एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले, या फूटीनंतर आता शिवसेनेतील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली निघणे बाकी आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून (१४ सप्टेंबर) सुरूवात झाली. (shiv sena mlas disqualification case)
सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या या महत्वपूर्ण सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून या प्रकरणातील सर्व याचिकांवर एकत्र सुणावणी घेतली जावी अशी मागणी केली. ठाकरे गटाच्या या मागणीवर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच सुनावणीच्या सुरूवातीलाच शिंदे गटाकडून प्रत्येक याचिकेवर वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी केली, यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रत्येक याचिकेवर वेगवेगळी सुनावणी होईल असे जाहीर केले.
दरम्यान विधान भवनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून युक्तीवादाला सुरुवात करण्यात आली. ठाकरे गटाकडून सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यादरम्यान ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आल्याने सुनावणीला सुरूवात झाली.
यानंतर शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांपुढे मोठा युक्तीवाद करण्यात आला. आम्हाला याचिकेची कागदपत्रे मिळाली नाहीत. ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याची कागदपत्रे मिळाली नाहीत, तसेच कागदपत्रे मिळाली नसल्यानं बाजू मांडण्यास अडचण येत असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आलं.
सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी कर्नाटक विधानसभा प्रकरणाचा दाखला देत सर्व प्रकरणे एकत्रच ऐकून ध्यावीत आणि या सर्व याचिकांवर पुढील आठवड्यात एकत्र अंतिम सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. तर आम्हाला उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत वाढवून द्या अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली.
दरम्यान एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटाला दिले आहेत. तसेच दोन्ही गटांनी एकमेकांना संबंधीत कागदपत्रे द्यावीत असेही आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. शिंदे आणि ठाकरे हे दोन्ही गट एका आठड्यात त्यांचं म्हणण मांडणार आहेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी ही दोन आठवड्यांनी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.