धक्कादायक! सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून मध्यरात्री पळाले 2 रुग्ण; रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणतात, रुग्णांवर उपचार करणे आमचे काम

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार (सिव्हिल) रुग्णालयाची खाटांची क्षमता साडेसातशेपर्यंत आहे. पण, रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल असल्याने रुग्णालयातून रुग्ण पसार होतात, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. सिव्हिल पोलिस चौकीच्या ‘एमएलसी’मध्ये मंगळवारी अपघातग्रस्त 2 वेगवेगळे रुग्ण रात्री 11 ते पावणेबाराच्या सुमारास रुग्णालयातून पळून गेल्याची नोंद आहे.
Sakal Exclusive
Sakal Exclusivesakal
Updated on

सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार (सिव्हिल) रुग्णालयाची खाटांची क्षमता साडेसातशेपर्यंत आहे. पण, रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल असल्याने रुग्णालयातून रुग्ण पसार होतात, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. सिव्हिल पोलिस चौकीत दाखल ‘एमएलसी’मध्ये मंगळवारी (ता. १०) अपघातग्रस्त दोन वेगवेगळे रुग्ण रात्री ११ ते पावणेबाराच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयातून पळून गेल्याची नोंद आहे.

सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात जवळपास आठशे डॉक्टर्स, शेकडो सेविका- कर्मचारी, रुग्णालयातील ‘बी’ ब्लॉकबाहेर सुरक्षारक्षक आहेत. तरीदेखील रुग्ण मध्यरात्री पसार होतात, अशी विचित्र स्थिती समोर आली आहे. १० सप्टेंबर रोजी अमन बडेसाब नदाफ (वय २१) हा सोलापूर शहरातील बापूजी नगर येथील रुग्ण अपघातानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला होता. पण, तो त्याच दिवशी रात्री पावणेबाराच्या सुमारास रुग्णालयातून पळून गेल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दुसरीकडे पंढरपूर- तिऱ्हे रोडवर १० सप्टेंबरला एका मालवाहतूक चारचाकी वाहनाला दुचाकीची धडक बसली. त्यात जयदीप बाळू खटकाळे (वय २५) हा दुचाकीस्वार जखमी झाला होता.

अपघातानंतर त्याला सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोही त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास रुग्णालयातून पसार झाल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. यापूर्वी लष्कर परिसरातील मारहाणीत दाखल एक महिला अशीच रुग्णालयातून पळून गेली होती. तत्पूर्वी, सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वरजवळ झालेल्या अपघातातील पंढरपूर येथील दोन जखमी युवक रुग्णालयातून जखमी अवस्थेत पळून गेले होते. या घटनांमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुग्णांवर उपचार करण्यासाठी आमचे प्राधान्य

हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे काम आमचे डॉक्टर करतात. त्यांची सेवा हॉस्पिटलमधील आमचे कर्मचारी करतात. रुग्णालयात दाखल रुग्ण पळून जातात, त्यावेळी पोलिसांना माहिती दिली जाते. पण, पळून जाणाऱ्या रुग्णांची जबाबदारी आमची नाही.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

सर्वोपचार रुग्णालयाची नियमावली...

  • रुग्णालयातून कोणी लहान मुलांना घेऊन जात असल्यास त्याच्याकडे डिस्चार्ज कार्ड बंधनकारक

  • दवाखान्यात दाखल रुग्ण एक तासभर न दिसल्यास पोलिसांना दिली जाते माहिती

  • रुग्णालयात एकावेळी रुग्णांना भेटायला एकजणच येऊ शकतो, त्याच्याकडे अधीक्षकांचे कार्ड आवश्यक

रुग्णालयाच्या आवारातून दुचाकींची चोरी

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात सर्वत्र आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगितले जाते. तरीपण, रुग्णालय परिसरात लावलेल्या तेथील डॉक्टरांच्या व रुग्णांच्या नातेवाइकांच्या अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्याची नोंद सदर बझार पोलिसांत आहे. अशा घटनांमुळे काही कर्मचारी ‘ओपीडी’जवळील इमारतीत दुचाकी लावतात, अशी सद्य:स्थिती आहे. दुसरीकडे रुग्णांना भेटायला एकावेळी एकाच नातेवाइकाला आत सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला, पण इथे रुग्णच पळून जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘दरवाजा उघडा अन्‌ मोरीला बोळा’ या म्हणीचा प्रत्यय येवू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.