Ncp News: लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे किंवा गुपचूप मदत करणारे, आता बदलते जनमत पाहून ‘इंडिया’ आघाडीत येण्याची शक्यता आहे. अशा आयाराम, गयारामांना ‘इंडिया’ आघाडीने विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी विनंती राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र पाठवून केली आहे.
त्यातूनही असे उमेदवार दिले तर त्यांचा प्रचार करणार नसल्याची स्पष्ट भूमिकाही त्यांनी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘इंडिया’ तसेच महाविकास आघाडी आणि त्यातही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या पत्राने आघाडीची व नेत्यांची चिंता वाढवली आहे.
हे पत्र देणाऱ्यांत डॉ. जी.जी.पारीख, नितीन वैद्य, तुषार गांधी, शरद कदम ,डॉल्फी डिसोझा, संभाजी भगत, फिरोज मिठीबोरवाला, अर्जुन डांगळे (मुंबई), विश्वास उटगी (ठाणे), ॲड.वर्षा देशपांडे (सातारा), धनाजी गुरव (सांगली), माधव बावगे (लातूर), सुरेश खोपडे (बारामती), अविनाश पाटील (धुळे) आणि सुभाष वारे (पुणे) यांचा समावेश आहे.
पत्रात म्हटले आहे, की विधानसभेची उमेदवारी देताना काही विचार होणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. भाजप सरकारचा संविधानविरोधी कारभार आणि संविधान बदलण्याबाबत भाजपाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये, याला मतदारांनी दिलेली ती प्रतिक्रिया होती. संविधानविरोधी कारभार सुरु असताना भाजपमध्ये गेलेल्या व तेथून परत येणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्यास आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अशा उमेदवाराचे समर्थन करणे अवघड आहे.
आम्ही सामाजिक चळवळीत असणारे कार्यकर्ते त्या विधानसभा मतदारसंघांत अशा उमेदवाराचे काम करणार नाही, अशी उघड भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पक्ष चालविताना व वाढविताना तुमच्यासमोरील आव्हाने आम्ही समजू शकतो, पण राजकारणात मूल्ये, नैतिकता व विचार महत्त्वाचा आहे, हे आपणासही मान्य व्हावे. त्यामळे ही बाब तात्पुरत्या फायद्यापेक्षा दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने विचारात घेतली जावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
अडचणीच्या काळात आपला पक्ष सोडून व्यक्तिगत स्वार्थासाठी अनेक मंडळी भाजपत गेली आहेत. तसेच ज्यांनी भाजपला उघडपणे अथवा गुपचूप पाठिंबा दिलेला आहे, अशा पक्षबदलू लोकांच्या पश्चात ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांतील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी पक्ष सांभाळला, वाढविला आहे. पक्षबदलू लोकांना उमेदवारी दिल्यास प्रामाणिकपणे पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय केल्यासारखे होईल, असेही पत्रात म्हटले आहे.
सर्व भ्रष्ट नेते एकत्र झाले आहेत. त्यांना पुन्हा महाविकास आघाडीत घेऊ, नका अशी मागणी आम्ही केली आहे. त्यातूनही त्यांना आघाडीत घेतले तर त्यांचे आम्ही समर्थन करणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही आम्ही घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.