आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. राज्यातील उच्चस्तरीय पोलीस अधिकारी कणकवलीत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या अधिकाऱ्यांची बैठक सुरू असून सध्या राणे कुठे आहेत, याचा शोध सुरू आहे. (Nitesh Rane arrest)
काल संध्याकाळी नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत 'नितेशला अटक होऊ शकते', अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर चर्चांना उधाण आलं. सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षेखाली सिंधुदुर्गमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांना निवेदनही देण्यात आलं होतं. आज सभागृहात राणेंच्या वक्तव्यावरून पडसाद उमटले. त्यामुळे नितेश राणेंची दुहेरी कोंडी सुरू असल्याचं चित्र आहे.
सध्या नितेश राणे कुठे आहेत याची कोणालाही माहिती नाही. नितेश राणे यांचा फोन स्विच ऑफ येतोय. तर, राणे हे आऊट ऑफ रेंज आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांकडून शोध सुरू आहे. फिर्यादी संतोष परब यांनी नितेश राणेंचं नाव घेतलं आहे. राणेंशी संपर्क झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
नक्की घडतंय काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना भोवणार असल्याचं दिसतंय. कारण, आमदार राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी सिंधुदुर्ग, गोवा विमानतळ आणि मुंबईमध्ये फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. दरम्यान, भाजप आमदार नीतेश राणे यांची कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. सचिन सातपुतेची चौकशी केल्यानंतर शिवसेनेने भाजप आमदार नीतेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी लावून धरलीय.
त्यामुळे कणकवली पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, नीतेश राणे चौकशीला आले नाहीत. त्यानंतर सिंधुदूर्ग पोलिस नीतेश राणे यांच्या घरीही गेले. मात्र, तिथेही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे नीतेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदूर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
विधानसभेतही पडसाद, राणेंच्या निलंबनाची मागणी
हिवाळी अधिवेशनात नितेश राणेंच्या 'म्याव म्याव' प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंकडे पाहून मांजरीचा आवाज काढला होता. ही वर्तणुक सभ्यतेला आणि सभागृहाच्या गरिमेला धरून नसल्याने सर्वांनी त्यावर आक्षेप नोंदवला. आज भास्कर जाधव यांनीही नितेश राणे यांच्या काही वक्तव्यांवरून सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली. शिवसेनेच्या नेत्यांनी राणेंच्या निलंबनाची मागणी केली. त्यामुळे राणेंची दुहेरी कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.