फूट पडल्याचे मान्य

महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा कल समजून घेण्याच्या हेतूने सर्वेक्षण घेण्यात आले. सर्वेक्षणातील शिवसैनिकाची व्याख्या म्हणजे शिवसेना पक्षाचा अधिकृत सदस्य असलेली व्यक्ती असा घेण्यात आला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on
Summary

महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा कल समजून घेण्याच्या हेतूने सर्वेक्षण घेण्यात आले. सर्वेक्षणातील शिवसैनिकाची व्याख्या म्हणजे शिवसेना पक्षाचा अधिकृत सदस्य असलेली व्यक्ती असा घेण्यात आला आहे.

- संशोधन, सर्वेक्षण : शीतल पवार, सकाळ टीम

संशोधन पद्धती आणि नमुना निवड

महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा कल समजून घेण्याच्या हेतूने सर्वेक्षण घेण्यात आले. सर्वेक्षणातील शिवसैनिकाची व्याख्या म्हणजे शिवसेना पक्षाचा अधिकृत सदस्य असलेली व्यक्ती असा घेण्यात आला आहे. शिवसैनिकांची निवड करताना विधानसभा मतदारसंघ असे क्षेत्र निवडण्यात आले. शिवसैनिकांची नमुना संख्या निश्चित करतांना विधानसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मिळालेली मतं लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. नमूना निवडतांना १८ ते ६० वयोगटातील कल समजून घेतला. पक्ष रचना लक्षात घेऊन युवक आणि महिला प्रतिनिधींचा समावेश केला. शहरी व ग्रामीण भागाचा समतोल राखला.

१. सध्या शिवसेनेत जे बंड सुरू आहे, त्यावरून शिवसेनेत फूट पडली असे वाटते का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून एकामागोमाग एक आमदार दूर होऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जात असतानाही शिवसेना फुटली आहे, यावर शिवसैनिकांचे एकमत नाही.

४३.३ टक्के शिवसैनिकांना वाटतं की शिवसेनेत फूट पडली आहे. तर ४५.६ टक्के शिवसैनिकांना वाटतं फूट पडलेली नाही. तर ११.१ टक्के शिवसैनिकांना याबद्दल निश्चित सांगता येत नाही. गेल्या तीन दशकांत शिवसेनेतून तीनदा मोठे नेते बाहेर पडले. छगन भुजबळ (१९९१), नारायण राणे (२००५), राज ठाकरे (२००५) त्यानंतरही शिवसेना टिकून राहिली. या तिन्ही बंडांच्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या अस्तित्वाचा प्रभावी परिणाम शिवसैनिकांवर होता. त्यामुळे, बंड होऊनही शिवसेना फुटली, असे मानले गेले नाही. आजच्या परिस्थितीत मात्र शिवसेनेतील बंडानंतर पक्षात फूट पडली आहे, असे मोठ्या घटकाला वाटते आहे. हा बदल लक्षात घ्यावा लागेल.

२. तुमची साथ कोणाला ?

सर्वेक्षणात ८२.४ टक्के शिवसैनिक म्हणतात की ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. शिवसेना हा पूर्णतः व्यक्तिकेंद्रीत पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि त्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे पक्षात नेतृत्व आहे. भावनिकता हे व्यक्तिकेंद्रीत पक्षाचे गुणवैशिष्ट्य असते. हे गुणवैशिष्ट्य शिवसेनेला तंतोतंत लागू आहे. त्यामुळे, ठाकरे आडनावाचा करिष्मा पक्षात शिंदे यांच्या बंडानंतरही कायम आहे.

मात्र, शिंदे यांचे बंड व्यापक आहे. राज्याच्या सर्व भागांतील आमदारांचा त्यांच्या गटात समावेश आहे. परिणामी, ठाकरे यांच्यामागे शंभर टक्के सर्व शिवसैनिक आहेत, असे दिसत नाही. वस्तुतः व्यक्तिकेंद्रीत पक्षाच्या प्रमुखाला निर्विवाद पाठिंबा असतो. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत एक वर्ग असा तयार झाला आहे, ज्याला एकतर शिंदे गटाची साथ द्यायची आहे किंवा संभ्रम आहे. सर्वेक्षणातही १३.७ टक्के शिवसैनिक हे शिंदे यांचे नेतृत्व मान्य करतात. विशेष म्हणजे हा प्रतिसाद राज्यभरातून दिसतो. तर ३.९ टक्के शिवसैनिक मात्र संभ्रमात आहे.

