मुंबई - मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ आज (ता. १०) संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सायंकाळी चार वाजता करणार आहेत.
या ऐतिहासिक निवाड्याच्या आधीच नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने वातावरण तापले आहे. ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नार्वेकर विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन करणार आहेत. याच सभागृहात आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडली होती. राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडविणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची जोरदार तयारी विधिमंडळाकडून केली जात आहे.
रात्रीचा दिवस एक करून विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाची प्रत तयार केली जात आहे. या ५०० पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल विधानसभा अध्यक्ष वाचून दाखविणार आहेत.
हा निकाल साधारणपणे ५-१० पानांचा असेल. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटांच्या वकिलांकडे सोपविली जाणार आहे. या निकालाचे महत्त्व लक्षात घेऊन विधिमंडळातील बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एका पक्षाचे आमदार असल्याने त्यांच्याकडून कायद्याला धरून निर्णय होईल असे वाटत नाही. ते राजकीय निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर काय निर्णय देतील, हाच पहिला भूकंप असेल.
- पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते
निकाल आमच्याच बाजूने लागणार याची खात्री आहे. अपात्र ठरलो तरी आम्हाला कोणताच पश्चात्ताप होणार नाही; कारण पश्चात्ताप झाला म्हणून आम्ही ठाकरे यांना सोडून बाहेर पडलो.
- भारत गोगावले, आमदार (शिंदे गट)
विधानसभाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटणे गैरच आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतःच्या प्रतिमेला जपले पाहिजे.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते
न्यायाधीशच गेले आरोपींच्या भेटीला; शिंदे-नार्वेकर भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका
आमदार अपात्रतेबाबत आज (१० जानेवारी) येणारा निकाल या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही? का हे दोघे मिळून लोकशाहीचा खून करणार? हे यावरून स्पष्ट होईल,’ अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, नार्वेकर यांनी शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याबाबत ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष न्यायाधीशांच्या भूमिकेत आहे. आमच्या तक्रारीत शिंदे आरोपी नंबर एक असताना आरोपी आणि न्यायाधीशांनी बंद दाराआड चर्चा करणे म्हणजे या दोघात मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त करत ठाकरे गटाने ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.
अपात्रतेबाबतच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनवेळा भेट झाली होती. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निकालाची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
ठाकरे म्हणाले, ‘उद्याचा निकाल हा देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरविणारा असेल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. म्हणजेच ते या लवादाचे अध्यक्ष आहेत. लवादाचे अध्यक्ष दोनवेळेला उघडपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन भेटले.
ते ज्या भूमिकेत आहेत आता त्याचा अर्थ असा की न्यायाधीश आरोपीला जाऊन भेटले आहेत. आरोपी आणि न्यायाधीशाची मिलीभगत आहे का? असेल तर हा वैयक्तिक खटला नसून देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही? का हे दोघे मिळून लोकशाहीचा खून करणार? हे उद्याच्या निकालावरून स्पष्ट होईल.’
जनतेच्या कोर्टात लढत राहू
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्यादृष्टीने मुख्यमंत्री आरोपीच आहेत कारण आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेचा खटला दाखल केला आहे. जर न्यायाधीश आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर आम्ही यांच्याकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा करावी? ज्या पद्धतीने या खटल्याची हाताळणी सुरू आहे त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जनतेच्या न्यायालयातील लढा कायम ठेवू.’
बंद दाराआड चर्चा होत नाही - परब
शिवसेना नेते आ. अनिल परब यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि निर्देशासंदर्भातील ठळक बाबी वाचून दाखविल्या. यानंतर त्यांनी राहुल नार्वेकर-एकनाथ शिंदे भेटीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, ‘ही भेट मतदारसंघातील कामांसाठी होती असे सांगितले जाऊ शकते मात्र अशा कामांसाठीची चर्चा बंद दाराआड होत नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमसूचीत बैठकीचा उल्लेख असतो.
असा कोणताही तपशील काल जाहीर झालेला नाही. सोळा आरोपींमध्ये एकनाथ शिंदे यांचा पहिला नंबर आहे. त्यामुळे आरोपी आणि अध्यक्षांची भेट होत असेल तर यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. विधानसभा अध्यक्ष आणि आरोपी यांच्यातील भेटीची बाब आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.’
दबाव आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची तक्रार; नार्वेकर - प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी भेट
मुख्यमंत्री भेटीबद्दल न्यायालयात तक्रार करणे म्हणजे उद्याच्या निकालावर दबाव टाकण्यासारखे आहे,’ असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मंगळवारी म्हणाले.
आमदारांवरील अपात्रतेची सुनावणी सुरु असताना अन्य कामे करू नका असे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश नसल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले, की आमदार या नात्याने मतदारसंघातील योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मी गेलो होतो. मी अध्यक्ष आहे; पण त्याच वेळी आमदारही आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी भेटायला जाण्यात काहीही गैर नाही.
निर्णय प्रक्रियेवर दबाव आणण्यासाठी, असे आरोप केले जात आहेत हे उघड आहे. ‘‘आमदार या नात्याने मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणे गरजेचे असते, हे माजी मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे जाणून आहेत. तरीही ते अशी विधाने करीत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे,’’ असेही नार्वेकर म्हणाले.
प्रकल्पांच्या कामासाठी घेतली भेट
‘मी ३ जानेवारीला मुख्यमंत्र्यांना मतदारसंघातील कामांबाबत भेटणार होतो. मात्र प्रकृती ठीक नसल्याने मी जाऊ शकलो नाही. नरिमन पॉइंट कनेक्टर प्रकल्पाबद्दल अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने मी गेलो होतो. सहा प्रकल्पांचे काम मार्गी लावायचे होते,’ असे नार्वेकर यांनी सांगितले. आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु असताना अन्य कामे बाजूला ठेवा, असे निर्देश न्यायालयाने दिलेले नाहीत याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.