लातूर: सामाजिक चळवळीत कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी व युवकांच्या हक्कासाठी लढा देत त्यांनी विधी विषयाची पदवी मिळवली. जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करताना पहिल्याच वर्षी त्यांनी जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. शुक्रवारी (ता. 25) त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून शपथ घेतली आणि लातूरकरांचा उर अभिमानाने भरून आला. लातूरचे सुपूत्र शिवकुमार डिगे यांचा हा प्रवास सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व विद्यार्थ्यांसोबत सर्वांनाच थक्क करणारा व प्रेरणादायी ठरला आहे.
शनिवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमुर्ती दीपाशंकर दत्ता यांच्याकडून न्यायमुर्ती डिगे यांनी शपथ घेतली. हा क्षण लातूरकरांसाठी गौरवाचा ठरला. दिवसभर या क्षणाने सोशल मिडियातून लातूरकर आणि न्यायाधीश डिगे यांच्या मित्र परिवाराचा अभिमान वाढवला. सामान्य कुटुंबातील न्यायमुर्ती डिगे यांनी सामाजिक कार्य करत येथील दयानंद विधी महाविद्यालयातून पदवी मिळवली. जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्षपद भुषवल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून त्यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली.
मुंबई शहर दिवाणी न्यायालयात काम केल्यानंतर काही दिवस ते सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश होते. त्यांच्यासमोर आदर्श सोसायटीच्या प्रकरणाची सुनावणी झाली होती. तेथून त्यांची नियुक्ती पुणे येथील सहधर्मादाय आयुक्तपदी झाली. या पदावर काम करताना त्यांनी सार्वजनिक, विश्वस्त व स्वयंसेवी संस्थांना चांगल्या कामासाठी नवा अध्याय घालून दिला. अनेक निकालातून या संस्थांतील पारदर्शक व्यवहार व विश्वस्त मंडळांना जबाबदारीचे भान दाखवून दिले. संस्था व ट्रस्ट नोंदणीतील अनेक अडचणी दूर केल्या. रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून आणि राज्याचे धर्मादाय आयुक्त म्हणून त्यांनी ऐतिहासिक काम केले.
धर्मादाय रूग्णालयांत गरजू रूग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यासाठी त्यांनी चौकटीबाहेर जाऊन केलेल्या कामांची चर्चा घडून आली. त्यानंतरच या रूग्णालयांतील सुविधांची माहिती सर्वांना झाली. सार्वजनिक संस्थांना त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यापर्यंतच्या कामात योगदान द्यायला भाग पाडले. सार्वजनिक संस्थांतील पदाधिकाऱ्यांतील वाद बाजूला सारून संस्थांचे सामाजिक कार्यात योगदान वाढवले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळेच धर्मादाय आयुक्तपदाची ओळख सर्वांना झाली होती. गेल्यावर्षी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक म्हणून नियुक्ती झाली होती. तर काही दिवसापूर्वीच त्यांची न्यायमुर्तीपदावर नियुक्तीची शिफारस झाली होती. गुरूवारी (ता. 24) नियुक्तीचे आदेश आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली.
औरंगाबाद खंडपीठात पहिली संधी-
शपथ घेतल्यानंतर न्यायमुर्ती डिगे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळणार आहे. मंगळवारपासून (ता. 29) चार जुलैपर्यंतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे होणाऱ्या सुनावणीच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कामकामाच्या जाहिर झालेल्या नियोजनानुसार दोन सदस्यीय पीठामध्ये न्यायमुर्ती व्ही. के. जाधव व न्यायमुर्ती डिगे यांचा समावेश आहे. मराठवाड्यात न्यायमुर्ती डिगे यांना पहिली संधी मिळाल्यामुळे लातूरकरांच्या आनंदात आणखी भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.