शिवसेनेच्या "आरे'ला भाजपचे नाणारचे "कारे'

Nanar-Refinary-Project
Nanar-Refinary-Project
Updated on

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेना भाजप महायुतीची गाडी मात्र कारशेडमध्येच अडकली आहे. शिवसेनेच्या "आरे' कारशेडच्या बाणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने "नाणार'चे शस्त्र सोडल्याने उभय पक्षांतील तणाव आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची उद्या (ता.19) रोजी नाशिकमध्ये सांगता होणार असून, मोदी येथे नेमके काय भाष्य करणार यावर युतीचे भवितव्य अवलंबून असेल. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिवाकर रावते यांनीही एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेला 144 जागा मिळाल्या तरच युती होईल, असे विधान केल्याने युतीबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे. 

शिवसेनेने उपस्थित केलेल्या मुंबईतील आरे कारशेडच्या मुद्द्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युतीतील विसंवाद वाढला आहे. त्यामुळे शिवसेना- भाजपची युती होणार का, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. उद्या (ता. 19) नाशिकमध्ये होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी युतीबाबत काय भाष्य करतील, यावर युतीचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जाते. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "नाणारचे झाले तेच आरेचे होईल,' असे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "भाजपचे नाणार येणार'चा पुनरुच्चार केला आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेत नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. एकदा "नाणार जाणार'ची घोषणा केल्यानंतर परत मुख्यमंत्र्यांनी नाणारचा विषय काढून जनतेच्या मनात असंतोष निर्माण केल्याची भावना शिवसेनेकडून व्यक्त होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्षांतील युतीबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. 

या विषयावर स्वतः उद्धव ठाकरे बोलतील, बाकी कोणीही बोलणार नाही, असे शिवसेनेत ठरल्याचे समजते. त्यामुळे ज्या नाणार प्रकल्पावरून लोकसभा निवडणुकीत युती झाली होती, त्याच नाणारवरून युती तुटतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक घोषणा दिल्या. "आम्ही आधीपासून सांगत होतो नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिजे. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे. या प्रकल्पामुळे कोकणातल्या एक लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे कोकणचा कायापालट होणार आहे. ज्या प्रकारे याला विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा प्रकल्प थांबवला; मात्र आपला उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल. आज कुठला निर्णय जाहीर करत नसलो तरी यावर चर्चा केली जाईल,' असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या नव्या भूमिकेमुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

महाजनादेश यात्रेची आज सांगता 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेची सांगता उद्या (ता. 19) नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने होणार आहे. यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जारी होण्याची शक्‍यता असून शिवसेना- भाजपच्या युतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्य भाजपच्यावतीने महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे तीन टप्प्यांत गेल्या दीड महिन्यापासून फडणवीस राज्यभर दौरा करीत आहेत. या दौऱ्यानिमित्त भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांना, आमदारांना, माजी मंत्री, कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश देण्यात आले आहेत. 

नाशिकमध्ये आज शक्तिप्रदर्शन 
नाशिकमध्ये उद्या होणाऱ्या सांगता सभेत राज्य भाजपच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. सध्या भाजप- शिवसेनेत जागावाटपावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. सत्ताधारी भाजप- शिवसेनेच्या तुलनेत विरोधी बाकांवरील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. मात्र निवडणूक जवळ येत असताना युतीमधील संवादाची दरी वाढत चालली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.