राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दसऱ्यानंतर राज्यव्यापी दौरा सुरू करण्यात येणार आहे. यादरम्यान प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार सुरू करीत असलेल्या युवा संघर्ष यात्रेवर त्यांनी टीका केली. ‘‘युवा संघर्ष यात्रा असली, तरी कुणाशी संघर्ष हे आपल्याला कळेलच. युवा संघर्ष यात्रा ज्यांनी काढली आहे त्यांनीच भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पत्रावर सही केलेली होती. राम शिंदे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले होते त्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळालेले कुठे दिसत नाही,’’ असे तटकरे म्हणाले. दसऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा दौरा करणार असून प्रत्येक मतदारसंघात जाऊन ते जनतेशी संवाद साधतील, असेही तटकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा प्रभावीपणे आमच्यावर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकपक्षीय राजवट नाही तर आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. तसे असेल तर आम्ही २०१९ मध्ये कुठल्या विचाराने शिवसेनेसोबत युती केली त्याचे उत्तर काय आहे? त्यांच्यासोबत युती करत असताना कुठला विचार आम्ही स्वीकारला होता याचे उत्तरही द्यावे असे थेट आव्हान सुनील तटकरे यांनी विरोधकांना दिले आहे.
आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून भूमिका स्वीकारली. आमचा पक्ष हा लोकशाही मानणारा आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि मित्र पक्षाचे सरकार येईल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने जणू काही तेच राजकीयदृष्ट्या जन्माला आले, असा दावा करणाऱ्या मंडळींनीसुद्धा भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी जे पत्र लिहिले होते त्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी व्हावे यासाठी पक्षाच्या तीन नेत्यांची एक समिती स्थापन केली गेली होती याची आठवणही तटकरे यांनी करून दिली.
‘परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात’
‘‘राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला निर्णय घ्यावे लागतात. यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलै २०२३ रोजी महायुतीमध्ये सहभागी झाला होता,’’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
सरकारमध्ये सहभागी होऊन शंभर दिवस झाल्यानिमित्त त्यांनी पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला. या पत्रात त्यांनी स्वत:चा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर निर्माण झालेला वाद निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सत्तेतील सहभागाविषयीची आपली भूमिका पत्राच्या माध्यमातून मांडली आहे. या पत्रात अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. ‘‘राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समाजकारण करताना मांडलेले बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र हीच आपली प्रेरणा आहे.
रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचे उद्दिष्ट असून येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करेल,’’ अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.