पुणे - महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागा लढविणार आहे. मात्र या जागा कोणत्या असाव्यात, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसंग्राम पक्षाच्या मागणीनुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जागा सोडण्याचा आग्रह महायुतीकडे धरण्यात येणार आहे.
या पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती विनायक मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी मंगळवारी (ता. १६) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसंग्राम पक्षाच्या संघटन बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांसाठी आज पुणे येथे राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तानाजी शिंदे बोलत होते. यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती विनायक मेटे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, "महायुतीमध्ये शिवसंग्राम पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे. गेल्या वेळी शिवसंग्राम पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळेस ‘शिवसंग्राम’ने लोकसभेच्या तीन जागांवर तयारी सुरू केलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते.
या वेळेला शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास आहे."
‘शिवसंग्राम’ ही स्व. विनायक मेटे यांनी स्थापन केलेली संघटना आहे. त्यामुळे त्यांनी राज्यभर निर्माण केलेल्या मावळ्यांच्या जिवावर ही संघटना पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही. हा एक वटवृक्ष आहे, ज्याच्या विचारांची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली आहेत. येणाऱ्या काळात जरूर संघर्ष करावा लागेल.
परंतु स्व. विनायक मेटे यांच्याकडून आम्ही संघर्ष शिकलेलो आहोत. यानुसार आजच्या बैठकीमध्ये पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले असल्याचे या पत्राच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले.
तानाजी शिंदे म्हणाले,
- स्व. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झाले होते. तेव्हा आरक्षणदेखील मिळाले होते.
-आताही मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम पक्षाची तीच भूमिका कायम आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
- मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनात आम्ही पाठीशी आहोत.
- छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल.
- ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना ‘ओबीसीं’मधून आरक्षण मिळाले आहे.
- परंतु उर्वरित मराठा समाजालाही स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे
- शिवस्मारक लवकरात लवकर होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.