पुन्हा मैदानात उतरणार, ही आपली आगामी रणनीतीच स्पष्ट केली.
राजकारण असो वा कोणाचेही वैयक्तिक जीवन, नियती नावाची गोष्ट ठरलेली असते. त्याचीच प्रचिती शरद पवारांच्या बाबतीत येत आहे. राजकारणाच्या अगदी पहिल्या पावलापासून सातारा जिल्ह्यानेच शरद पवार यांना बळ दिले आहे. अगदी पहिल्या निवडणुकीचे तिकीट मिळवतानाही याच जिल्ह्याचे पुत्र यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताकद दिली.
आणीबाणीनंतर १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यावेळीही यशवंतराव चव्हाण व शरद पवार बरोबर होते. यशवंतराव चव्हाण यांना शरद पवार राजकीय गुरू मानतात आणि उद्या नेमकी गुरुपौर्णिमा आहे. राजकारणात अनेक धक्के पचविलेल्या शरद पवार यांना आज पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. नेमके याच वेळी त्यांचा आजचा (सोमवार) सातारा दौरा नियोजित होता.
शपथविधीच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा जनतेमध्ये जाऊन पक्षबांधणी करण्यार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचा एल्गार ते आपल्या राजकीय गुरूच्या साक्षीने करणार आहेत. सातारा जिल्हा हा आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. १९८० साली शरद पवार यांना ५० साथीदार सोडून गेले. त्यांच्यासह सहा आमदार उरले होते.
त्यात सातारा जिल्ह्यातील माणमधील विष्णुपंत सोनावणे हे एकच आमदार सोबत राहिले. चिमणराव कदम, शंकरराव जगताप, प्रतापराव भोसले, धोंडिराम कदम, पी. डी. पाटील, विलासराव पाटील-उंडाळकर असे सर्व इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये गेले. शरद पवार यांचे साताऱ्यातील राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्यासारखे वाटत होते.
परंतु, पुढील निवडणुकीत विष्णुपंत सोनवणे, विक्रमसिंह पाटणकर व श्याम अष्टेकर असे तीन आमदार शरद पवार यांच्या विचाराचे निवडून आले. त्यानंतर सातारा जिल्हा कायम शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तर, जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने शरद पवार यांच्या विचाराची झाली. मागील निवडणुकीतही जिल्ह्यातील व राज्यातील अनेक नेते त्यांना सोडून गेले.
परंतु, साताऱ्यात धो-धो पावसात भिजत झालेल्या शरद पवार यांच्या सभेने संपूर्ण राज्यातील वातावरण फिरण्यास मदत झाली. अनेकजण सोडून गेले तरी, राष्ट्रवादीने निवडणुकीत मुसंडी मारली. विधानसभेच्या जागांबरोबरच लोकसभेचा गडही राखला. मूळगावही सातारा जिल्ह्यातील आणि अडचणीच्या प्रत्येक प्रसंगात मिळालेली भक्कम साथ यामुळे शरद पवार यांची सातारा जिल्ह्याशी एक वेगळीच नाळ जोडलेली आहे.
ब्याऐंशीव्या वर्षी बसलेल्या राजकीय धक्क्यातून पुन्हा फिनिक्स भरारी घेण्याचा निर्धार काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावर झळाळत होता. आजच्या घडामोडींमुळे संपूर्ण राज्यात सर्वाधिक अस्वस्थ असणार ते सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला भक्कम साथ देणारा मतदार व युवक यात शंका नाही.
अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमा व सातारा जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रम असणे, हा नियतीनेच मुहूर्त साधला आहे, असे म्हणावे लागेल. शरद पवार आज प्रीतिसंगमावरून आगामी लढाईचा एल्गार करणार, हे निश्चित. जिल्हा पुन्हा आपल्या लाडक्या नेत्याला अडचणीच्या काळात किती साथ देतो, हेही नजीकच्या काळात दिसून येईलच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.