३. बाळासाहेबांचे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडले हा बंडखोरांचा आरोप तुम्हाला पटतो का ?

बाळासाहेब ठाकरे हे जहाल हिंदुत्वाचे समर्थक होते. बंड करण्यामागचे प्रमुख कारण म्हणून एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाला पुढे केले. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे, अशी त्यांची मांडणी आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरांच्या आरोपाला बहुसंख्य शिवसैनिकांचा नकार असला, तरी तो निर्विवाद नकार नाही.

या प्रश्नाला उत्तर देतांना शिवसैनिक ७७.२ टक्के शिवसैनिक नकार देतात तर १५.६ टक्के शिवसैनिक मात्र या मुद्द्यांचं समर्थन करतात. हा आकडा शिंदे समर्थक शिवसैनिकांपेक्षा किंचित अधिक आहे. तर ७.२ टक्के शिवसैनिक या प्रश्नाबद्दल निश्चित सांगू शकले नाहीत.

शिंदे गटाच्या बंडाचा फटका शिवसेनेला जरूर बसला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडले आहे, असे वाटणाऱ्यांची आणि शिंदे गटाला साथ देणाऱ्यांची टक्केवारी जवळपास सारखी येते आहे. महाविकास आघाडी स्थापन करून ती अडीच वर्षे चालविल्यानंतरही आघाडीबद्दल शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आल्याचे आकडेवारी सांगते.

४. बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण निदर्शने / आंदोलन करणार का ?

आक्रमकता ही ओळख असणाऱ्या शिवसैनिकांचे या प्रश्नाला दिलेले उत्तर मात्र आश्चर्यकारक आहे. ३४.१ टक्के शिवसैनिक रस्त्यावर येऊन आंदोलन अगर विद्रोह करण्यास नकार देतात, तर १३.६ टक्के शिवसैनिक सांगता येत नाही असे म्हणतात. ५२.३ टक्के शिवसैनिक मात्र बंडखोरांविरोधात आक्रमक होऊ असे मत नोंदवितात. शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणारा, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले असे मानणारा शिवसैनिकांचा एक वर्ग पक्षात आहे. बंडखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरण्यास हा वर्ग नकार देणार, हे स्वाभाविक आहे. तथापि, या वर्गाहूनही मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून बंडखोरांना विरोध करायचा नाही, असे टक्केवारी सांगते. निदर्शनांच्या प्रश्नावर जवळपास उभी फूट शिवसैनिकांमध्ये आहे. तीच भावना महाराष्ट्रात सरसकट दिसते. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यात मावणारी गर्दी जितकी आहे, त्याहूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक एकतर आंदोलन करण्याच्या तयारीत नाही किंवा त्यांचा आंदोलनाचा ठोस निर्णय झालेला नाही.

५. बंडखोर आमदारांना आपण पुन्हा मतदान करणार का ?

बंडखोर आमदारांना वारंवार पुढील विधानसभा निवडणुकीची भीती शिवसेनेच्या उर्वरित नेत्यांकडून घातली जात आहे. त्या भीतीमागे आधीच्या तीन बंडांचा इतिहास आहे. बंडखोर आमदारांना शिवसैनिक नाकारतात, या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा उर्वरित शिवसेना नेत्यांना आहे. सर्वेक्षणात ७६.३ टक्के शिवसैनिक बंडखोर आमदारांना नाकारतात. सर्वेक्षणात १२.५ टक्के शिवसैनिकांचा आमदारांना निवडणुकीसाठीही पाठिंबा कायम आहे. ११.१ टक्के शिवसैनिक याबद्दल निश्चित सांगू शकत नाहीत. बंडखोरीची व्याप्ती, त्यांनाच पुन्हा मतदान करू इच्छिणाऱ्यांची टक्केवारी आणि अद्याप निर्णयापर्यंत न पोहोचू शकलेल्या शिवसैनिकांची टक्केवारी पाहिली, तर बंडखोरांनी सारे बळ गमावले आहे, अशी परिस्थिती नाही. उलटपक्षी, शिवसैनिकांचा एक गट पाठीशी असताना भाजपची मते मिळण्याची त्यांची संधी वाढू शकते. महाविकास आघाडीच्या कामकाजावर नाराज आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान न करणारा वर्गही त्यांच्याकडे वळू शकतो. परिणामी, बंडखोरांची नवी मतपेढी तयार होण्याची शक्यताही सर्वेक्षणातून समोर येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()