ठाकरेंनी पाठिंबा दिलेल्या मार्गारेट अल्वांनी कधीकाळी शिवसेना फोडली होती

शिवसेना फोडण्यामागे हात असलेल्या अल्वा यांना सेनेने उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला आहे.
Shivsena Uddhav thackeray
Shivsena Uddhav thackeraySakal
Updated on

काल राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका पार पडल्या. सत्तेत असलेल्या भाजप आणि मित्रपक्ष म्हणजेच एनडीएकडून द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदासाठी तर जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आलीये. तर विरोधी पक्षांकडून म्हणजे युपीएकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी आणि मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आलीये. पण इकडे महाविकास आघाडीला सोडून शिवसनेने राष्ट्रपतीपदासाठी एनडीएला आणि उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएला पाठिबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीये.

सध्या शिवसेनेत खूप मोठी फूट पडलीय. शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनीही एकनाथ शिंदे यांचा मार्ग धरल्याने सेनेला मोठं खिंडार पडलंय. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी सेनेने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिलाय खरा पण एकेकाळी याच मार्गारेट अल्वा यांचा शिवसेनेतील राणेंच्या बंडामागे खूप मोठा हात होता हेही तेवढंच महत्त्वाचं.

Narayan Rane
Narayan RaneSakal

जुलै २००५ सालची गोष्ट. शिवसेनेतील दुसरं मोठं बंड शिवसेनेचे कोकणातील महत्त्वाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या रूपानं घडून आलं होतं. त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्याचबरोबर मार्गारेट अल्वा ह्या त्यावेळच्या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी होत्या. समांतरपणे शिवसेनेतही उद्धव ठाकरे विरूद्ध नारायण राणे अशा कुरबुरी चालू झाल्या होत्या. त्यातूनच नारायण राणे शिवसेना सोडण्याच्या चर्चा चालू झाल्या होत्या. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांकडूनही ऑफर असल्याचं बोललं जात होतं. पण ही कुणकुण आधीच सुरू झाली होती.

Margaret Alva
Margaret AlvaSakal

कोकणातील कणकवलीत राष्ट्रावादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची २००२ साली हत्या करण्यात आली होती. नारायण राणे त्यावेळी विरोधीपक्षनेते होते. साहजिकच नारायण राणे यांच्यावर लोकांनी आरोप केले आणि राणेंच्या घराची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणानंतर त्यावेळी सेनेचा एकही नेता कोकणात आला नाही आणि आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला नाही असा राणेंचा दावा होता. त्यातून त्यांच्या सेनेतील नाराजीला बळ मिळालं होतं.

त्यावेळी काँग्रेसच्या प्रभारी असलेल्या मार्गारेट अल्वा या महाराष्ट्रात आल्या होत्या. त्याआधी त्यांनी राज्यसभा, लोकसभेत काम केलं होतं. महाराष्ट्रातील राजकारण त्यांनी जवळून अनुभवलं होतं. नारायण राणेंची सेनेबद्दलच्या भूमिकेची कुणकुण शरद पवारांसहित त्यांनाही लागली होती. नारायण राणेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी पडद्यामागून शरद पवारांनी बरेच प्रयत्न केले पण त्यांना ते शक्य झालं नाही. पण अल्वा यांनी मात्र राणेंना काँग्रेसमध्ये घेण्याची नामी संधी सोडली नाही. २००५ साली नारायण राणेंनी आपल्यासोबत डझनभर आमदारांना घेत सेनेला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेतील भुजबळानंतरचं मोठं बंड यशस्वी झालं. छगन भुजबळांनंतरचं सेना फोडण्याचा सर्वांत मोठा प्रयत्न राणेंनी अल्वा यांच्या मदतीने यशस्वी केला होता.

Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal

हे बंड झाल्यानंतर अल्वा यांच्यावर महाराष्ट्रातून आणि विशेषत: शिवसैनिकांमधून शिवसेना फोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप झाले. पण अल्वा यांनी हे आरोप धुडकावून लावले. त्याचबरोबर राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत असं म्हणत त्यांनी राणे यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दिल्लीत बैठका झाल्याच्या चर्चाही अल्वा यांनी धुडकावून लावल्या होत्या.

त्यानंतर काहीच दिवसांत राज ठाकरेंच्या रूपाने शिवसेनेत मोठं बंड झालं. आता तब्बल १३ वर्षांनी शिवसेनेतील सर्वांत मोठं बंड एकनाथ शिंदे यांच्या रूपानं झालं आणि महाराष्ट्रात ऐतिहासिक सत्तांतर झालं. त्यानंतर आता शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार घेत सेनेला मोठं खिंडार पाडलंय. त्याचबरोबर आता माजी नेते आणि खासदारांनीही सेनेची साथ सोडली.

मात्र महाविकास आघाडी नको म्हणत खासदारांची आग्रही मागणी लक्षात घेऊन सेनेने आदिवासी समाजातील उमेदवार म्हणून एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता पण उपराष्ट्रपतीपदासाठी सेनेने अधिकृतरित्या यूपीएला पाठिंबा दर्शवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.